आर्चिज – चित्रपट कसा आहे ?। The Archies Movie Review in Marathi   

चित्रपट:  आर्चिज 
कालावधी :  २ तास २१ मिनिटं
दिग्दर्शक: झोया अख्तर 
कथा/पटकथा/संवाद  :  झोया अख्तर, फरहान अख्तर, आयेशा देवित्रे  
छायाचित्रण:  निकोस अँड्रीट साकीस 
संकलक:  नितीन बैद 
संगीत: शंकर एहसान लॉय, आईसलँडर, लॉय मेन्डोन्सा, एहसान नूरानी, अंकुर तिवारी  
मुख्य कलाकार : सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा, वेदांग रैना,मिहीर आहूजा, अदिती सैगल ,युवराज मेंडा,कोयल पुरी, ॲली खान
कुठे पाहू शकता : नेटफ्लिक्स 

Archies Movie Review in Marathi  आर्चिज चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहण्याचं प्रमुख कारण हे त्यामध्ये प्रमुख भूमिकेत असणारे नेपो किड्स – अर्थात चित्रपट सृष्टीतील मोठी घराणी समजली जाणारी खान, कपूर आणि बच्चन यांची मुलं- मुली. 
सुहाना खान (शाहरुख खान ची मुलगी ) ख़ुशी कपूर (श्रीदेवी आणि बोनी कपूर ची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण ) अगस्त्य नंदा (अमिताभ बच्चन यांचा नातू – मुलीचा मुलगा) हे तिघे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या तिघांव्यतिरिक्त देखील इतर ४ नवीन कलाकारांच्या यात भूमिका आहेत, पण प्रमुख भूमिकेत हे तिघेच आहेत.

सर्वाना जरी या तिघांसाठी चित्रपट पाहायची उत्सुकता होती तरी मला प्रामुख्याने चित्रपटाची दिग्दर्शक झोया अख्तर साठी चित्रपट पहायचा होता. लक बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो, गली बॉय  या सारखे दर्जेदार चित्रपट देऊन स्वतःचा एक प्रेक्षकवर्ग तिने निर्माण केला आहे.बोचऱ्या टीकेला सामोरे जावे लागले नाही. त्यामुळेच कदाचित वरील घराण्यांनी त्यांच्या मुलांना लाँच करण्यासाठी तिची निवड केली असावी. 

Archies Movie Review in Marathi
आर्चि (अगस्त्य नंदा), जगहेड(मिहीर अहुजा), एथेल (अदिती सैगल), बेट्टी (ख़ुशी कपूर), रेज्जी (वेदांग रैना), डिल्टन (युवराज मेंढा) आणि वेरॉनिका (सुहाना खान) आर्चिज चित्रपटात

आर्चि कॉमिक विषयी थोडक्यात :

कॉमिक म्हणजे चित्र आणि शब्दांच्या एकत्रित मांडणीतून सांगितली गेलेली कथा. मराठी मध्ये चंपक किंवा ठकठक मासिकात येणाऱ्या कथा तुम्हांला माहित असतील, किंवा चाचा चौधरी, ध्रुव सारखे कॉमिक किंवा सकाळ पेपर मध्ये येणारा चिंटू ह्याचं समजण्यासाठी ढोबळ उदाहरण देता येईल. तसंच परदेशातील आर्चि हे कॉमिक. 

आर्चि हे नावं ऐकल्यावर सैराट मधील आर्ची आपल्या समोर येईल पण इथे मात्र आर्चि हा अमेरिकेत राहणारा मुलगा आहे आणि त्याच्या नावावरूनच (आर्चि अँड्रू ) कॉमिकचं नाव आर्चि ठेवण्यात आलं आहे. ४० च्या दशकात सुरु झालेल्या आर्चि कॉमिकच्या करोडोंनी प्रति आजतागयत खपल्या आहेत. पौगंडावस्थेतील आर्चि आणि त्याचे मित्र- मैत्रिणी यांचे दैनंदिन आयुष्य, त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्या, परस्परातील नातेसंबंध  हा यातील प्रमुख विषय असे. भारतात राहणाऱ्या आणि इंग्रजी जाणणाऱ्या अनेक जणांच्या लहानपणाच्या वाचनाचा तो अविभाज्य भाग होता.आर्चि आणि त्यासोबतच्या इतर पात्रांना एकत्रितपणे आर्चिज असे म्हंटले जाते. आर्चिज मध्ये दिसून येणारे आर्चि, बेट्टी आणि वेरॉनिका यांच्यातील प्रेमाच्या त्रिकोणाचा अनेक हिंदी चित्रपटाच्या कथानकात वापर करण्यात आलेला दिसून येईल. 

गोष्ट काय आहे । What is the story of the movie The Archies in Marathi?

वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्चि हे कॉमिक परदेशी आहे. भारतीयकरण करताना कॉमिक मधील पात्रांना, १९६४ सालातील १५-१८ वयोगटातील मुलं-मुली दाखविण्यात आलं आहे. कॉमिक मधील त्यांची मूळ इंग्लिश नावं देखील तीच ठेवण्यात आली आहेत, त्याला कारण देताना त्यांना अँग्लो इंडियन (स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश आणि भारतीय यांच्या लग्नातून निर्माण झालेली पिढी) दाखविण्यात आलं आहे.  

चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आलेले सात मित्र-मैत्रिणी आर्चि (अगस्त्य नंदा), वेरॉनिका (सुहाना खान), बेट्टी (ख़ुशी कपूर), रेज्जी (वेदांग रैना), जगहेड(मिहीर अहुजा), एथेल (अदिती सैगल), डिल्टन (युवराज मेंढा) त्यांच्या पालकांसोबत रिव्हर डेल नामक एका सुंदर अश्या काल्पनिक शहरात राहत आहेत. वेरॉनिकाच्या वडिलांना रिव्हरडेल मधील ग्रीनपार्क हटवून तिथे मोठे हॉटेल बांधायचे आहे आणि पैशाच्या जोरावर ते सर्वाना विकत घेत आहेत. हे कळल्यानंतर सातही मित्र मैत्रिणी एकत्र येतात आणि सर्व शहराला देखील एकत्र आणून ग्रीनपार्क वाचवतात. 

सुहाना खान - आर्चिज चित्रपटात
सुहाना खान – आर्चिज चित्रपटात वेरॉनिका म्हणून

आधुनिकीकरणातून पर्यावरणाचा होत जाणारा नाश आणि त्याविरुद्ध पौगंडावस्थेतील मित्र मैत्रिणींनी दिलेला लढा; असे ढोबळ कथानक म्हणता येईल. या मध्ये इतर कथानकं देखील येतात. आर्चि, वेरॉनिका आणि बेट्टी यांचा प्रेमाचा त्रिकोण, एथेलचं बदलत चाललेल्या जगात- स्वतःला कितपत बदलवायचं यासाठी चाललेलं द्वंद्व, डिल्टनचं रेज्जीवरचं एकतर्फी अव्यक्त प्रेम, स्वतःला नक्की काय करायचंय या धडपडीत असलेला रेज्जी, सतत गोंधळलेला जगहेड अशी अनेक उपकथानकं देखील इथे येतात. 

आर्चिज चित्रपट कसा आहे ? | How is the film The Archies?

चित्रपट तुम्हांला चकचकीत दृश्य चौकटीने खेचून घेतो पण त्याच्या सरधोपट आणि सरळसोट कथेने पात्रांविषयी काहीच वाटू देत नाही. रिव्हरडेल नामक ६० च्या दशकातील काल्पनिक शहर निर्माण करण्यात निर्माण कर्त्यांनी कुठलीच कसर ठेवली नाहीए. वेशभूषा, रंगसंगती, त्या काळातील दुकानं, घरं, या सर्व बारीक-सारीक गोष्टींवरती खूप मेहनत घेतलेली जाणवते; पण कथा मात्र कॉमिक मध्ये दिसते तशीच ठेवण्यात आली आहे. 

राजकारण, समलैंगी संबंध, अल्पसंख्यांकांचे प्रश्न, पर्यावरण आणि आधुनिकीकरण अश्या अनेक गोष्टींचा कथेत समावेश करून घेण्यात आलेला आहे, जे कि कौतुकास्पद आहे, पण त्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तर देखील सहज सुटलेली दिसतात.कुठलाही निर्माण झालेला प्रश्न किंवा नात्यांमधील ताण-तणाव दुसऱ्याच प्रसंगात सुटतात.  कॉमिक स्ट्रीप च्या पहिल्या पॅनेल मध्ये दाखवलेला प्रश्न चौथ्या- पाचव्या पॅनल पर्यंत सुटावा तसं काहीसं. 

काहींचं असं म्हणणं असू शकतं कि कॉमिक वरून चित्रपट बनवला आहे तर तो तसाच असणार, पण इथे तुम्ही कॉमिक चं कार्टून किंवा ऍनिमेशन बनवत नाहीए तुम्ही हाडामासाची माणसं जेव्हां पात्र म्हणून काल्पनिक का होईना पण खऱ्या जगाचा भाग म्हणून दाखवता; त्यावेळेस खऱ्या जीवनातील, नात्यांमधील गुंतागुंत कथेत येणे अपेक्षित असते; ज्यामुळे लोकांना ती कथा आपलीशी वाटेल – तसे मात्र इथे घडताना दिसत नाही. 

अभिनय

आता सर्वांत महत्वाचा प्रश्न जो सर्वानाच जाणून घ्यायची उत्सुकता होती कि नेपो किड्स चा अभिनय कसा आहे?
तर तो चांगला आहे. कथा साधी असल्यामुळे जो काही त्यांना अभिनयाला वाव मिळाला आहे तो त्यांनी चांगला केला आहे. इतर स्टार कलाकारांच्या मुलामुलींच्या पदार्पणातल्या चित्रपटांशी तुलना केली असता तर ह्यांचा अभिनय फारच उत्तम म्हणावा लागेल. झोया अख्तर सारखी दिगदर्शिकेमुळे देखील त्यांच्या अभिनयात बराच फरक पडला असावा. मला विशेषतः तिघांपैकी बेट्टी ची भूमिका करणारी ख़ुशी कपूर चा अभिनय जास्त चांगला वाटला. भविष्यात अनुभवाने ते निश्चितच जास्त चांगले काम करू शकतील. या तिघांव्यतिरिक्त प्रमुख असणाऱ्या बाकी चौघांचा अभिनय देखील उत्तम झाला आहे, ते कुठेही कमी वाटत नाही; परंतु त्यांच्या वाट्याला एकूणच प्रसंग कमी आलेले आहेत. 

खुशी कपूर - आर्चिज चित्रपटात
खुशी कपूर – आर्चिज चित्रपटात बेट्टी म्हणून

चित्रपट पाहावा का? : 

चित्रपट गंभीर विषय हाताळतो; पण खोलात जात नाही, गाणी ऐकवतो; पण गुणगुणत ठेवत नाही, निर्मिलेल्या वातावरणाचं कौतुक वाटतं; पण पात्रांबद्दल आपुलकी वाटत नाही. चित्रपट पाहिला जातो; पण मजा येतं नाही. अश्या स्थितितला चित्रपट पाहायचा का सोडून द्यायचा ते तुम्ही ठरवू शकता.

Leave a Comment