ॲनिमल – अतिरंजित आणि हिंसक । Animal Movie Review in Marathi 

चित्रपट:  ॲनिमल  
कालावधी :  ३ तास २१ मिनिटं
दिग्दर्शक:  संदीप रेड्डी वांगा 
कथा :  संदीप रेड्डी वांगा
पटकथा : प्रणय रेड्डी वांगा , सुरेश बंडारु 
संवाद : सौरभ गुप्ता 
छायाचित्रण: संथन कृष्णन रविचंद्रन 
संकलक:  संदीप रेड्डी वांगा
पार्श्व संगीत: मनन भारद्वाज, प्रीतम चक्रवर्ती, श्रेयस पुराणिक, हर्षवर्धन रामेश्वर.
मुख्य कलाकार : रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल,अनिल कपूर, तृप्ती दिमरी,शक्ती कपूर, सौरभ सचदेवा, प्रेम चोप्रा,उपेंद्र लिमये.
कुठे पाहू शकता : सध्या थिएटर मध्ये 

Animal Movie Review in Marathi  संदीप रेड्डी वांगा आणि काही चित्रपट समिक्षक यांच्यात कबीर सिंग च्या वेळेस झालेले वाद तुमच्यातील बऱ्याच जणांना माहीत असतील. ज्यांना याची कल्पना नसेल त्यांनी अनुपमा चोप्रा यांच्या सोबतची त्यांची युट्युब वरची मुलाखत पहावी. या मुलाखती दरम्यानच वांगा बोलला होता कि ‘तुम्ही हिंसा-हिंसा करता ना, मी तुम्हांला दाखवतो हिंसा काय असते ते – माझ्या पुढील चित्रपटात’’ 

त्याच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना ‘ॲनिमल’ चित्रपटात तो अजून टोकाची हिंसा, सेक्स आणि स्त्री द्वेष दाखवतो ज्यामुळे सगळा चित्रपट फसतो. त्यात चित्रपट अपेक्षित वळणं घेणारा, लांबट आणि कंटाळवाणा झाल्यामुळे नीरस वाटतो. ज्यांना साऊथ मध्ये बनणारे अतार्किक हिंसा आणि मारधाड दाखवणारे चित्रपट आवडत असतील त्यांनीच ‘ॲनिमल’ पाहण्याच्या वाट्याला जावं, इतरांना तो पाहून घोर निराशा होऊ शकते आणि हा कुटुंबासोबत पाहण्याचा चित्रपट तर अजिबातच नाही. ‘ॲनिमल’ चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि एडिटर स्वतः वांगा असल्यामुळे त्याने स्वान्तसुखाय असा तीन तास वीस मिनिटाचा- लांबट चित्रपट बनवला आहे. 

Animal Movie Review in Marathi 
रणबीर कपूर -ॲनिमल मधील एका प्रसंगात

गोष्ट काय आहे । What is the story of Animal in Marathi?

स्वस्तिक स्टील इंडस्ट्रीज चे मालक असणारे बलबीर सिंग (अनिल कपूर) ह्यांची तीन मुलं आहेत दोन मुली आणि मुलगा – रणविजय सिंग (रणबीर कपूर). लहानपणापासून आई पेक्षादेखील वडीलांवर त्याचं टोकाचं प्रेम आहे. पण व्यवसायाच्या गडबडीत वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे तो वडिलांचं प्रेम-आदर मिळवण्यासाठी सतत प्रयत्नात असतो. त्याच प्रयत्नात मोठ्या बहिणीवर झालेल्या रॅगिंग चा बदला घेण्यासाठी तो  ‘कबीर सिंग’ स्टाईल तिच्या कॉलेज मध्ये जाऊन जे काही करतो त्यामुळे वडिलांशी त्याचे वाद होतात आणि त्याला देश सोडून परदेशात जावे लागते. त्याच दरम्यान मित्राच्या बहिणीला  – गीतांजलीला (रश्मिका मंदाना) तिच्या एंगेजमेंट च्या दिवशीच प्रपोज करतो आणि तिच्यासहीत परदेशात जाऊन स्थायिक होतो. 

सहा वर्षानंतर वडिलांवर अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे त्याला कुटुंबासहित भारतात परत यावे लागते. यावेळेस कंपनी ची सूत्रं तो हळू हळू आपल्या ताब्यात घेतो आणि त्याच्या वडिलांच्या हल्लेखोरांना शोधून काढून त्यांना त्याच्या पद्धतीने शिक्षा देतो. 

ॲनिमल चित्रपट कसा आहे ? | Animal Movie Review in Marathi ?

बापाचा आदर आणि प्रेम मिळवण्यासाठी मुलानी लहानपणापासून केलेली धडपड आणि ते न मिळाल्यामुळे त्याचं हळूहळू हिंस्त्र पशूत होत जाणारा रूपांतर असं काही दिग्दर्शकाला दाखवायचं असावं. पण पसरट पटकथा आणि अनावश्यक प्रसंग यामुळे चित्रपट लांबट आणि कंटाळवाणा वाटतो. 

पटकथा: 

कथेमध्ये पुढे काय होणार ह्याची उत्सुकता कुठेच वाटत नाही. कितीही हाणामाऱ्या, गोळ्या चालल्या असल्या तरी कुठेही तो बघताना आता काय होणार म्हणून आपली उत्कंठा चित्रपट कुठेच वाढवत नाही. ह्या सगळ्यांच्या मागे कोण असेल ह्याचा प्रेक्षक म्हणून बांधलेले अंदाज बरोबर होतात आणि चित्रपट अचानक संपतो. चित्रपटाच्या शेवटी येणारी नावं संपल्यानंतरही ३-४ मिनिटं चित्रपट सुरुचं राहतो आणि ‘ॲनिमल’ पार्क’ ह्या दुसऱ्या भागाची घोषणा होऊन अखेर संपतो. 

तृप्ती दिमरीचं आणि बॉबी देओल यांची पात्रं आणि त्यांच्यामुळे लांबवलेलं कथानक, इंटरव्हल च्या आधी बंदुकीच्या गोळ्यांचा अक्षरशः पाऊस पडणारा-कानठळ्या बसवणारा प्रसंग, रणबीर च्या पात्राचं नग्न होऊन फिरणं, सायकॉलॉजिस्ट ने सगळ्या घरासमोर त्याला सेक्स संदर्भात खाजगी प्रश्न विचारणे अश्या अनेक अनावश्यक प्रसंग आणि पात्रे चित्रपटभर पाहायला मिळतात.  अनेक अतार्किक प्रसंग देखील येतात – रणविजयने वीस वर्षानंतर आपल्या गावाकडच्या भावांकडे मदतीसाठी जाणे आणि त्यांनी देखील लगेच त्याच्यासाठी मदत करायला तयार होणं, गोळ्या घालून एकमेकांवर हल्ले केले जात असताना अचानक कुऱ्हाडीने एकट्याने ३० – ४० लोकांना मारणे, शेवटाकडे उगाच हाताने मारामारी करणे. अश्या अनेक अतार्किक प्रसंगांची जंत्री चित्रपटात आहे. 

रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर, ॲनिमल
रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर- ॲनिमल मधील एका प्रसंगामध्ये

मराठी लोकांना खुश करण्यासाठी बंदुकांचा विक्रेता म्हणून उपेंद्र लिमये ची वर्दी लागते, आईचा घो, जय महाराष्ट्र सारखे पठडीतले संवाद त्याच्या तोंडी दिले जातात आणि बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव  होत असताना अजय अतुल चं ‘डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजे ला’ गाणं वाजवलं जातं. ज्यांना यात आनंद वाटत असेल त्यांनी मानावा. 

काही चांगले प्रसंग देखील चित्रपटात आहेत – ट्रेलर मध्ये दिसून येणारा अनिल कपूर आणि रणबीर कपूर चा प्रसंग, रश्मिकाचा आणि रणबीर कपूर मधील भांडणाचा प्रसंग, लहान रणविजय सिंग चा एक प्रसंग असे काही मोजकेच प्रसंग चांगले म्हणून लक्षात राहतात.   

दिग्दर्शन

कबीर सिंग च्या वेळेस स्त्री पात्रावर भावनिक आणि शाररिक झालेली हिंसा आणि तरी तिने त्याला स्वीकारणे यावरती बरीच टीका झाली होती. या चित्रपटात उलट गीतांजली त्याला कानाखाली मारते पण तो देखील तिच्या बाजूला गोळी झाडून मी आता काय करू शकतो हे दाखवून दहशत निर्माण करतो. 

संदीप रेड्डी वांगाच्या  चित्रपटात दिसणारी हिंसा, सेक्स आणि स्त्री-पुरुष असण्याची त्याची व्याख्या या साऱ्या विवादास्पद गोष्टी इथे येतात. आदिम काळातील उदाहरणं देऊन स्त्रीचं रक्षण करतो तोच खरा पुरुष, कविता वगैरे करणाऱ्या दुबळ्या पुरुषांना काही स्त्री सोबत राहायचा अधिकार नाही, स्त्री च्या पार्श्वभागाबद्दल, पिरियड बद्दल अनेक मुक्ताफळे संवादातून उधळली जातात. त्यामुळेच गीतांजली ने शेवटी घेतलेला निर्णयचं काहीसा चित्रपटात पटलेला भाग वाटतो. 

काही जण म्हणतील कि असे लोक जगात नसतात का? तर हो असतात पण अश्या लोकांना दाखवताना दिग्दर्शक त्याचं उदात्तीकरण करतो का? हे पाहणं देखील महत्वाचं आहे. हिंसक दृश्यांच्या वेळेस वाजवलं जाणारं पार्श्वसंगीत, दिग्दर्शकाने लावलेले शॉट्स, एडिटिंग यातून मात्र इथे उदात्तीकरणच होतं आहे असेचं  जाणवते. 

दिग्दर्शकाची कथा सांगण्यावर बऱ्याच वेळा त्याच्या शैलीने मात केली आहे असे वाटते. बॉबी देओल ने मारामारी करण्याच्या प्रसंगात पालथ्या पडलेल्या रणबीरवरती उघडं उताणं पडून सिगारेट ओढणं, १०-१५ मिनिटं केवळ गोळ्या मारल्या जातं आहेत हेच दाखवतं राहणं, रणविजय ला नग्न फिरवणे ह्या सर्व प्रसंगातून काय साध्य होत असेल? 

Animal Review Bobby Deol
बॉबी देओल – ॲनिमल मधील एका प्रसंगात

संगीत

पार्श्वसंगीत वैशिष्ट्यपूर्ण झाल्यामुळे लक्षात राहतं विशेषतः शिट्टीचा केलेला वापर कल्पक वाटतो. पण प्रत्येक प्रसंगात पार्श्वसंगीताचा अती वापर झाला आहे ज्यामुळे काही काही प्रसंगात तर त्याचा आवाज इतका जास्त होतो कि संवाद ऐकणं देखील अवघड होऊन जातं. चित्रपटातील ‘पपा मेरी जान .. ‘ आणि ‘सतरंगा ..’ हि गाणी लक्षात राहतात. 

अभिनय

चित्रपट पाहण्याजोगा होतो तो केवळ रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या अभिनयामुळे. ते खरोखरचे बाप आणि मुलगा आहेत असे वाटते. ट्रेलर मध्ये सर्वानीच पाहिलेला – दोघांचा एकमेकांचे रोल करण्याचा प्रसंग प्रभावी झाला आहे. 

रणबीर कपूर आजच्या घडीचा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. बर्फी मधला मर्फी, तमाशा मधील वेद , संजू मधील संजय दत्त आणि ‘ॲनिमल’ मधील रणविजय सिंग बघून तो किती वैविध्यपूर्ण भूमिका करू शकतो ह्याची कल्पना येते. इथून पुढे मात्र त्याने अधिक चांगल्या स्क्रिप्ट निवडण्याची गरज आहे असे वाटते. 

रश्मिका मंदानाने तिच्या वाट्याला आलेल्या महत्वाच्या प्रसंगात बाजी मारली आहे. मुका दाखविण्यात आलेला बॉबी देओल चित्रपटाच्या उत्तरार्धात येतो पण केवळ २-३ सीनच त्याच्या वाट्याला येतात. शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, सुरेश ओबेरॉय यांच्या वाट्याला जास्त प्रसंग नाहीत. 

Animal Movie Review in Marathi - अनिल कपूर
अनिल कपूर – ॲनिमल मधील एका प्रसंगात

चित्रपट पाहावा का? : 

चित्रपटात दाखविण्यात येणारी हिंसा, रक्तपात, प्रौढ दृशे तुम्हांला सहन होत असतील, अतार्किक संवाद, दृश्ये, पात्रे याची तुम्हांला पर्वा नसेल, तुमच्याकडे साडे तीन तास असतील किंवा तुम्ही रणबीर कपूर चे फॅन्स असाल तर तुम्ही हा चित्रपट थिएटर मध्ये बघू शकता नाहीतर इतर इच्छुकांसाठी – नेटफ्लिक्स वर काही महिन्यात चित्रपट येईलच.  

Leave a Comment