ब्रह्मास्त्र – दृश्य झगमगाटात हरवलेली पटकथा (Brahmastra – Film Review in Marathi)

फिल्म :  ब्रह्मास्त्र 
कालावधी :  २ तास ४० मिनिटे
दिग्दर्शक : अयान मुखर्जी  
लेखक :अयान मुखर्जी  
मुख्य कलाकार : रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन 
कुठे पाहू शकता : सध्या थिएटर मध्ये 

दहा वर्षांपासून ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर काम चालू होते आणि त्यातील पाच वर्षे अयान मुकर्जी केवळ पटकथेवर काम करत होता. अनेक मोठमोठे कलाकार, तंत्रज्ञ यांची फौजच या चित्रपट निर्मिती प्रक्रियेत जोडलेली आहे. अनेक वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते आणि त्यामुळे अपेक्षाही खूप वाढलेल्या होत्या.  

याचं एक छोटं उदाहरण म्हणजे, पुण्यातील आयमॅक्स थिएटर मध्ये आम्ही जेव्हा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पहायला सकाळी ९ वाजता पोहचलो, तेव्हां शो होऊसफूल होता. दुर्देवाने एक तास थांबूनही, तांत्रिक अडचणीमुळे चित्रपटाचा शो जेव्हां रद्द करावा लागला, त्यावेळेस प्रेक्षकांनी आम्हाला अजून तीन-चार तास थांबावे लागले तरी चालेल, आम्हाला हा चित्रपट आयमॅक्स स्क्रीन वरच पाहायचा आहे, अशी भूमिका घेतली. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून, सकाळी लवकर उठून, लांबचा प्रवास करून, महागडे तिकीट काढून केवळ आयमॅक्स स्क्रीनवर ‘बह्मास्त्र’ पाहता यावा म्हणून जमलेले हे सर्व प्रेक्षक होते. चित्रपटाबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल असणाऱ्या प्रचंड अपेक्षा आणि प्रेमच यातून दिसून येते.  

अश्यावेळेस प्रचंड कष्ट, संयम,आणि चिकाटीने बनवलेली फिल्म जेव्हा पडद्यावर आपला प्रभाव पाडू शकत नाही तेव्हां निराशा होते.अखेरीस प्रेक्षक म्हणून तुम्हांला पडद्यावर काय दिसतं हेच चित्रपटाचं यश असतं.  

गोष्ट काय आहे? । What is the story of Brahmastra?

प्राचीन काळातील ऋषींच्या खडतर तपश्चर्येनंतर ब्रह्म शक्तीतून काही अस्त्रांची निर्मिती झाली, यातील प्रत्येक अस्त्राला स्वतःचे नाव आणि शक्ती देण्यात आली.

(अस्त्रांबद्दल अधिक माहिती तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.)

ऋषी- मुनींच्या पिढ्या ज्यांना ‘ब्रम्हांक्ष’ म्हटले जाते, समाजामध्ये लपून राहून मानवाच्या प्रगतीमध्ये सहाय्य करण्यासाठी या अस्त्रांचे रक्षण करत आहेत. हे ‘ब्रम्हांक्ष’ समाजात सर्वत्र पसरलेले आहेत आणि ते सर्व साधारण माणसांप्रमाणे जीवन व्यतीत करत आहेत. ह्यातील सर्वांत शक्तिशाली अस्त्र आहे ‘ब्रह्मास्त्र’, जे तीन तुकड्यांमध्ये विभागलं गेलं आहे. हे तीन तुकडे एकत्र करून ब्रह्मास्त्राची ताकत स्वतःला मिळवण्यासाठी एक क्रूर शक्ती प्रयत्न करत आहे.  

डीजे म्हणून काम करत असणाऱ्या शिवा (रणबीर कपूर) जवळ अग्निअस्त्रा ची शक्ती आहे. त्यामुळे अग्नी त्याला जाळू शकत नाही उलट ताकत देते. अनाथ असलेल्या शिवा ला ‘ब्रम्हांक्ष’ बद्दल काही माहिती नाही. आपल्याकडे हि शक्ती का आहे, ह्याचीही त्याला कल्पना नाही. एका पार्टी मध्ये त्याची ओळख इशाशी (आलिया भट) होते. पाहताक्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. 

एके दिवशी स्वप्न सदृश अवस्थेत, शिवाला काही दृश्य दिसतात, जी दुसऱ्या दिवशी खरी होतात. त्या दृश्यात जुनून (मौनी रॉय ) तिच्या दोन साथीदारां सोबत ‘ब्रम्हांक्ष’ मधील एका सदस्याला मारून त्याच्याकडून ब्रह्मास्त्राचा एक तुकडा मिळवते व पुढच्या ब्रम्हांक्ष सदस्याच्या शोधात निघते. शिवा आणि इशा हे त्यांना रोखण्याचे ठरवतात. त्यांच्या या मोहिमे दरम्यान त्यांची भेट ‘ब्रम्हांक्ष’ चे गुरु (अमिताभ बच्चन) यांच्याशी होते. जे शिवाला त्याच्यात लपलेल्या शक्तीची जाणीव करून देतात आणि एकत्रितपणे ते सर्व या अज्ञात क्रूर शक्तीशी लढा द्यायला उभे राहतात.  

अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर -ब्रह्मास्त्र मधील एका दृश्यात

चित्रपट कसा आहे? । How is Brahmastra movie? 

चित्रपटातील स्पेशल इफेक्ट उत्तम झाले आहेत, कथा देखील चांगली आहे पण चित्रपट मार खातो ते त्यातील पटकथा, संवाद आणि अभिनयातील कमतरतेमुळे. 

कोणत्याही सुपर हिरो चित्रपटामध्ये जेव्हा सुपर हिरो मध्ये असणारी शक्ती जेव्हा त्याला आणि त्याच्या आजूबाजूच्या इतर लोकांनाही कळते, हा त्या चित्रपटातील अतिशय महत्वाचा प्रसंग असतो.शिवाला अग्नि जाळू शकत नाही, हे जेव्हां इशाला कळते त्यावेळेस तिची क्षणिक बाळबोध प्रतिक्रिया येते. हा प्रसंग अधिक चांगला करता आला नसता का? 

याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मध्ये डेनेरीस जेव्हां जळत्या चितेतून ३ ड्रॅगन च्या पिल्लांसह जिवंत बाहेर येते, तेव्हां आजूबाजूच्या सर्वच लोक तिच्यातील शक्तीची जाणीव (अग्नि तिला जाळू शकत नाही) होऊन तिच्या पुढे नतमस्तक होतात. प्रेक्षक म्हणून आपणही तो प्रसंग थक्क होऊन पाहत राहतो. असे थक्क करणारे कोणतेच प्रसंग ब्रह्मास्त्र मध्ये येत नाही. 

चित्रपटाच्या चारशे कोटी बजेटपैकी दीडशे कोटी ( जवळपास चाळीस टक्के ) हे स्पेशल इफेक्ट वर खर्च करण्यात आले आहे. ज्यावेळेस आपण ‘कन्टेन्ट इज किंग’ असे उद्गार सगळीकडेच ऐकत असताना मूळ कन्टेन्ट म्हणजेच पटकथेवर काहीच मेहनत का घेतली जात नाही?  

एका विशेष भूमिकेमध्ये येणारा हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन आपल्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडतात.आलिया भट आणि रणबीर कपूर दोघंही उत्तम कलाकार आहेत पण यामध्ये ते दिलेले संवाद केवळ पूर्ण करतायेत असं वाटतं. त्यामुळे प्रेक्षक म्हणून शिवा आणि इशा यांची सुखं-दुःख, अडीअडचणी, प्रेम आपल्याला प्रभावीत करू शकत नाही.   

तांत्रिक बाबीत चित्रपट उजवा असला तरी पटकथा, संवाद, अभिनय सारख्या मुख्य गोष्टीच जमून न आल्यामुळे शेवटी स्पेशल इफेक्ट ने अंगावर येणारा झगमगाटच पाहणं शिल्लक राहतं. चित्रपटातील त्रुटी लक्षात घेऊन कदाचित दुसरा भाग अधिक चांगला बनवला जाईल अशी आशा करूया. 

Leave a Comment