दो गुब्बारे – एक आपली वाली गोष्ट | Do Gubbare Web Series Review in Marathi 

वेबसीरीज  : दो गुब्बारे 
कालावधी :  ६ एपिसोडस (अंदाजे २५ मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक:  वरुण नार्वेकर 
कथा पटकथा आणि संवाद : वरुण नार्वेकर आणि कल्याणी पंडित.
छायाचित्रण: अमोल साळुंके
संकलक:  अनिकेत काळे
पार्श्व संगीत: सौरभ भालेराव
गीतकार: सुनील सुकथनकर, अक्षय राजे शिंदे 
मुख्य कलाकार :  मोहन आगाशे, सिद्धार्थ शॉ , मल्हार राठोड, अद्वैत सूद, मानसी पारेख, हेतवी शर्मा , हेमांगी कवी ,अजित केळकर,विष्णू वारीअर ,सागर साठ्ये, हार्दिक ठक्कर, ठुटन गोम्बू. 
कुठे पाहू शकता : जिओ सिनेमा 

Do Gubbare Web Series Review in Marathi – वरूण नार्वेकर (Varun Narvekar) या मराठी दिग्दर्शकाची ही पहिलीच हिंदी वेब सीरीज. याआधी ‘आणि काय हवं?’ ही मराठी वेब सीरीज आणि ‘मुरांबा’ हा मराठी चित्रपट याने त्याचा स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. ‘स्लाईस ऑफ लाईफ’ (दैनंदिन आयुष्याचा भाग) म्हणता येतील अशा गोष्टी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने तरीही प्रभावीपणे वरूण आपल्या कथेतून मांडत असतो. ‘दो गुब्बारे’ या वेब सीरीज मध्ये देखील त्याने इंदोर वरून पुण्यात नोकरीसाठी आलेला मुलगा आणि त्याचे घर मालक असणारे आजोबा यांच्यातील नातं कसं फुलत जातं हे छान पद्धतीने दाखविले आहे.

Do Gubbare Web Series Review
मल्हार राठोड आणि सिद्धार्थ शॉ – दो गुब्बारे मध्ये (PC : Youtube Trailer)

गोष्ट काय आहे । What is the story of Do Gubbare?

पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी भारतभरातून अनेक तरुण-तरुणी येत असतात, इंदोर वरून आलेला रोहित शुक्ला (सिद्धार्थ शॉ) हा त्यापैकीच एक. पुण्याच्या प्रभात रोडवरील घनकुंज बंगल्यात एकटे राहणाऱ्या आजोबांकडे (मोहन आगाशे) तो पेईंग गेस्ट म्हणून राहायला येतो. 

पुण्याची विशिष्ट अशी असणारी ओळख त्याला पहिल्याच दिवशी अनुभवायला येते. येथील लोकांचा तऱ्हेवाईकपणा, इथल्या पाट्या, भाषेचा जाज्वल्य अभिमान, खाद्य संस्कृती अशा अनेक गोष्टींची चव पहिल्याच दिवशी त्याला चाखायला मिळते. पुण्यात राहणारे किंवा पुण्याला भेट देणाऱ्या लोकांना या घटना  स्वानुभव निश्चितच वाटू शकतील.

रोहित आणि आजोबांमध्ये एक मैत्री तर होतेच पण त्याचबरोबर आजोबांची घरकाम आणि स्वयंपाकातील मदतनीस राधा (हेमांगी कवी) ,आजोबांचा मित्र विनायक ( अजित केळकर),आजोबांची मुलगी आश्विनी (मानसी पारेख) ह्यांच्या सोबत देखील त्याचे अनुबंध तयार होतात. रोहित ची पुण्यात असणारी मैत्रीण मृण्मयी (मल्हार राठोड ) हिच्याशी देखील आजोबांची छान ओळख होते. सीरीज च्या शेवटाकडे एक ट्विस्ट येतो जो प्रेक्षकांना भावुक करून जातो. तो जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला सीरीज पाहावी लागेल.

मोहन आगाशे आणि सिद्धार्थ शॉ - दो गुब्बारे मधील एका प्रसंगात
मोहन आगाशे आणि सिद्धार्थ शॉ – दो गुब्बारे मधील एका प्रसंगात (PC : Youtube Trailer)

वेब सीरीज  कशी आहे? | How is web series do gubbare?

सीरीज  उत्तम झाली आहे.  संपूर्ण सीरिजमध्ये एक ठहराव आहे. आजकाल बहुतांश सीरीज  मध्ये हिंसा, सेक्स आणि शिव्या यांचा भडीमार असतो. या सगळ्यांच्या पलीकडे देखील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक नाट्यपूर्ण घटना घडत असतात, या अभावानेच पडद्यावरती अथवा ओटीटीवर काही सन्माननीय अपवाद वगळता पाहायला मिळतात. इथे दिग्दर्शक आणि लेखिका आपल्यातीलच वाटतील अशा पात्रांची गोष्ट ‘दो गुब्बारे’ मधून  सांगतात, त्यामुळे ही गोष्ट आपलीशी वाटते.

आजोबा आणि रोहित दोघेही जगण्याबद्दल मृत्यू बद्दल, शहराबद्दल, नातेसंबंधां बद्दल अनेक विषयांवर बोलतात. रोहित एके ठिकाणी आजोबांशी बोलताना विचारतो. 

रोहीत : आप पहिले लाइफ कोच रह चुके हो क्या? 
आजोबा : नहीं लाइफ जी चुका हूं, चाहिए तो फ्री में सर्विस दे सकता हूं।

– आजोबा (दो गुब्बारे )

अनुभवातून, जगण्यातून आलेली शहाणीव आजोबांच्या बोलण्यात येते.

मोहन आगाशेंच्या कामात सहजता आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी झालेले आणि सहवास शोधणारे थोडेसे मिश्किल आजोबा मोहन आगाशे यांनी फार छान साकारले आहेत.समाधानकारक जीवन जगल्याचा एक शांतपणा त्यांच्या अभिनयात दिसून येतो.  

मोहन आगाशे - दो गुब्बारे मध्ये Do Gubbare Web Series Review
मोहन आगाशे – दो गुब्बारे मध्ये आजोबांच्या भूमिकेत (PC : Youtube Trailer)

वर उल्लेख केल्याप्रमाणे पुणे शहर कथेचा महत्वाचा भाग बनते. एके ठिकाणी शहराबद्दल बोलताना रोहित म्हणतो

रात बेस्ट बात है इस शहर की, खो जाओ ऐसी भीड़ भी नहीं, अकेले पड़ जाओ ऐसा सन्नाटा भी नहीं।

रोहीत (दो गुब्बारे )

पेंशनरांचा शहर ते एक आयटी हब असा या शहराचा झालेला प्रवास दर्शविणाऱ्या खुणा आपल्याला ठीक ठिकाणी दिसून येतात.

रोहित शुक्ला चे पात्र साकारणारा सिद्धार्थ च्या ऐवजी अधिक चांगला अभिनेता घेतला असता तर सीरीज  ची उंची अजून उंचावली असती सिद्धार्थ अनेक प्रसंगांमध्ये नवखा वाटतो.त्याचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे पण अभिनय कमी पडतो विशेषता आजूबाजूला इतके प्रभावी अभिनेते अभिनेत्री असल्यावरती हे विशेष जाणवून येते.मल्हार राठोड आणि हेमांगी कवी मात्र आपापल्या भूमिकेत छाप पाडतात.

सौरभ भालेराव यांनी संगीतबद्ध केलेली आणि प्रसंगानुरुप येणारी गाणी विशेष लक्षात राहतात. तेरी यह जिंदगी, अपने वाला फील, शेहरी मुस्कुराहाट ही गाणी सीरीज  व्यतिरिक्त नुसती ऐकली तरी हॅप्पी वाला फील देतील. 

सीरीज पहावी का? : 

सीरीज  पाहावी का? तर निश्चित पहावी. एका चित्रपटाच्या लांबी एवढी केवळ दोन तासापेक्षा कमी वेळात संपूर्ण सीरीज संपते. एक चांगलं आपलंसं काहीतरी पाहिल्याचा अनुभव ती निश्चितच देते. 

Leave a Comment