एका काळेचे मणी रिव्यू | Eka Kaleche Mani Marathi Web Series Review

वेबसिरीज :  एका काळेचे मणी 
कालावधी :  ६ एपिसोडस (अंदाजे २५ मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक:  अतुल केतकर
कथा पटकथा आणि संवाद :  ओम भुतकर, सिद्धार्थ महाशब्दे
मुख्य कलाकार : प्रशांत दामले, पोर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, वंदना गुप्ते, ऋषी मनोहर, ऋतुराज शिंदे, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, दत्तू जकातदार
कुठे पाहू शकता : जीओ सिनेमा 

Eka Kaleche Mani Marathi Web Series Review महेश मांजरेकर यांची निर्मिती आणि अनेक उत्तम कलाकारांचा सहभाग हे ‘एका काळेचे मणी’ या वेब सीरीजचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल; पण कमकुवत लिखाण आणि दिग्दर्शनामुळे ही वेब सीरीज पाहताना मात्र निराशा झाली. केवळ प्रशांत दामले, पूर्णिमा मनोहर, वंदना गुप्ते आणि ऋता दुर्गुळे यांच्या उत्तम अभिनयामुळे सीरीज पाहण्याजोगी झाली आहे. 

गोष्ट काय आहे । What is the story of Eka Kaleche Mani?

ऋषी मनोहर एका काळेचे मणी सीरीज मध्ये विवस्वान काळे च्या भूमिकेत
ऋषी मनोहर एका काळेचे मणी सीरीज मध्ये विवस्वान काळे च्या भूमिकेत (PC : Youtube Trailer)

श्रीनिवास काळे (प्रशांत दामले) आणि अनुराधा काळे (पोर्णिमा मनोहर) यांचा आयर्लंड रिटर्न गुप्तरोगतज्ञ मुलगा विवस्वान काळेला (ऋषी मनोहर) लग्न करायला तयार करण्यासाठी काळे कुटुंबाने केलेले विविध प्रयत्न हे सिरीजचं मुख्य कथासूत्र आहे.  

मुख्य कथा सूत्रासोबतच अनेक उपकथानकही येतात, जसे की काळ्यांची इंजिनीयर मुलगी मीरा काळे (ऋता दुर्गुळे) हिचे हिंजवडीतील नोकरी सोडून प्राण्यांसाठी फॅशन डिझायनींग करणे (हो तुम्ही बरोबर वाचले प्राण्यांसाठी फॅशन डिझायनिंग),
काळ्यांच्या शेजारी राहत असणारे पांढरे कुटुंब – बाळकृष्ण पांढरे  (समीर चौगुले) आणि सीमा पांढरे (विशाखा सुभेदार) यांचे त्यांच्या मुलीचे, काळे यांच्या मुलासोबत लग्न लावून देण्यासाठी चाललेले प्रयत्न, श्रीनिवास काळे यांच्या वहिनी वृषाली (वंदना गुप्ते) यांचे रेसिपीच्या अतरंगी प्रयोगाचं इंस्टाग्राम शूटिंग करणे, काळे यांच्या मानलेल्या बहिणीचा मुलगा अर्जुन (ऋतुराज शिंदे) याचं गांजाचे व्यसन अशी अशी अनेक उपकथानकही यात येतात. 
या सर्वांमध्ये काळे कुटुंब विवस्वानला लग्नाला तयार करायला यशस्वी होतात का ? त्याचे लग्न होते का? हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला सीरीज पाहावी लागेल.

प्रशांत दामले, वंदना गुप्ते आणि पोर्णिमा मनोहर
प्रशांत दामले, वंदना गुप्ते आणि पोर्णिमा मनोहर (PC : Youtube Trailer)

वेब सीरीज कशी आहे? | How is Eka Kaleche Mani web series?

प्रशांत दामले, पूर्णिमा मनोहर, समीर चौगुले, विशाखा सुभेदार यांसारखे दिग्गज आणि गुणी कलाकारांना साधारण लिखाण आणि दिग्दर्शनामुळे वाया घालवले आहे असे वाटले. लिखाणात अनेक ठिकाणी  शाब्दिक कोट्या, यमक जुळवणे अशा कसरती चालतात, विशाखा सुभेदार यांनी पाय आपटल्यावर समीर चौघुले यांनी फूटभर उडी मारणे असे वजनावरचे पांचट विनोद देखील इथे येतात. महाराष्ट्राची हास्य जत्रा यातील अनेक स्कीट यापेक्षा कितीतरी चांगले होतात आणि हसवतात. उंटाला फॅशन करण्याचा असाच एक भाग इथे येतो जो की केवळ कलाकारांच्या प्रामाणिक अभिनयामुळे पहावला जातो. विनोदी मालिका लिहिणे आणि ती प्रत्यक्षात आणून प्रेक्षकांना हसवणे हे किती कठीण काम आहे हे यावरून कळून येते. 

विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले एका काळेचे मणी सीरीज मध्ये
विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले ‘एका काळेचे मणी’ मध्ये सीमा आणि बाळकृष्ण पांढरे यांच्या भूमिकेत (PC : Youtube Trailer)

साधारण लिखाण देखील केवळ उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टाइमिंग याच्या जोरावर किती उंचावता येतं हे प्रशांत दामले यांचा अभिनय बघून शिकायला मिळते. त्यांना उत्तम साथ पौर्णिमा मनोहर आणि ऋता दुर्गुळेने दिली आहे. पहिल्या सीजन मध्ये कथा संपत नाही त्यामुळे याचे पुढील सीजन देखील येऊ शकतात आणि ते यावेत. अधिक चांगले लिखाण आणि दिग्दर्शन याच्या जोरावरती पुढील सीजन अधिक चांगले होतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. 

ऋता दुर्गुळे आणि पौर्णिमा मनोहर एका काळेचे मणी मध्ये मीरा काळे च्या भूमिकेत
ऋता दुर्गुळे आणि पौर्णिमा मनोहर एका काळेचे मणी मध्ये आई आणि मुलीच्या भूमिकेत (PC : Youtube Trailer)

सीरीज पहावी का? : 

२५ मिनटांचे ६ भाग म्हणजे एका चित्रपटाएवढाच वेळ तुम्हांला संपूर्ण सीरीज पाहायला लागेल. खूप खळखळून हसवेल अशी अपेक्षा न ठेवता प्रशांत दामले, पूर्णिमा मनोहर आणि ऋता दुर्गुळे साठी तरी तुम्ही ही सीरीज जिओ सिनेमा वरती निश्चितच पाहू शकता. 

Leave a Comment