दहाड रिव्ह्यू | Dahaad Web series Review

समाजव्यवस्थे विरुद्धची दहाड 

कालावधी :  ८ एपिसोडस (अंदाजे पन्नास मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक:  रीमा कागती, रुचिका ओबेरॉय
कथा, पटकथा आणि संवाद :  सुमित अरोरा, चैतन्य चोप्रा, मानसी जैन, सुनयना कुमारी, करण शहा, रितेश शहा, रीमा कागती 
छायाचित्रण: तराना मरवाह, गौरव रैना
संकलक:  आनंद सुभाया, नितीन वैद्य
मुख्य कलाकार :  सोनाक्षी सिन्हा, गुलशन देवैय्या, सोहम शहा, विजय वर्मा, योगी सिंघा
कुठे पाहू शकता : अमेझॉन प्राईम व्हिडिओ.

‘बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ मध्ये निवडली जाणारी ‘दहाड’ ही पहिली भारतीय वेब सिरीज, झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांची प्रोडक्शन कंपनी आणि रीमा कागती सारखी दिग्दर्शिका असल्यामुळे दहाड बद्दल अपेक्षा बऱ्याच वाढल्या होत्या आणि काही प्रमाणात त्या अपेक्षा ही सिरीज पूर्ण करते. Dahaad Web series Review

गोष्ट काय आहे । What is the story of Dahaad

मुरली चंदाल (योगी सिंघा) आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतो. ‘तुझी बहीण स्वखुशीने एका मुलासोबत पळून गेली आहे, त्यामुळे आम्ही तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही’ असे पोलीस त्याला सांगतात. पण त्याच वेळेस, गावातील ठाकूर स्वतःची मुलगी मुस्लिम तरुणा बरोबर पळून गेली म्हणून ‘लव जिहाद‘ चा मुद्दा करून, पोलिसांना तक्रार नोंदवून घ्यायला लावतो.  हे बघून मुरली देखील आपली बहीण ही एका मुस्लिम तरुणांसोबत पळून गेली असे खोटेच सांगून ठाकूर करवी पोलिसांना आपल्या बहिणीचा शोध घ्यायला भाग पाडतो. इथून कथा सुरू होते.

पोलीस स्टेशन मधील इन्स्पेक्टर देवीलाल सिंह (गुलशन देवैय्या) आणि सब इन्स्पेक्टर अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा) आणि कैलास पारघी (सोहम शहा) हे केसचा शोध घ्यायला लागतात. 

या केसचा शोध घेताना, अश्या सारख्याच त्यांना इतर केसेस सापडतात. त्यांच्या लक्षात येते की अशाच प्रकारे २८ मुलींची आत्महत्या भासवून, हत्या करण्यात आलेली आहे आणि यामागील रचना बघता हे कोणातरी एका व्यक्तीचे काम असावे या निष्कर्षा प्रत अंजली भाटी येऊन पोहोचते.

अनेक घटना त्यांना आनंद स्वर्णकार (विजय वर्मा) पर्यंत वारंवार घेऊन येतात. आनंद हा हिंदीचा प्राध्यापक असून आपली बायको आणि मुलगा यांच्या समवेत राहत आहे. परंतु ठोस पुराव्या अभावी त्याच्या विरुद्ध पोलिस काही करू शकत नाही.

इथे सिरीयल किलर कोण आहे? हा शोध नाहीये. ते प्रेक्षकांना पहिल्याच भागात कळून येते. आता तो हे का करतो आणि तो कसा पकडला जातो ही सिरीजची गोष्ट आहे. हे सांगत असतानाच सामाजिक (जातीभेद, लिंगभेद), राजकीय (लव जिहाद) आणि कौटुंबिक (मुलांचे संगोपन, आई मुलगी, नवरा बायको नातेसंबंध) गोष्टींवरील केलेले भाष्यही आपल्याला पाहायला मिळते.

Dahaad Web series Review
सोहम शहा, सोनाक्षी सिन्हा  आणि गुलशन देवैया - दहाड
दहाड सिरीज पोस्टर

वेब सिरीज कशी आहे? | How is Dahaad web series?

ही सिरीज जरी एका सिरीयल किलरचा पाठपुरावा करत असली तरी याच्या केंद्रस्थानी आहे पोलीस सब इन्स्पेक्टर असणारी अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा). आणि तिने या समाज व्यवस्थे विरुद्ध दिलेली दहाड (गर्जना). या समाज व्यवस्थेत जिथे जात, लिंग, धर्म बघून माणसाशी कसं वागायचं हे ठरवलं जातं अशा व्यवस्थेमध्ये ती मागासवर्गातून आलेली एक अविवाहित महिला पोलीस इन्स्पेक्टर आहे. 

ही केस सोडविताना तिचं स्त्री असणं, त्यात अविवाहित असणं आणि मागासवर्गातून येणं, या गोष्टी तिला पदोपदी अडचणी निर्माण करतात. कधी पोलीस स्टेशन मध्ये तिच्या कनिष्ठ सहकार्याने ती गेल्यानंतर शुद्धीकरणासाठी अगरबत्ती जाळणं असो किंवा रस्त्यावरून जाता येता कोणीही अनोळखी पुरुषांनी खाकी वेशात असतानाही तिला टोमणे मारणे असो किंवा लग्नाचं वय उलटून चाललं म्हणून आईने लग्नासाठी सतत तिचा पाठपुरावा करने असो. या सर्व आघाड्यांवरती ती खंबीरपणे तोंड देत आहे. 

ही गोष्ट आहे खरंतर तिच्यासारख्याच मुलींची, ज्या जातीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे, घरच्यांच्या-समाजाच्या दबावामुळे आनंद स्वर्णकार सारख्या नराधमाच्या शिकार होतात. सिरीज मध्येच अंजलीच्या तोंडी एक चपखल संवाद आहे

“मारी जैसी छोरियां, अपना खयाल खुद रखें, या टंग जाए ऐसे बोर्ड पर |” 

अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा).
Dahaad Web series Review
सोहम शहा, सोनाक्षी सिन्हा  आणि गुलशन देवैया - दहाड
सोहम शहा, सोनाक्षी सिन्हा आणि गुलशन देवैया – दहाड

सिरीयल किलर आणि त्याचा शोध म्हणून एखादं क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणार कथानक पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून पहाल तर मात्र निराशा पदरी पडेल. सिरीयल किलर कोण आहे हे पहिल्याच एपिसोड मध्ये प्रेक्षकांना सांगण्यात येते. त्यानंतर त्याने ते का आणि कसे केले आणि तो कसा पकडला जातो हीच गोष्ट राहते. काही अपवादात्मक प्रसंग वगळता खिळवून ठेवणारा थरार कमी आहे. 

आज-काल वेब सिरीज म्हटली की मोठ्या प्रमाणावर हिंसा, सेक्स आणि शिव्या यांचा अनावश्यक भडीमार असतो. नुकताच आलेली ‘सास बहू और फ्लेमिंगो‘ ही वेब सिरीज अशाच अनावश्यक गोष्टींनी भरलेली आहे. ‘दहाड’ खरंतर हिंसा आणि सेक्स भोवती फिरत असली तरी त्याचा वापर योग्य त्या ठिकाणीच दिग्दर्शक आणि लेखकाने केलेला आहे असे वाटते.

एकंदरीत सिरीज चांगली असली तरी कथे मध्ये काही त्रुटी आहेत. जिवंत वाचलेल्या साक्षीदाराची साक्ष सोयीस्कररीत्या शेवटापर्यंत लांबवली आहे. ती साक्ष जर आधी झाली असती तर सिरीज तिथेच संपली असती. 

काही पुरावे प्रेक्षकांनाही बघताना कळून येतात, पण तेच पोलिसांना समजायला बरेच भाग खर्च पडतात. जसे की आडनाव स्वर्णकार, भाऊ-वडील सोनार, सोनं तयार करताना होणारा सायनाईड चा वापर, ही दोघांमधली लिंक पोलीस का शोधू शकत नाही लवकर हे कळत नाही. 

बऱ्याच वेळा जात, धर्म आणि लिंगभेद याबद्दल येणारे संवाद हे सहज कथेचा भाग न वाटता उपदेशात्मक वाटतात. या काही त्रुटि बाजूला सारल्या तर सिरीज उत्तम झाली आहे.

कलाकारांचा अभिनय: 

लुटेरा चित्रपटामुळे सोनाक्षी सिन्हा एक उत्तम अभिनेत्री आहे हे कळलं होतं, पण त्यानंतर तिने केलेल्या सुमार दर्जाच्या चित्रपट निवडी मुळे लोकांना तिचा चांगला अभिनय पाहायला मिळाला नाही. दहाड मुळे जास्तीत जास्त लोकांना ती एक चांगली अभिनेत्री आहे हे कळून येईल. तिचा राजस्थानी लहेजा कितपत अचूकआहे हे एक राजस्थानी व्यक्तीचं सांगू शकेल. 

गुलशन देवैय्या आणि सोहम शहा हे उत्तम अभिनेते आहेतच त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका त्यांच्या अभिनयामुळे उठून येते. ही सिरीज ही त्याला अपवाद नाही.

विजय वर्मा याने साकारलेला आनंद स्वर्णकार अतिशय प्रभावी झाला आहे. एकाच वेळेस एक सर्वसामान्य व्यक्ती आणि ज्याची भीती वाटावी असा सिरीयल किलर दाखविण्यात तो यशस्वी झाला आहे. विजय वर्मा याने आत्तापर्यंत बऱ्याचशा नकारात्मक भूमिका केल्या असल्या तरी त्याची प्रत्येक भूमिका ही वेगळी म्हणून ओळखू येते. हे त्याच्या उत्तम अभिनयाचेच यश आहे.

अभिनयामध्ये विशेष उल्लेख करावासा वाटतो तो योगी सिंघाचा ज्याने मुरली चंदाल ची भूमिका साकारली आहे. आपल्या बहिणीचा ठाव ठिकाण लागत नाही म्हणून अस्वस्थ झालेला, त्यात पोलीस आपली तक्रार नोंदवून घेत नाही यामुळे हाताश झालेला भाऊ त्याने कमालीच्या प्रभावीपणे साकारला आहे. पोलीस स्टेशन बाहेर चालणाऱ्या राजकीय लव जिहादच्या मोर्चात तो ज्या पद्धतीने हळूहळू सामील होतो ते पाहण्यासारखं आहे.

Yogi Singha in Dahaad Webseries. Dahaad Webseries Review
योगी सिंघा दहाड मध्ये

संपूर्ण सिरीज मध्ये प्रेमभंग ही संकल्पना बऱ्याच ठिकाणी दिसून येते. 28 मृत मुली या प्रेमाखातरच आनंद स्वर्णकार सोबत जायला तयार होतात आणि मारल्या जातात. शाळकरी मुलीचा प्रेमभंग होतो,हिंदू-मुस्लिम प्रेमी जोडप्याला लव जिहादच्या नावाखाली वेगळं केलं जातं. पूर्वापार प्रेमावर होणाऱ्या अन्याया बद्दल व्यक्त होणारी एक कविता सिरीज मध्ये (हिंदी कवी बद्रिनारायण) येते. ती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल चपखल भाष्य करते.  

प्रेत आएगा
किताब से निकाल ले जाएगा प्रेमपत्र
गिद्ध उसे पहाड़ पर नोच-नोच खाएगा
चोर आएगा तो प्रेमपत्र ही चुराएगा
जुआरी प्रेमपत्र ही दांव लगाएगा
ऋषि आएंगे तो दान में मांगेंगे प्रेमपत्र
बारिश आएगी तो प्रेमपत्र ही गलाएगी
आग आएगी तो जलाएगी प्रेमपत्र
बंदिशें प्रेमपत्र ही लगाई जाएंगी
सांप आएगा तो डसेगा प्रेमपत्र
झींगुर आएंगे तो चाटेंगे प्रेमपत्र
कीड़े प्रेमपत्र ही काटेंगे
प्रलय के दिनों में सप्तर्षि मछली और मनु
सब वेद बचाएंगे
कोई नहीं बचाएगा प्रेमपत्र
कोई रोम बचाएगा कोई मदीना
कोई चांदी बचाएगा कोई सोना
मैं निपट अकेला कैसे बचाऊंगा तुम्हारा प्रेमपत्र’
-------------------------------बद्रिनारायण 

एकंदरीत संथ गतीने जात असली तरी दहाड एक चांगली वेब सिरीज पाहण्याचा आनंद नक्कीच देते. तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर ही वेब सिरीज पाहू शकता. 

तुम्हांला दहाड आवडली असेल तर नेटफ्लिक्स वरची देल्ही क्राईम सिजन २ देखील तुम्ही पाहू शकता. 

Leave a Comment