Bawaal Movie Review। बवाल – महत्त्वाकांक्षी पण फसलेला चित्रपट

चित्रपट:  बवाल
कालावधी :  २ तास १५ मिनिटं
दिग्दर्शक:  नितेश तिवारी 
कथा पटकथा आणि संवाद :  पियुष गुप्ता, श्रेयस जैन, निखिल मल्होत्रा, अश्विनी अय्यर तिवारी.
छायाचित्रण: मितेश मिरचंदानी
संकलक:  चारू श्री रॉय
पार्श्व संगीत: मिथुन शर्मा
मुख्य कलाकार :  वरून धवन, जान्हवी कपूर, अंजुमन सक्सेना, मनोज पावा,प्रतीक पाचोरी,अग्रिम मित्तल.
कुठे पाहू शकता : अमेझॉन प्राईम व्हिडिओ

Bawaal Movie Review : ‘बवाल’ म्हणजे गोंधळ,भांडण,राडा – नावाप्रमाणेच ”बवाल” चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही पाहिला असेल तर तो कमालीचा गोंधळात टाकणारा आहे. ट्रेलर सुरू होतो तो विनोदीपटा सारखा, नंतर तो रोमँटिक कॉमेडी च्या मार्गाने जातो, मग तो जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यातल्या नातेसंबंधावर आहे असे वाटायला लागते आणि अचानक शेवटाकडे तो दुसरे महायुद्ध दाखवून आपल्याला अजूनच संभ्रमात टाकतो.

चित्रपटाची कथा काय आहे याचा कुठलाच अंदाज ट्रेलर देत नाही, जे एका अर्थाने चांगलं असलं तरी इतके वेगवेगळे विषय एकाच चित्रपटात प्रभावी रित्या हाताळले जाऊ शकतील का अशी शंका देखील तो मनात निर्माण करतो.  ‘दंगल‘ आणि ‘छिछोरे‘ चित्रपटाचा दिग्दर्शक असणाऱ्या नितेश तिवारीचा हा चित्रपट असल्यामुळे अनेक शंका कुशंका असून देखील चित्रपट पाहण्याचे ठरविले आणि मनातली शंका दुर्दैवाने खरी ठरली.

काय आहे ‘बवाल’ ची गोष्ट। What is the story of bawaal?

पुढे चित्रपटातील अनेक स्पॉईलर आहेत, तुम्हाला ते वाचायचे नसतील तर तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर पुढचा रिव्यू वाचावा. 

लखनऊ मध्ये राहणारा अजय दीक्षित उर्फ अज्जू भैया (वरूण धवन) हा शाळेत इतिहासाचा शिक्षक आहे. समाजामध्ये स्वतःची एक चांगली इमेज (प्रतिमा) निर्माण करण्यासाठी त्याने स्वतःबद्दल अनेक खोट्या गोष्टी पसरविलेल्या आहेत, घरची बेताची परिस्थिती असतानाही त्याने अनेक महागड्या वस्तू कर्जावर घेतलेल्या आहेत. त्याचं एकच ध्येय वाक्य आहे. “माहौल ऐसा बनाओ कि लोग माहौल याद रखें, ना कि उसका रिजल्ट।

Bawaal Movie Varun Dhawan बवाल मधील एका दृश्यात
वरूण धवन ‘बवाल’ मधील एका दृश्यात. PC : Youtube Trailer.

स्वतःची खोटी चांगली प्रतिमा समाजात टिकवून ठेवण्यासाठी तो सर्व गुण संपन्न दिसणाऱ्या सुंदर, सुशील, हुशार अशा निशाशी (जान्हवी कपूर) लग्न करायचं ठरवतो. निशा त्याला प्रामाणिकपणे तिला फिट येतात हे सांगते पण गेल्या दहा वर्षात तिला त्या न आल्यामुळे आणि तिच्या बाकी गोष्टी त्याची प्रतिमा उंचावणाऱ्या असल्यामुळे अज्जू तिच्याशी लग्न करायला तयार होतो. परंतु लग्नाच्या दिवशीच तिला फिट येते आणि अज्जू घाबरतो. बाहेर कुठे गेलो आणि तिला फिट आली तर आपली प्रतिमा समाजात खराब होईल या भीतीने लग्नानंतर तो तिच्यापासून अंतर राखायचं ठरवतो. त्यांच्यात नवरा बायकोचे संबंध राहत नाहीत तसेच तिला तो कुठेही बाहेर नेत नाही. समाजातील इमेजचा विचार करून तिच्यापासून घटस्फोट घ्यायचंही तो टाळतो. 

अज्जू कडून एके दिवशी आमदाराच्या मुलाला कानाखाली मारली जाते ज्यामुळे त्याच्या नोकरीवर आणि समाजातील त्याच्या प्रतिमेवर गदा येते. अशा वेळेस आपली प्रतिमा सुधारण्यासाठी त्याच्याच भाषेत बोलायचं झालं तर क्रांतिकारी असा युरोपला जायचा निर्णय तो घेतो. दुसरे महायुद्ध ज्या ठिकाणी घडलं अश्या महत्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, सोशल मिडिया च्या माध्यमातून, शाळेतील विद्यार्थ्यांना दुसरं महायुद्ध शिकवण्याचं तो ठरवतो. वडिलांकडून युरोप ट्रिप ला लागणाऱ्या पैशाची सोय करण्यासाठी निशालाही तो यूरोप ट्रिप साठी सोबत घेतो. 

यानंतरचा चित्रपट म्हणजे युद्धातील ठिकाणावर गेल्यानंतर तिथल्या कथा ऐकून आपल्या आयुष्यातील अडीअडचणी, समस्या, दुःख  या युद्धातील मोठ्या दुःखद घटनांसमोर काहीच नाही याची जाणीव दोघांना होणे आणि त्यांचं एकमेकांच्या जवळ येणे हा आहे. 

चित्रपट कसा आहे ? | How is Bawaal Movie ?

चित्रपटाचा लखनऊ मध्ये घडणारा पूर्वार्ध चांगला झाला आहे. उत्तरार्धात दुसऱ्या महायुद्धाची जोड देण्याऐवजी लखनऊ मध्येच पूर्ण चित्रपट पुढे नेला असता तर तो अधिक चांगला बनला असता असे वाटते. दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धावर आपण येऊच पण त्याच्या आधीही चित्रपटात अनेक न पटणाऱ्या गोष्टी येतात. 

इतिहासाची अजिबातच माहिती नसणाऱ्या अज्जू ला शिक्षक कोणी आणि कसे केले हे कळत नाही. स्वतंत्र, हुशार, स्वतःच्या पायावर उभी असणारी आणि अनेक वेळा परदेशात जाऊन आलेली, परदेशामध्ये चोराला पकडणारी, जुगाड करून परदेशात हॉटेल रूम मध्येच अन्न बनवणारी स्वावलंबी,धाडसी अशी निशा –  लग्नानंतर मात्र आपला पती आपल्याशी नीट वागत नाही आणि स्वतःच्या घरच्यांचा पाठिंबाही आपल्याला आहे असे असतानाही अज्जू  सोबत इतका काळ का राहते याचं कुठेच स्पष्टीकरण येत नाही.

दिग्दर्शक नितेश तिवारी चा हेतू काही प्रमाणात मी समजू शकतो. ज्यावेळेस आपल्या छोट्या दुःखांसमोर एखादं मोठं दुःख आपण पाहतो त्यावेळेस आपली दुःख, आपल्या समस्या आपल्याला शुल्लक वाटू लागतात. नाझी लोकांच्या छळ छावण्यांमधून वाचलेल्या विक्टर फ्रँकील या लेखकाचं ‘मॅन्स सर्च फोर मिनिंग‘ हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना याचा अनुभव आला असेल. कदाचित हेच दिग्दर्शकाला ‘बवाल’ मधून दाखवायचं असावं.

Bawaal Movie Janhavi kapoor जान्हवी कपूर बवाल मधील एका दृश्यात
जान्हवी कपूर ‘बवाल’ मधील एका दृश्यात. PC : Youtube Trailer.

परंतु वैवाहिक जीवनातील समस्येची तुलना थेट दुसऱ्या महायुद्धामध्ये लोकांना सामोरे जावे लागणाऱ्या दुःखाशी करण्याचा महत्त्वाकांशी प्रयत्न इथे दिग्दर्शक करायला जातो आणि अयशस्वी ठरतो. याला प्रामुख्याने कारणीभूत ठरतं ते यातील संवाद आणि युद्धाचे चित्रीत करण्यात आलेले प्रसंग.

लाखो लोकांचे जिथे हत्या करण्यात आली अशा दुसऱ्या महायुद्धाचं मूल्य शिक्षणाचा धडा दिल्यासारखं – युद्ध वाईट आहे, जास्त हाव चांगली नाही, तुमच्याकडे एकच दिवस जगण्यासाठी असेल तर तुम्ही काय कराल? असं सुलभीकरण केलं गेलेल आहे. एके ठिकाणी तर निशा म्हणते “हम भी थोड़े बहुत हिटलर जैसे है ना, जो अपने पास है उससे खुश नहीं, जो दूसरे के पास है वह चाहिए।” लाखो निरागस स्त्री-पुरुष लहान मुलांना मारणारा हिटलर इतका साधं सरळ व्यक्तिमत्व होतं का? 

औष्विट्झ असं ठिकाण ज्या ठिकाणी हजारो लोकांना गॅस चेंबर मध्ये गुदमरवून मारण्यात आलं, त्याबद्दल बोलताना निशा म्हणते “हर रिलेशनशिप अपने औष्विट्झ से गुजरती है।” नातेसंबंधा मधील समस्येचं औष्विट्झ मधील मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेशी साम्य दाखवणे हे फारच असंवेदनशील आहे. 

Bawaal Movie Review जान्हवी कपूर आणि वरुण धवन बवाल मधील एका दृश्यात
जान्हवी कपूर आणि वरुण धवन ‘बवाल’ मधील एका दृश्यात. PC : Youtube Trailer.

अभिनय :

गुड लक जेरी‘ आणि ‘गुंजन सक्सेना‘ नंतर थेट ओटीटी वर प्रदर्शित होणारी जान्हवीची हि तिसरी फिल्म. वरूण धवन आणि जान्हवी कपूर यांनी प्रयत्न चांगला केला आहे पण तो प्रयत्नच राहतो. भावनिक प्रसंगांमध्ये ते प्रभाव पाडू शकत नाहीत. चित्रपटातील सहकलाकार मात्र अभिनयात बाजी मारून जातात. अजयचा विद्यार्थी पापोन (अग्रिम मित्तल), अजय चे आई-वडिलांचे काम करणारे मनोज पावा आणि अंजुमन सक्सेना, अजय चा मित्र बिपिन (प्रतीक पाचोरी) हे कलाकार छोट्या भूमिकांमध्ये देखील छाप टाकून जातात. 

चित्रपट पाहावा का? (Verdict ) : 

चित्रपटाचा चांगला उत्तरार्ध आणि एक फसलेला पण महत्त्वाकांशी प्रयत्न म्हणून हा चित्रपट पहायला हरकत नाही. पण पाहण्यासाठी वेगळे पर्याय हवे असतील तर ‘बवाल’ मधीलच एका दृश्यामध्ये अजय निशाला तिच्या आवडत्या चित्रपटांबद्दल विचारतो त्यावेळेस ती सेंट ऑफ वुमन, गुड विल हंटिंग आणि लाईफ इज ब्युटीफूल या चित्रपटांची नावं घेते, हे ‘बवाल’ पेक्षा अधिक चांगले असणारे चित्रपट तुम्ही निश्चितच पाहू शकता. विशेषतः दुसऱ्या महायुद्धावरच आधारित असणारा ‘लाईफ इज ब्युटीफूल’ हा चित्रपट. नितेश तिवारीची असा चित्रपट बनवण्याची महत्वाकांशा असावी कदाचित. 

Leave a Comment