कसा आहे डंकी चित्रपट ? । Dunki Movie Review in Marathi

चित्रपट:  डंकी
कालावधी :  २ तास ४१ मिनिटं
दिग्दर्शक: राजकुमार हिरानी 
कथा/पटकथा/संवाद  :  राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, कनिका धिल्लोण.   
संगीत: प्रितम   
मुख्य कलाकार : शाहरुख खान, तापसी पन्नू, बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर, देवेन भोजानी
कुठे पाहू शकता : सध्या थिएटर मध्ये 

Dunki Movie Review in Marathi तुम्ही थिएटर मध्ये जाऊन अथवा घरी ओटीटी वर चित्रपट पाहताना पूर्ण चित्रपटभर खूप खळखळून हसला आहात, हे शेवटचं कधी आठवतंय? किंवा तुमच्या आवडत्या विनोदी चित्रपटांची नावं विचारली तर; गेल्या पाच -दहा वर्षांतील चित्रपटातील नावं त्यात किती येतील? ज्या काही विनोदी चित्रपटांनी तुम्हांला हसवलं असेल; त्यामध्ये राजू हिराणीचा एखादा तरी चित्रपट तुमच्या यादीत असू शकेल. मुन्नाभाई एम बी बी एस, लगे रहो मुन्नाभाई, ३ इडियट्स हे चित्रपट कधीही टीव्ही वर लागले तर आपण कुठूनही ते पाहू शकतो आणि पुन्हा पाहतानाही आपल्याला तेवढीच मजा देखील येते.  त्यामुळेच राजू हिराणीचा डंकी चित्रपटाचा विषय माहित असूनही हा चित्रपट आपल्याला भरपूर हसवेल या अपेक्षेने तुम्ही जाल तर एखाद दुसरा प्रसंग वगळता तो तुमची घोर निराशा करेल. 

गोष्ट काय आहे । What is the story of Dunki in Marathi?

परदेशात नोकरी-व्यवसायासाठी जाण्यास इच्छुक असणाऱ्या, पण व्हिजा साठी पात्र नसणाऱ्या लोकांना, पैश्याच्या मोबदल्यात अवैध्य रित्या डॉंकी मार्गाने अमेरिका, यूके, कॅनडा सारख्या देशांमध्ये पोहचवले जाते, त्याला डंकी म्हणतात. मुख्यतः पायपीट करून हा प्रवास केला जातो म्हणून त्याला डॉंकी मार्ग आणि त्याचा अपभ्रंश म्हणजे डंकी म्हंटलं जातं. 

मुख्यत्वे चित्रपट घडतो तो ९० च्या दशकात. मन्नू (तापसी पन्नू),  बुग्गु (विक्रम कोचर), बल्ली (अनिल ग्रोवर ) आणि सुखी (विकी कौशल ) ह्या चारही जणांना त्यांच्या त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक, वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी इंग्लडला जायचं आहे.परंतु व्हिजासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेत ते बसत नाहीयेत. त्याच वेळेस आर्मी ऑफिसर असणारा हरदयाळ सिंग धिल्लोन उर्फ हार्डी (शाहरुख खान) आपल्याला मरणापासून ज्याने वाचवले त्याचा शोध घेत त्यांच्या गावात येतो आणि ह्या शोधाची परिणती म्हणजे ह्या सर्व लोकांना परदेशात पोहचवण्याचे एक ध्येय त्याला मिळते. व्हिजाच्या पात्रतेत बसण्यासाठी इंग्रजी शिकण्यापासून ते कुस्ती, लग्न करण्यापर्यंत असे अनेक प्रयत्न ते सगळे करून बघतात. पण सगळ्यातचं त्यांना अपयश येते. 

Dunki Movie Review in Marathi
बोमन इराणी,तापसी पन्नू ,अनिल ग्रोवर,विकी कौशल,विक्रम कोचर आणि शाहरुख खान – डंकी चित्रपटातील एका दृश्यात

अश्या वेळेस त्यांना या डंकी मार्गाची कल्पना मिळते. अनेक अडथळे, समस्या पार करत जेव्हां परदेशात पोहचतात तेव्हां खरंच त्यांची स्वप्न पूर्ण होतात का? ते भारतात परत येतात का? ह्या साठी तुम्हांला चित्रपट पाहावा लागेल. 

डंकी चित्रपट कसा आहे ? | How is the film Dunki?

आजचा प्रेक्षक हा जगभरचा सिनेमा पाहतो आहे. ओटीटी मुळे त्याला कथेमध्ये, दिग्दर्शनात, तांत्रिक घटकांमध्ये अनेक प्रयोग होताना दिसताएत. अश्या वेळेस अजूनही व्यक्तीच्या जाडीवर, टकलावर आणि शी-शू वरचे विनोद करूनच कथा सांगितली जाते त्यावेळेस त्यात नाविन्य जाणवत नाही. इथे कथा थोडी हटके जरूर आहे; पण ती सांगताना त्यांनी स्वतःच्याच चित्रपटांची पुनरावृत्ती केल्या सारखं वाटतं. 

एक बाहेर गावाहून आलेली व्यक्ती, नवीन ठिकाणी सगळ्यांना आपलंस करून घेते, त्यांच्या समस्या सोडवते हे कथानक ‘थ्री इडियट’ आणि मुन्नाभाई ची आठवण करून देते, अली फझल (थ्री इडियट)आणि जिम्मी शेरगील (मुन्नाभाई एम बी बी एस) ने साकारलेल्या एका महत्वाच्या पात्राचा मृत्यू इथेही होतो, थ्री इडियट मधील रिझल्ट पाहण्याचा प्रसंग आणि संवाद,अस्थिकलशाभोवती होणारं नाट्य  इथेही घडताना दिसते.  ३ इडियट्स मधील चतुर ने रट्टा मारून भाषण पाठ करण्या सारखा प्रसंग इथेही येतो परंतु चतुरच्या बलात्कार-चमत्काराच्या बाष्कळ विनोदा पेक्षा डंकी मधील हा प्रसंग अधिक चांगला झाला आहे.  ‘मुन्नाभाई एम बी बी एस’ हि अजूनही राजू हिरानी चा सर्वोत्तम चित्रपट आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक चित्रपटागणिक हळू हळू त्याचा दिग्दर्शकीय प्रभाव ओसरत गेल्याचे दिसते. 

चित्रपटाच्या उत्तरार्धात कथा अधिक गंभीर वळण घेते; पण चित्रपट गंभीर वाटू नये म्हणून कि काय प्रत्येक गंभीर प्रसंगाच्या शेवटी तो विनोदी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तो धड गंभीर होत ना विनोदी. चित्रपटाच्या शेवटाकडे ज्या वेळेस खऱ्या आयुष्यातील – ज्या लोकांना डंकी करून परदेशात जाताना मृत्यूला सामोरे जावे लागले, अश्या लोकांचे फोटोज येतात त्यावेळेस एकूणच गोष्टीचं गांभीर्य कळतं- जे कि चित्रपट पाहताना एक – दोन दृश्यात केवळ सरकून जाते. दिग्दर्शकाचा कथेबाबत उडालेला गोंधळ यामुळे अधिकच अधोरेखित होतो. 

अभिनय

शाहरुख त्याच त्याच पद्धतीने अभिनय करतो, तो ते पात्र न वाटता शाहरुख खानच वाटतो. त्याचं ते ओठ दुमडून, चेहरा थरथरवत प्रत्येक चित्रपटात रडणं आता नको वाटतं. तसेच त्याच्या चेहऱ्यावर व्हीफक्स करवून आणलेलं तरुणपण खोटं -बनावटी वाटत राहतं त्यामुळे दृश्यांमध्ये गुंतण्याऐवजी त्याच्या विचित्र दिसणाऱ्या चेहऱ्याकडेच अधिक लक्ष जातं.

या वर्षी प्रदर्शित झालेल्या तीनही चित्रपटांमध्ये (पठाण, जवान आणि डंकी ) तो इंडियन आर्मी ऑफिसर अथवा रॉ एजन्ट बनलेला आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये त्याने प्रेक्षकांना उद्देशून ‘माझे देशावर खूप प्रेम आहे’ हे थेट सांगितले आहे. पठाण च्या वेळेस त्याचे नावीन्य वाटले, आता प्रत्येकचं चित्रपटात त्याची पुनरावृत्ती होत आहे. ती कथेची गरज न वाटता केवळ शाहरुख साठी ते संवाद टाकले आहेत असे वाटते. जनतेने हजारो करोड रुपये देऊन त्याच्या चित्रपटांना यशस्वी केले आहे आणि त्याच्या देश्प्रेमावर शिक्का मोर्तब केले आहे. त्यामुळे आता तरी प्रेक्षकांना कंटाळा यायच्या आत त्याने ते थांबवावे. 

शाहरुख पेक्षा देखील चित्रपटातील इतर सहकलाकारांचा अभिनय हा जास्त उजवा झाला आहे. विशेषतः सुखीचं काम करणारा विकी कौशल. परदेशात लग्न करून गेलेल्या आपल्या  प्रेयसीला सोडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना यश येत नसल्यामुळे उद्विग्न झालेला सुखी त्याने कमाल साकारला आहे. तसेच बुग्गु चं काम करणारा विक्रम कोचर आणि बल्ली चं काम करणारा अनिल ग्रोवर विशेष लक्षात राहतात. तापसी पन्नू हि तापसी पन्नूच वाटते, अनेक प्रसंगात तर ती गोंधळलेली वाटते. बोमन इराणीला  जास्त वाव मिळालेला नाही. मुख्य भूमिका असणाऱ्यांचा दुय्यम अभिनय आणि दुय्यम भूमिका असणाऱ्यांचा उत्तम अभिनय असेच म्हणावे लागेल. 

Dunki Movie Review in Marathi
विकी कौशल – डंकी चित्रपटातील एका दृश्यात

चित्रपट पहावा का? : 

तुम्ही शाहरुखचे फॅन असाल आणि त्याचा तोच तोच अभिनय तुम्हांला पाहायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. राजू हिरानी चे फॅन असाल तर एखाद-दुसऱ्या प्रसंगात तुम्हांला मजा येईल पण इतर सगळा चित्रपट प्रचंड कंटाळवाणा वाटू शकेल.  तुम्ही कोणाचेच फॅन नसाल तर हा चित्रपट न पाहिल्याने तुम्ही काही मिस करणार नाही. तुम्हांला जर खऱ्या डंकी घटने बद्दलच जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूब वर अनेक चांगले माहितीपर व्हिडीओ मिळून जातील. 

Leave a Comment