बँशीज ऑफ इनीशेरीन | Banshees of Inisherin Film Review in Marathi

उतारवयातील मित्रांमधील महत्वाकांशा आणि चांगुलपणातील द्वंद्व.  

फिल्म :  बँशीज ऑफ इनिशिरिन
कालावधी :  १ तास ५३ मिनिटे
दिग्दर्शक: मार्टिन मॅकडॉनघ
लेखक : मार्टिन मॅकडॉनघ
सिनेमॅटोग्राफी : बेन डेव्हिस 
मुख्य कलाकार :  कोलिन फॅरेल, ब्रॅण्डन ग्लिसन, केरी कॉनडन, बॅरी किओगन 
कुठे पाहू शकता : डिज्नी प्लस हॉटस्टार । Banshees of Inisherin Film Review OTT platform.

आयरिश दंतकथेमध्ये ‘बँशी’ म्हणजे एका स्त्री आत्म्याचे अशुभ आक्रंदन. घरातील कोणा व्यक्तीचा मृत्यू ते सूचित करते. ‘इनीशेरीन मधील आक्रंदन’’ असं शब्दशः भाषांतर, फिल्मच्या नावाचं करता येईल. 

नावावरून एखादी भुतांची अथवा झोंबी वरची हि फिल्म असावी असा गैरसमज होऊ शकतो, पण तशी हि फिल्म नाही. उतरवायला लागलेले ‘लॉरेल आणि हार्डी’ शोभतील, असे दोन जिवलग मित्र. त्यातील एक मित्र अचानक ठरवतो, कि मला तुझ्याशी या पुढे बोलायचं नाही. तुझा आणि माझा  मार्ग आता वेगळा. त्यानंतर जे घडतं जातं ते म्हणजे हि फिल्म आहे. चांगुलपणा आणि महत्वकांक्षा यावरती फिल्म विचार करायला लावते. 

कोलिन फॅरेल पॉरिक च्या भूमिकेमध्ये

गोष्ट काय आहे ? । What is the story of Banshees of Inisherin?

१९२३ सालच्या आयर्लंड मधील इनिशेरीन हे काल्पनिक गाव. संथ गतीने आयुष्य चाललेल्या या छोट्या गावांत सगळेच जण एकमेकांना ओळखत आहेत. या गावातील उतरवायला लागलेले पॉरिक (कोलिन फॅरेल) आणि कॉल्म (ब्रॅण्डन ग्लिसन) हे दोघेही जिवलग मित्र. वर्षानुवर्षे एकमेकांना भेटणे, गप्पा मारणे, पब मध्ये दारू पिणे ही दिनचर्या ते नियमितपणे करत आलेले आहेत.अचानक एके दिवशी, काहीही विशेष घडलेले नसताना, कॉल्म पॉरिक ला सांगतो कि यापुढे आपला संबंध संपला. आपण एकमेकांशी बोलायचं नाही. 

Banshees of Inisherin Film Review in Marathi
ब्रॅण्डन ग्लिसन आणि कोलिन फॅरेल एका दृश्यामध्ये

गोंधळलेल्या पॉरिक ला काहीच कळत नाही, कि असं काय घडलं ज्यामुळे एवढ्या वर्षाची आपली मैत्री तू क्षणात तोडतो आहेस. वारंवार विचारूनही काही उत्तर मिळत नाही. हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पसरते आणि सर्व जण पॉरिक ला त्याबद्दल विचारायला लागतात. अस्वस्थ आणि उदास झालेल्या आपल्या भावाची अवस्था न बघवून  शिवॉन (केरी कॉनडन) कॉल्म ला जाब विचारते. त्यावेळेस झालेला संवाद असा. 

केरी कॉनडन शिवॉन च्या भूमिकेमध्ये
शिवॉन : तू असं अचानक पणे माझ्या भावाशी मैत्री तोडू शकत नाही. 
कॉल्म :  का नाही?
शिवॉन : का नाही ! कारण हि चांगली गोष्ट नाही. 
|            दारू पिल्यावर तो काही तुला बोलला का? 
कॉल्म : उलट त्याने दारू पिल्यावरच मला त्याच्याशी बोलावसं वाटत. त्याचा जो शुद्धीत असण्याचा काळ आहे,
      त्याच्याशी मला प्रॉब्लेम आहे. 
शिवॉन : काय? तुला प्रॉब्लेम काय आहे नक्की?
कॉल्म :  तो कंटाळवाणा आहे, शिवॉन.  
शिवॉन : तो काय ! काय?
कॉल्म : तो कंटाळवाणा आहे. 
शिवॉन : पण ..पण तो नेहमीच तसा आहे.  असं काय बदललं आत्ता? 
कॉल्म : मी बदललोय…  माझ्या आयुष्यात कंटाळ्याला आता जागा राहिलेली नाहीये. 
शिवॉन : आयर्लंड किनाऱ्याच्या एका बेटावर राहून, या पेक्षा वेगळं असं काय अपेक्षित करतो आहेस तू कॉल्म? 
कॉल्म : थोडीशी शांतता, शिवॉन. बाकी काही नाही. मनातली थोडी शांतता. तू ते समजू शकतेस, नाही का?  

आयुष्याच्या उतारवयात निसटत चाललेलं आयुष्य पाहून,आपल्या मृत्यूनंतरही  लोकांच्या आपण लक्षात राहू का? असा प्रश्न कॉल्म ला पडलाय. लोकांच्या लक्षात राहील असं आपण काहीच केलं नाही ह्याची जाणीव त्याला झालीये. त्यामुळेच पॉरिक सोबतच्या शिळोप्याच्या गप्पा त्याला निरर्थक वाटायला लागल्या आहेत. वर्षानुवर्षांचा आपला मित्र पॉरिक त्याला कंटाळवाणा वाटू लागलाय. मोझार्ट -बिथोवन सारखं अजरामर संगीत निर्माण करून, मृत्यूनंतरही लोकांच्या आपण स्मरणात राहावं, यासाठी व्हायोलीनवर ट्यून तयार करण्यावर जास्तीत जास्त वेळ द्यायचा त्याने ठरवलं आहे. 

या सगळ्यात पॉरिक ची अवस्था मात्र बिकट झाली आहे. साधा -सरळ असणारा पॉरिकला आपण खरंच लोकांना आवडत नाही आहोत का? आपण खरंच एक कंटाळवाणी व्यक्ती आहोत का? असे प्रश्न पडलेत. तो वारंवार कॉल्मशी बोलायचा अयशस्वी प्रयत्न  करतो. ज्यामुळे चित्रपट अनपेक्षित आणि धक्कादायक असा हिंसक होत जातो. चित्रपटात बार मध्ये घडणारा एक प्रसंग फार मार्मिक आहे. मद्यधुंद पॉरिक जेव्हां कॉल्म शी बोलायला जातो तेव्हां. 

पॉरिक : तू, कॉल्म डोहर्टी, तुला माहितीये तू पूर्वी कसा होता?   
कॉल्म  : नाही, कसा होतो मी पॉरिक? 
पॉरिक : चांगला. तू चांगला होतास. 
      (बार मधील सगळ्यांना उद्देशुन ) नाही का?  
      आणि आत्त्ता तुला माहितीए  तू आत्ता कसा आहेस? 
      चांगला नसलेला. 
कॉल्म  : म्हणजेच, चांगुलपणा कायम टिकत नाहीए पॉरिक. नाही का? 
       पण मी तुला सांगतो काय टिकतं.   
पॉरिक :  काय? मूर्खासारखं संगीत म्हणू नकोस. 
कॉल्म  :  हो. संगीतच टिकतं.  
पॉरिक :  मला वाटलंच.  
कॉल्म  :  चित्रं टिकतात, कविता टिकते.   
पॉरिक :  तसंच चांगुलपणाही टिकतो. 
कॉल्म  :  १७ व्या शतकात कोण किती चांगलं होतं?  कोण लक्षात ठेवेल?
पॉरिक : कोण? 
कॉल्म  : एकही जण नाही. 
       तरी त्या काळांतील संगीत आपल्या लक्षात आहे. प्रत्येक जण मोझार्ट ला ओळखतो. 
पॉरिक : मी नाही ओळखत त्याला. बघ, इथेच तुझी थियरी चुकली. 
      आणि आपण चांगुलपण बद्दल बोलतोय. नाकी ज्याचं तू नाव घेतलं त्याच्याबद्दल. 
      माझी आई, ती चांगली होती. माझ्या लक्षात आहे ती. 
      माझे बाबा ते चांगले होते, ते लक्षात आहे माझ्या. 
      आणि माझी बहीण ती चांगली आहे. ती माझ्या लक्षात राहील. 
      माझ्या अंता पर्यंत ती माझ्या लक्षात राहील.          
कॉल्म  : आणखी कोण लक्षात ठेवेन?
पॉरिक : आणखी कोण काय?
कॉल्म  : आणखी कोण लक्षात ठेवेन तुझ्या बहिणीला - शिवॉनला आणि तिच्या चांगुलपणाला? 
       कोणीही नाही. आणखी ५० वर्षांत आपल्यातील एकालाही कोणी लक्षात ठेवणार नाही. 
       असं असलं तरी, शतकापूर्वी एका  माणसानं तयार केलेलं संगीत अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
पॉरिक : मला फरक पडत नाही मोझार्ट कि बोरोवन ..जी काही हास्यास्पद नावं असतील त्यांची. 
      मी  ‘पॉरिक सुलेवॉंन’ आहे आणि मी चांगला आहे. 
      तूला माझ्यापेक्षा अश्या माणसाशी मैत्री केलेली चालते जो आपल्या मुलाला रोज रात्री काळं निळं पडेपर्यंत मारतो? 
      तू चांगला होतास कॉल्म .. का तू कधीच चांगला नव्हता….  देवा!! बहुतेक तू कधीच चांगला नव्हतास.     

चित्रपट अनेक गोष्टींबद्दल विचार करायला लावतो. चांगल्या माणसांनां रोचक होण्यासाठी वाईट व्हावंच लागतं का? महत्वाकांक्षा माणसाला एकमेकांशी तुसडं वागायला भाग पाडते का? महत्वाकांक्षी आणि तरीही सर्वांशी चांगलं आयुष्य जगता येईल का? असे अनेक प्रश्न चित्रपट बघताना पडतात.

काही लोकांबद्दल म्हंटल जातं, स्वभावाने लोकं चांगली आहेत पण कर्तृत्व काही नाही. आपल्या आजूबाजूला फार काही महत्वाकांक्षा नसलेली परंतु आनंदाने आणि एकमेकांशी चांगलं वागणारी ‘पॉरिक’ सारखी माणसं आपण पाहतो. काही काळानंतर हि माणसं जगात कोणाच्या  लक्षातही राहणार नाही. पण त्यांच्या आप्तांसाठी ती कायमचं एक चांगली व्यक्ती म्हणून स्मरणात राहातील.

आपल्या पश्चात पण लोकांनी – जगाने आपल्याला लक्षात ठेवावं हि इच्छा बहुतांश लोकांची असते. उतारवयात आपल्या पश्चात लोकं आपलं काय लक्षात ठेवतील, तो केवळ चांगुलपणा असेल का आपण निर्माण केलेली एखादी वस्तू- कलाकृती असेल? महत्वाकांक्षे साठी आपल्याला चांगुलपणाचा बळी द्यावा लागेल का?

ब्रॅण्डन ग्लिसन कॉल्म च्या भूमिकेमध्ये

चित्रपट कसा आहे । How is ‘Banshees of Inisherin’?

अभिनय, दिग्दर्शन, पटकथा आणि तांत्रिक दृष्ट्या चित्रपट उत्तम आहे. यावर्षीच्या ऑस्करमध्ये उत्तम अभिनयाच्या विभागामध्ये  ‘कोलिन फॅरेल’, सहाय्यक अभिनेता/अभिनेत्री च्या  कॅटेगरीमध्ये ‘केरी कॉनडन’ आणि  ‘बॅरी किओगन’ आणि पटकथेकरता मार्टिन मॅकडॉनघ ह्यांना देखील निश्चित संधी आहे. 

बॅरी किओगन ने साकारलेला साधा-भोळा डोमिनिक छोटी भूमिका असूनही विशेष लक्षात राहतो. आपले एकतर्फी प्रेम शिवॉन कडून नाकारल्या नंतर डोमिनिक जेव्हा ‘देअर गोज दॅट ड्रीम..” असे उच्चारतो तेव्हां त्याने झालेला प्रेमभंग शांतपणे स्वीकारलेला असतो. चित्रपटातील हा प्रसंग हृदयस्पर्शी झाला आहे.

‘केरी कॉनडन’ आणि  ‘बॅरी किओगन’ – शिवॉन आणि डोमिनिक च्या भूमिकेमध्ये

बेन डेव्हिस ची सिनेमॅटोग्राफी कुठंही कृत्रिम वाटतं नाही. नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून सुंदर चित्र चौकटी तो आपल्या समोर आणतो. आयर्लंड मधील छोटंसं गाव त्याने छान टिपलं आहे. 

चित्रपट गंभीर विषय हाताळत असला आणि नंतर अघोरी हिंसक होत असला तरी बऱ्याच ठिकाणी तो आपल्याला हसवतोही  हेच पटकथेचं यश म्हणावं लागेल. या वर्षीच्या ऑस्कर च्या उत्तम चित्रपटाच्या पुरस्कारासाठी प्रमुख दावेदार असणारा हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकता. 

Leave a Comment