Adhura Web Series Review | अधुरा वेब सीरिज रिव्यू  – न जमलेला भयपट.

वेब सिरीज :  अधुरा 
कालावधी :  ७ एपिसोडस (अंदाजे चाळीस मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक:  अनन्या बॅनर्जी, गौरव के चावला
कथा पटकथा आणि संवाद :  अनन्या बॅनर्जी, गौरव के चावला, आनंद जैन.
मुख्य कलाकार :  रसिका दुग्गल, इश्वाक सिंग, श्रेणिक अरोरा, पूजा छाब्रा, राहुल देव, जोआ मोरानी, जैमिनी पाठक, अरु वर्मा, प्रिया बॅनर्जी, केसी शंकर.
कुठे पाहू शकता : अमेझॉन प्राईम व्हिडिओ

Adhura Web series Review : बोर्डिंग स्कूलमध्ये घडणाऱ्या भयावह घटनांबद्दल सांगणारी या वर्षातली ही दुसरी वेब सिरीज. ‘स्कूल ऑफ लाईज’ ही थरारक वेब सिरीज मागच्याच महिन्यात आली. ‘स्कूल ऑफ लाईज‘ वास्तव घटनांची मांडणी करते तर ‘अधुरा’ भूत-प्रेतांच्या साहाय्याने एक भयपट मांडायचा प्रयत्न करते. भयपट जरी म्हंटले तरी अधुरा घाबरवते कमी आणि कंटाळा अधिक आणते. 

गोष्ट काय आहे । What is the story of Adhura 

२००७ सालच्या बोर्डिंग स्कूल च्या बॅचचे विद्यार्थी २०२२ साली गेट-टुगेदर साठी उटी मधील बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र येतात. त्याच दरम्यान बोर्डिंग स्कूलच्या प्रमुखांचा मृत्यू होतो आणि बोर्डिंग स्कूल मधील आत्ताच्या बॅचमधील वेदांत (श्रेणिक अरोरा) च्या बाबतीत विचित्र घटना घडू लागतात. या सगळ्या घटनांमुळे गेट-टुगेदर साठी जमणाऱ्या लोकांची अनेक रहस्य बाहेर येऊ लागतात.. 

अधिराज(इश्वाक सिंग),मालविका(जोआ मोरानी), देव (रिजूल रे) आणि निनाद (पूजन छाब्रा) या प्रमुख मित्रांभोवती कथानक फिरते. २००७ आणि २०२२ सालचं कथानक समांतररीत्या फ्लॅशबॅक आणि आत्ता अशा पद्धतीने सिरीज मध्ये दाखविण्यात येते. फ्लॅशबॅक मध्ये बोर्डिंग च्या शेवटच्या दिवशी काय घडलं हे क्रमा क्रमाने येते. त्या घडलेल्या घटनेचा आता बोर्डिंग मध्ये घडत असलेल्या विचित्र घटनांचा काय संबंध आहे हे हळूहळू उलगडत जाते.

बऱ्याच भयपटात आढळणारे कथानकच इथेही येते पहिला भाग पाहिल्यानंतर आणि विशेषतः प्रत्येक भागाच्या सुरुवातीला येणारा डिस्क्लेमर वाचल्यानंतर जाणकार प्रेक्षक काय झालं आहे आणि काय होणार आहे याचा अंदाज सहज बांधू शकतात त्यामुळे कथानकात नाविन्य राहत नाही.

Adhura Web Series Review. Shrenik Arora
श्रेणिक अरोरा (वेदांत)- अधुरा वेब सीरिज मध्ये

वेब सिरीज कशी आहे? | How is Adhura web series?

वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘स्कूल ऑफ लाईज’ शी तुलना अपरिहार्य आहे, कारण दोन्हीच्या कथानाकात बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. दोन्हीही कथानकं उटी येथील मुलांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये घडतात, दोन्ही ठिकाणी एकमेव मुलगी मुलांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये आहे, एक लहान मुलगा दोन्हीच्या केंद्रस्थानी आहे, तसेच दोन्ही मध्ये स्कूल कॉन्सिलर महत्त्वाची भूमिका बजावते. तिथेही प्रेमाचा त्रिकोण आहे तर इथेही प्रेमाचा त्रिकोण येतो. दोन्हीच्या कथानकात साम्य असलं तरीही ‘स्कूल ऑफ लाईज’ एक उत्तम कलाकृती बनते, याउलट ‘अधुरा’ लेखन, दिग्दर्शन आणि त्यामुळे अभिनय या सर्वच बाबतीत सर्वसाधारण ठरते.

पत्रांच्या तोंडी असणारे संवाद बोली भाषेतील संवाद वाटण्याऐवजी प्रेक्षकांना सिरीज मध्ये पात्रांबद्दल अथवा घटनेबद्दल काय घडले किंवा घडणार आहे याची माहिती पुरवण्यासाठी बोलले गेले आहेत असे वाटते.दिव्यांची उघडझाप, खुर्ची सरकण्याचे, दरवाजा पटकन बंद होण्याचे आवाज, चालताना बुटांची होणारी टक टक, हाडं मोडण्याचे आवाज असे नेहमीच्या भयपटात आढळणारे अनेक रूपकं येथे प्रमाणापेक्षा जास्त वेळा वापरल्यामुळे ती भय निर्माण करण्याच्या ऐवजी कंटाळा आणतात.

मालविका(जोआ मोरानी), देव (रिजूल रे) अधुरा वेब सीरिज
मालविका(जोआ मोरानी), देव (रिजूल रे) अधुरा वेब सीरिज मध्ये

काही प्रसंग तर हास्यास्पद झाले आहेत. एका प्रसंगामध्ये मालविकाला कोणीतरी गळ्याला ओढणी चा फास देऊन मारण्याचा प्रयत्न करते. ती ही जीवाच्या आकांताने सुटका करून घेण्यासाठी धडपडते, पण दुसऱ्याच क्षणी कोणीतरी प्रँक/मस्करी केला असेल असे समजून विसरून जाते आणि काही घडलेच नाही असे होऊन बोलायला लागते, हे तर अजिबातच पटत नाही.

सिरीज मधील भुताला त्याला त्रास दिलेल्या पात्रांना मारायचं आहे हे दुसऱ्याच एपिसोड मध्ये स्पष्ट झाल्यानंतरही त्यांना मारण्यासाठी अनेक वेळा संधी येऊनही ते भूत चाळीस मिनिटांचे पाच एपिसोड का घेते हे कळत नाही त्यात प्रेक्षकांचा मात्र खूप छळ होतो.

खरंतर भयपटाला पूरक ठरेल असं हिल स्टेशन वरील बोर्डिंग स्कूल इथे आहे तरी त्याचा कल्पकतेने वापर दिग्दर्शक जोडी करू शकलेली नाही.तुम्ही दोन-तीन जरी हॉरर शोज पाहिले असतील तरी ही सिरीज बघताना पुढे काय होणारे हे तुम्ही लगेच सांगू शकाल त्यामुळे त्यात अपेक्षित असणारी भीती आणि धक्का निघून जातो. 

सिरीजचं मध्यवर्ती रहस्य देखील तितकं लक्ष वेधक आणि प्रभावी नाही, त्यामुळे अजूनच रसभंग होतो. शेवटाकडे दोन क्लायमॅक्स दाखविण्यात आले आहे, दुसरा क्लायमॅक्स हा केवळ दुसरा सीजन काढण्यासाठी टाकलेला आहे हे लगेच जाणवते. पहिला एक दोन भागांमध्येच काय घडलं असेल याचा अंदाज आपल्याला येतो त्यामुळे पुढचे पाच भाग बघणे अक्षरशः दमवणूक करणारे ठरते.

अभिनय (Acting ): 

रसिका दूग्गल (सुप्रिया) स्कूल कौन्सिलर च्या भूमिकेत तर इश्र्वाक सिंग ,अधिराज च्या भूमिकेत प्रयत्न करताना दिसतात पण मुळात लिखाणच वाईट असल्यामुळे ते प्रयत्न कमी पडतात. अंगावर काटा आणेल अशी भीती कोणाच्याच अभिनयात दिसून येत नाही. सहकारी कलाकारांचा सुमार अभिनय त्यात भरच टाकतो.

रसिका दूग्गल (सुप्रिया) स्कूल कौन्सिलर च्या भूमिकेत तर इश्र्वाक सिंग अधिराज च्या भूमिकेत
रसिका दूग्गल (सुप्रिया) स्कूल कौन्सिलर च्या भूमिकेत तर इश्र्वाक सिंग अधिराज च्या भूमिकेत

Verdict (कौल ) : 

भयपटांचे चाहते असाल तर या सिरीज च्या वाट्याला आजिबात जाऊ नका, एक-दोन प्रसंगात किरकोळ दचकवण्या शिवाय संपूर्ण सिरीज भर कुठेच भीती वाटणार नाही. सात तासांची सिरीज करण्याऐवजी दोन तासांचा चित्रपट केला असता तर तो अधिक सुसह्य झाला असता. भयपटा ऐवजी थरारपट पहायचा असेल तर हॉटस्टार वरील वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘स्कूल ऑफ लाईज’ ही वेब सिरीज मी सुचवेन त्याचा रिव्ह्यू तुम्ही याच वेबसाईटवर वाचू शकता.

Leave a Comment