देल्ही क्राईम सीजन २ (Delhi Crime Season 2 Review in Marathi) 

फिल्म :  देल्ही क्राईम
भाषा : हिंदी आणि काही संवाद इंग्लिश मध्ये 
एपिसोड्स:  ५ (प्रत्येकी अंदाजे ४० मिनिट्स)
क्रिएटर:  रीची मेहता 
दिग्दर्शक : तनुज चोप्रा, महेश मापुस्कर  
मुख्य कलाकार :  शेफाली शहा, राजेश तेलंग, रसिका दुग्गल, आदिल हुसेन, अनुराग अरोरा, यशस्विनी दायमा, गोपाल दत्त, तिलोत्तमा शोम. 
कुठे पाहू शकता : नेटफ्लिक्स 

देल्ही क्राईम च्या पहिल्या सिजनला टीव्ही/वेब सिरीज मधील ऑस्कर समजला जाणारा प्रतिष्ठित असा इंटरनॅशनल एमी अवार्ड मिळाल्यामुळे, त्या ओझ्याखाली दुसरा सिझन कितपत आपलं अस्तित्व वेगळेपणाने सिद्ध करू शकेल ही शंका होती.  तसेच पहिल्या सीझनमध्ये मांडलेली निर्भया ची कथा त्याच सिझन मध्ये पूर्ण होत असल्यामुळे खरंच दुसऱ्या सिझन ची आवश्यकता होती का असाही प्रश्न होताच. पहिल्या सीझनमध्ये असणारे दिग्दर्शक आणि लेखक ‘रीची मेहता’ यांची जागा नवीन दिग्दर्शक ‘तनुज चोप्रा’ , महेश मापुस्कर आणि नवीन लेखकांच्या टीमने घेतली असल्यामुळे ते कितपत दुसऱ्या सिझनला न्याय देऊ शकतील हि शंकाही होतीच.  

अश्या अनेक शंकाकुशंका मनात असताना दुसरा सिजन पहिला आणि या सगळ्या शंका पुसल्या गेल्या.  दिग्दर्शक आणि लेखकांच्या या नव्या टीम ने जुन्या कलाकारांसोबत पहिल्या सीजन इतकीच ताकदीची समाजावर भाष्य करणारी गोष्ट प्रभावीपणे सादर केली आहे.  

गोष्ट काय आहे: (Delhi Crime Season 2 story in Marathi)

ही गोष्ट आधारित आहे, नव्वद च्या दशकात सक्रिय असणाऱ्या ‘कच्छा-बनियान गॅंग’ वर. चेहरा झाकून आणि  केवळ चड्डी-बनियान घालून आठ -दहा लोकांच्या समूहाने फिरणारी हि गॅंग वयोवृद्ध श्रीमंत लोकांना लक्ष करत असे. त्यांच्याकडचे  पैसे, दागदागिने लुटून त्यांना मारहाण करून प्रसंगी क्रूरपणे खून देखील करत असे. कोणी पकडायचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या हाती लागू नये म्हणून ते संपूर्ण अंगाला तेल लावत. 

देल्ही क्राईम मधील घटना घडतात २०१३ साली. इतक्या वर्षानंतर अचानकपणे  ‘कच्छा-बनियान गॅंग’ सदृष्य  हत्याकांड होते. श्रीमंत वयोवृद्ध जोडप्यांचा निर्घृणरित्या हातोडी -कुऱ्हाडीने खून केला जातो. दोन-तीन दिवसात अजून तश्याच घटना घडतात. समाजात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं असताना पोलिसांच्या हाथी मात्र अजून कोणी आलेलं नसतं. देल्ही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे शंका घेण्यात येऊ लागतात. अश्या परिस्थितीत डीसीपी वार्तिका चतुर्वेदी (शेफाली शहा) आणि त्यांची टीम या गुन्ह्याचा कसा शोध घेते आणि त्यांना कोणकोणत्या सामाजिक, राजकीय आणि कौटंबिक अडीअडीचणींना सामोरं जावं लागतं त्याची हि गोष्ट आहे. 

देल्ही क्राईम सीजन २ -शेफाली शहा , रसिक दुग्गल आणि राजेश तेलंग
देल्ही क्राईम सीजन २ -शेफाली शहा , रसिक दुग्गल आणि राजेश तेलंग

सामाजिक भाष्य:

देल्ही क्राईम पाहताना सत्तरच्या दशकात पुणं हादरवून सोडणाऱ्या जक्कल -सुतार गॅंग ची आणि त्यावर आधारित असणारे ‘माफीचा साक्षीदार’ आणि अनुराग कश्यप च्या ‘पांच’ चित्रपटांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.  देल्ही क्राईम ह्या सर्वांपेक्षा पुढं जातो तो त्यामध्ये असणाऱ्या जातीभेदावरील भाष्यामुळे आणि पोलिसांचा येणाऱ्या द्रुष्टीकोनामुळे.

आजही समाजातील एक घटक, केवळ ब्रिटिश काळात लादलेल्या जातीय गुन्हेगारी ठिपक्यामुळे पोलिसांच्या त्रासाला सोमोरा जात आहे. १८७१ साली ब्रिटिश सरकारने काही जातींना ‘गुन्हेगारी जाती’ म्हणून घोषित केलं. त्यामुळे त्या जातीत जन्मलेलं मुलं जन्मताच ‘गुन्हेगार’ठरत असे. स्वातंत्र्योत्तर काळात १९५२ साली भारत सरकारने ह्या सर्व जाती विमुक्त केल्या. तरीही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गुन्हेगार म्हणून बसलेला ठपका अजूनही पुसला गेला नाहीये. ह्या घुसमटीतून अनेकांनी गावं सोडली, आडनावं बदलली, आप्तेष्टांना दूर केलं …केवळ एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जगता यावं म्हणून. ह्या सर्वच गोष्टींना देल्ही क्राईम स्पर्श करतो. एका प्रसंगात एका पात्राच्या तोंडी एक सवांद येतो तो फार सूचक आहे. 

“आजसे पहिले पुलिस कि गाडी हमे सिर्फ उठाने के लिये आता थी, आज पहिली बार छोडने आई है।” 

पोलिसांना सामोरे जावे लागणारे ताण-तणाव, वेळी-अवेळी कामामुळे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष्य, राजकारण्यांचा हस्तक्षेप अश्या पहिल्या सीजन मध्ये पाहिलेल्या गोष्टी दुसऱ्या सीजन मध्येही येतात.  

अभिनय 

शेफाली शहांसोबत सर्वच छोट्या-मोठ्या भूमिकेतील कलाकार कमालीचा अभिनय करतात. ह्या सर्वांमध्ये रसिका दुग्गल (नीती सिंग), राजेश तेलंग (भूपेंदर) आणि तिलोत्तमा शोम (लता सोलंकी) यांचा अभिनय उठून येतो. कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल साधताना दुरावत चाललेली नाती, पोलिसी नोकरीतील ताणतणाव या सर्वांतून येणारं  वैफल्य आणि तरीही रोज उभं राहून याला सामोरं जाण्याची तय्यारी रसिका दुग्गल (नीती सिंग) आणि भूपेंदर (राजेश तेलंग) यांनी कमालीच्या संयंतपणे दाखवली आहे. 

रसिका दुग्गल आणि राजेश तेलंग देल्ही क्राईम सीजन २

तिलोत्तमा शोम च्या अभिनयाची रेंज पाहण्यासाठी नेटफ्लिक्स वरतीच उपलब्द असलेले सर आणि देल्ही क्राईम पहा. दोन टोकाच्या भूमिका पाहताना तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. 

केवळ पाच एपिसोड्स असल्यामुळे एका विकेंड मध्ये तुम्ही हा सीजन नेटफ्लिक्स वर नक्की पाहू शकता.  

Leave a Comment