आत्मपॅम्फ्लेट – हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक | Aatmapamphlet Review

चित्रपट:  आत्मपॅम्फ्लेट 
कालावधी :  १ तास ३६ मिनिटं
दिग्दर्शक:  आशिष बेंडे 
कथा पटकथा आणि संवाद : परेश मोकाशी 
छायाचित्रण: सत्यजीत शोभा श्रीराम 
संकलक:  आशिष बेंडे 
संगीत: साकेत कानेटकर 
मुख्य कलाकार :  ओम बेंडखले, चेतन वाघ, खुशी हजारे, केतकी सराफ, प्रांजली श्रीकांत, मानस तोंडवळकर.
कुठे पाहू शकता : थिएटर मध्ये 

Aatmapamphlet Review लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक हे तिन्हीही भिन्न गोष्टी एकाच चित्रपटात कसं काय शक्य आहे? तर ही यशस्वी किमया साधली आहे लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे या जोडगोळीने. भरपूर हसवणारा, तिरकस लेखन आणि तितकीच तिरकस निवेदन आणि दिग्दर्शकीय शैली असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला देखील भाग पाडतो म्हणून हे शीर्षक.

परेश मोकाशी यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद तर लिहिले आहेतच पण त्याच बरोबर त्यांच्या खास अश्या तिरकस विनोद शैलीत चित्रपटाचे निवेदन देखील केले आहे. परेश मोकाशी यांच्या चित्रपटाची नावं  – ‘ची व सौ कां’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’ ही नेहमीच उत्सुकता निर्माण करणारी असतात –  आत्मपॅम्पलेट हे नाव ऐकलं त्यावेळेस उस्तुकता तर निर्माण झाली पण प्रश्न पडला की याचा नेमका अर्थ काय?

खुशी हजारे आणि मानस तोंडवळकर आत्मपॅम्फ्लेट मध्ये सृष्टी आणि आशिषच्या भूमिकेत Aatmapamphlet Review
खुशी हजारे आणि मानस तोंडवळकर -आत्मपॅम्फ्लेट मध्ये सृष्टी आणि आशिषच्या भूमिकेत

Aatmapamphlet Meaning आत्मपॅम्फ्लेट चित्रपटातील मुख्य पात्र आशिष बेंडेच्या (जे की खुद्द दिग्दर्शकाचे देखील नाव आहे) म्हणण्या नुसार त्याच्या  आत्मचरित्राचा ऐवज हा महान लोकांच्या आत्मचरित्रा सारखा जाडजूड ग्रंथाचा नसून केवळ एका पॅम्प्लेट वरती संपूर्ण लिहिता येऊ शकेल एवढाच आहे. त्यामुळे अश्या या सर्वसामान्य माणसाच्या आत्मचरित्राला त्याने नाव दिले – आत्मपॅम्फ्लेट.  

तर असा हा आत्मपॅम्फ्लेट नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय बर्लिन चित्रपट महोत्सवात याच वर्षी निवडला गेला तसेच आनंद एल राय, झी स्टुडिओ आणि टी सिरीज सारख्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्था यांचे पाठबळ देखील याला लाभले. आज तो भारतभर प्रदर्शित झाला आहे तर जाणून घेऊया कसा आहे हा चित्रपट. 

गोष्ट काय आहे? । What is the story of Aatmapamphlet?

तर ही गोष्ट आहे आशिष बेंडे [लहान(मानस तोंडवळकर), मोठा (ओम बेंडखले)] नामक मुलाची. आशिषचा जन्मल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा प्रवास आपल्याला चित्रपटात दिसतो आणि एका चित्र-विचित्र शेवटापाशी येऊन तो थांबतो. 

पण त्याची गोष्ट सांगण्याआधी आपल्याला त्याच्या पणजीची गोष्ट कळते. केवळ तिच्या जिद्दीने आणि कष्टामुळे त्यांचे कुटुंब आज चांगल्या स्तिथीला येऊ शकले, तिथून त्याच्या वडिलांचा आणि क्रमाने त्याचा १९७९ साली झालेला जन्म आणि त्याला आशिष हे नाव कसे पडले हे आपल्याला कळते. ज्या ज्या वेळेस देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण घटना घडली, त्या त्या वेळेस आशिषच्या आयुष्यात देखील महत्त्वाची घटना घडली. जनता सरकार पडले आणि आशिष चा जन्म झाला, सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सृष्टीने [लहान (खुशी हजारे),मोठी सृष्टी (प्रांजली श्रीकांत)] स्टेज वरती आशिषचा हात धरला आणि तिथूनच त्याच्या आयुष्यात प्रेम पर्वाला सुरुवात झाली.  

चौथी पासून सुरु झालेल्या या प्रेम प्रकरणाला पुढे अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. सृष्टीची शाळेची वेळ बदलणे, गैरसमजुतीतून तिचे त्याच्यावर चिडणे, त्याचा एक प्रतिस्पर्धी निर्माण होणे पण त्याहीपेक्षा मोठा अडथळा ठरला तो जातीचा – आशिष दलित तर सृष्टी ही ब्राह्मण.

Aatmapamphlet Review
आत्मपॅम्फ्लेट पोस्टर – आशिष चा जन्मल्यापासून लग्नापर्यंतचा प्रवास

वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत आशिषला आपण कुठल्या जातीचे आहोत हे माहीत नसते, अचानक एके दिवशी फी सवलतीवरून झालेल्या चर्चेत त्याला अनेक गोष्टी उलघडत जातात. त्याचवेळेस बाबरी मशीद पडल्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघतो. जात म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? याने माणसात काय फरक पडतो? असे अनेक मूलभूत प्रश्न त्याला आणि त्याच्या मित्रांना पडायला लागतात. समाजामध्ये वाढणारी तेढ त्याच्या मित्रांमध्येही वाढायला लागते. 

या सर्व गदारोळात सृष्टी वरच्या प्रेमाचे काय होते? त्याचे मित्र पुन्हा एकत्र येतात का? वरती उल्लेख केलेला चित्र विचित्र शेवट काय आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हांला चित्रपट पहावा लागेल. 

चित्रपट कसा आहे ? | How is  Aatmapamphlet Marathi film ?

शालेय जीवनामध्ये मुलाचे मुलीवर एकतर्फी असणारे प्रेम आणि ते व्यक्त करण्यासाठी त्याला पार करावे लागणारे अनेक अडथळे हा विषय आपण शाळा आणि फॅन्ड्री मध्ये पहिला आहे. शाळातील जोश्या समोर जातीचा अडसर नव्हता तर फॅन्ड्री मधील जब्यासमोर तो अधिक बोचरा आणि अस्वस्थ करणारा अडसर ठरला. दोन्ही चित्रपटाची मांडणी ही एकरेषीय आणि साधी सरळ होती. इथे आत्मपॅम्फ्लेट चे वैशिष्ट्य हे त्याच्या अरेषीय मांडणी, तिरकस विनोद आणि निवेदन शैलीत आहे.

बराचसा चित्रपट हा ८०-९० च्या दशकात घडत असल्याने या काळात जन्मलेल्या अनेकांना चित्रपटातील घटना तुमच्या बालपणाची आठवण करून देतील. काही उदाहरणे द्यायची झाल्यास शाळेत सोडण्यासाठी सायकल, रिक्षा किंवा बसेसच्या ऐवजी एखादी बाई नेमण्यात येत असे. ती चार-पाच मुलांना दोन्ही बाजूला दोन्ही हातानी धरून चालत शाळेत सोडवत असे. ही आडवी अगागडीची रांग रस्त्यावर पक्षांच्या थव्यासारखे वेगवेगळे आकार बनवत जात असे, मित्रांमध्ये तोडक्या मोडक्या इंग्रजीत संवाद केल्यावर होणाऱ्या गमती जमती, पहिल्यांदाच ज्यावेळी शाई पेन ची शाई खोडणाऱ्या खोडरबरची ओळख झाली तो क्षण, मैने प्यार किया, कयामत से कयामत तक आणि आशिकी चित्रपटातील गाणी, आशिष चे साडेअकरा या वेळेवरती असणारे प्रेम, त्याचे गेट बाहेर ताटकळत उभे राहणे, तिच्या घराचा पत्ता शोधणे अशा काही घटना तुमच्या व्यक्त-अव्यक्त पहिल्या प्रेमाची आठवण करून देतील. हे स्मरण रंजन तर आहेच पण चित्रपट कमालीचा विनोदी देखील झाला आहे.

ओम बेंडखले, चेतन वाघ आत्मपॅम्फ्लेट मध्ये Aatmapamphlet Review
ओम बेंडखले आणि चेतन वाघ आत्मपॅम्फ्लेट मध्ये

शाब्दिक विनोद तर आहेच जसे की आइस्क्रीम चा ‘गोळा’ खाण्यासाठी मित्र ‘गोळा’ होणे, हिटलर च्या चित्राला दगड धोंडे संबोधने असे अनेक. दृश्यरचनेतून देखील  विनोद निर्मिती करण्यात आली आहे, आशिष च्या पणजीने दाराचा उंबरठा ओलांडताना दारूची बाटली लवंडून आत जाणे, बोऱ्या ने आशिष ला सृष्टी शी बोलताना पकडणे हे प्रसंग चित्रपट पाहताना तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाही.

रोहन मापुस्कर यांनी केलेले कास्टिंग अचूक झालं आहे. आशिष चे काम करणारे लहान(मानस तोंडवळकर) आणि मोठा (ओम बेंडखले) यांची कामं उत्तम झाली आहेत. विशेष लक्षात राहतो बोऱ्या चं काम करणारा चेतन वाघ. प्रत्येक वेळेस तो पडद्यावर आल्यावर चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही.

ओम बेंडखले आत्मपॅम्फ्लेट मध्ये आशिषच्या भूमिकेत
ओम बेंडखले आत्मपॅम्फ्लेट मध्ये आशिषच्या भूमिकेत

दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर प्रेम दर्शवण्यासाठी लाल रंगाचा आणि उबदार रंगछटांचा वापर चित्रपटभर करतात. विशेषता: आशिष ने लाल रंगाचा रेनकोट घालने, तो उभा असलेल्या भवताला मध्ये ठिकठिकाणी लाल अथवा उबदार रंगछटांचा वापर भावना पोहचविण्यासठी प्रभावी ठरतो. चित्रपटाची निर्मिती मूल्य उच्च दर्जाची आहेत ७०, ८०, ९० चा काळ कुठेही खोटा वाटत नाही. 

चित्रपट चांगला तर आहेच पण तो महत्त्वाचा देखील आहे. धर्म- जात- वर्ण निरपेक्ष प्रेमाने तुम्ही जग देखील जिंकू शकता हा महत्त्वाचा संदेश तो देतो आणि आजच्या आणि येणाऱ्या काळात तो फारच गरजेचा झालेला आहे. 

शाळा,फॅन्ड्री आणि आता आत्मपॅम्फ्लेट या किंवा अश्या अनेक  चित्रपटांमध्ये एका मुलाच्या नजरेतून जग कसे दिसते हे दाखविले गेले आहे. त्याचे एकतर्फी प्रेम, तिच्यावर सतत ठेवलेले लक्ष्य यामुळे त्या मुलीला काय वाटतं असेल हे तिच्या नजरेतून मांडले जाणे देखील आवश्यक आहे असे वाटते. एका मुलीच्या नजरेतून ते कसे दिसत असेल हे एका स्त्री लिखिकेन अथवा दिग्दर्शिकेन मांडले तर ते पाहणे रंजक आणि उधबोधक ही ठरू शकेल.

असे असले तरीही चित्रपटात काही त्रुटी देखील जाणवल्या. काही प्रसंग अतिशयोक्त आणि अतार्किक वाटू शकतात पण  चित्रपटाची सर्वात मोठी त्रुटी हा त्याचा शेवट म्हणावा लागेल. ज्यात येणाऱ्या गोष्टी या फारच अतिशयोक्ती कडे झुकणाऱ्या आणि अतार्किक वाटतात. विशेषतः अंतराळातील येणारा संदर्भ.  या शेवटच्या पाच मिनिटांकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण चित्रपट हा उत्तम झाला आहे.

चित्रपट पाहावा का? : 

रिल्स, शॉर्ट्स सारख्या इन्स्टंट जमान्यात हे आत्मचरित्र दीड तासाच्या छोटे खाणी पॅम्प्लेट च्या रुपात सादर करण्यात आले आहे. शाळेची व्यक्त अव्यक्त प्रेमाची आठवण तर ते करून देईलच पण तुम्हाला ते चित्रपट भर हसत ठेवून जाता जाता प्रेमाचा, एकतेचा महत्त्वाचा संदेश देखील देऊन जाईन. आशिष आणि त्याच्या मित्रांच्याच भाषेत बोलायचं झालं तर म्हणेन ‘भावांनो चित्रपट पहायला चुकवू नका.’

Leave a Comment