गोदावरी  | ( Godavari Marathi Movie Review)

फिल्म :  गोदावरी 
कालावधी :  १ तास ५३ मिनिटं 
भाषा : मराठी 
दिग्दर्शक :  निखिल महाजन 
पटकथा :  निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख 
संगीत  :  ए  व्ही प्रफुलचंद्र 
छायांकन :  शमीन कुलकर्णी 
संकलक  : ऋषिकेश पेटवे 
मुख्य कलाकार :  जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, विक्रम गोखले, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर.
कुठे पाहू शकता :  सध्या थिएटर मध्ये 

निशिकांत कामत विषयी :

Nishikant Kamat
निशिकांत कामत

Godavari Marathi Movie Review
2005 साली पुण्यातल्या पेठेतून फिरताना भिंतीवरती एक मोठं पोस्टर दिसलं – रेल्वे फलाटावरच्या जिन्यावर एक मध्यमवयीन व्यक्ती जिने चढत आहे, मागून रेल्वे सुसाट पळतेय आणि पार्शवभूमी वर असणारी लोकांची गर्दी ब्लर करण्यात आली आहे. पोस्टर मध्ये मध्यमवयीन व्यक्तीवर पूर्ण फोकस असून बॅकग्राऊंड ब्लर आहे.  पोस्टरच्या खाली वेग दर्शविणाऱ्या टायपोग्राफी मध्ये लाल आणि पांढऱ्या रंगात अक्षरे लिहिलेली आहेत ‘डोंबिवली फास्ट’. 

पहिल्यांदा जेव्हा ते पोस्टर पाहिलं त्यावेळेसच वाटलं, काहीतरी वेगळा चित्रपट मराठी मध्ये येतोय. काही आठवड्यातच चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आणि भारावून गेलो. संदीप कुलकर्णी यांचा अभिनय, चित्रपटाची कथा आणि चित्रपटाच्या शेवटाला येणारं दीर्घ स्वगत फारच कमाल वाटलं. नंतर कळालं निशिकांत कामत यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. मित्रांपैकी कोणीतरी सांगितले- इंग्रजी चित्रपट ‘फॉलींग डाऊन’ यावर तो बेतलेला आहे. त्यावेळेस थोडीशी निराशा झाली तरी ‘डोंबिवली फास्ट’ चा प्रभाव मात्र कमी झाला नाही. 

पुढे आलेल्या निशिकांत कामतच्याच ‘मुंबई मेरी जान’ ने हि निराशा पूर्णपणे दूर केली. त्याच वेळेस जाणवले या दिग्दर्शकाकडे कथा सांगण्याची हातोटी आहे, फक्त याने नवीन विषय घ्यायला हवेत. त्यानंतर त्याने काही चित्रपट केले परंतु बहुतांशी चित्रपट हे कुठल्यातरी चित्रपटावर आधारित होते किंवा दक्षिणेकडील चित्रपटांचे रिमेक होते. पण त्याचे  कायम लक्षात राहिलेले चित्रपट म्हणजे ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘मुंबई मेरी जान‘.

इथे हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे, निशिकांत कामतचं  2020 साली वयाच्या पन्नासाव्या वर्षी सिरॉसिस ने निधन झालं. जवळचा एक चांगला मित्र गमावला यामुळे जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन दोघेही अस्वस्थ होते.  या अस्वस्थतेतूनच निशिकांत कामत यांना आदरांजली म्हणून त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं. त्यातूनच ‘गोदावरी’ चित्रपटाचा जन्म झाला. चित्रपटाच्या कथेचा आणि निशिकांत कामत यांच्या आयुष्याचा तसा काही संबंध नाही, केवळ चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव निशिकांत दिले गेले आहे बाकी चित्रपटाची कथा ही पूर्णपणे वेगळी आहे.  पण चित्रपटाचं प्रेरणास्थान मात्र आहे निशिकांत कामत आणि त्याने केलेले चित्रपट.

गोष्ट काय आहे ? । What is the story of godavari?

देशमुख कुटुंब पिढ्यान पिढ्या नाशिक ला गोदावरी काठी राहत आले आहे. देशमुख कुटुंबाच्या मालकीच्या असणाऱ्या गाळ्यांचे भाडे गोळा करण्याचं काम निशिकांत देशमुख (जितेंद्र जोशी) करतोय. तेच तेच काम करून तो कंटाळला आहे. आयुष्यात सगळे निर्णय – गाडी घेण्यापासून ते लग्न करण्यापर्यंत कुटुंबाने लादले असे त्याचे म्हणणे आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाला तो आजूबाजूच्या परिस्थितीला आणि कुटुंबाला दोष देतोय. त्यामुळेच सगळ्यांवरच त्याचा राग आहे. वडील (संजय मोने) आणि त्याच्यामध्ये कोणताच संवाद नाही. आई (नीना कुलकर्णी ) आणि बायको (गौरी नलावडे) यांच्याशी तो तुसडेपणाने बोलतो. आजोबा (विक्रम गोखले) डिमेन्शिया ने त्रस्त आहेत. केवळ मुलीशीच तो काय त्याचा जिव्हाळा उरला आहे. कुटुंबाला टाळण्यासाठी तो दुसरीकडे खोली घेऊनराहतोय. त्याचा एकमेव मित्र कासव (प्रियदर्शन जाधव) याच्याशीच तो काय त्याचा संवाद होत असतो. 

अश्या परिस्थितीत निशिकांत ला कळतं त्याच्याकडे फार कमी काळ राहिला आहे. ‘आनंद’ किंवा ‘कल हो ना हो’ चित्रपटातल्या सारखा हा सर्वांशी चांगला वागणारा नायक नाही. ह्याचा सगळ्यांवर राग आहे आणि सग्ळ्यांनाही त्याच्या वागण्याने त्रास झाला आहे. तरीही मृत्यूची चाहूल व्यक्तीला बदलवते.  कोणाला ती कडवट करते तर कोणाला हळवं तर कोणाला जगलेल्या आयुष्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल कृतज्ञ. इथे जसं चित्रपटाच्या टॅग लाईन मध्ये म्हंटलं आहे तसा त्याचा प्रवास सुरु होतो अश्रद्धतेकडून श्रद्धते कडे.  

त्याला ती श्रद्धा मिळते खळखळ वाहणाऱ्या गोदावरी मध्ये. आजोबांकडून -वडिलांकडे, वडिलांकडून-मुलाकडे आणि तिथून पुढल्या पिढी कडे वाहणाऱ्या परंपरेची जाणीव त्याला होते. या जाणिवेतून घरच्यांन सोबतचा तुटलेला संवाद त्याचा सुरु होतो. 

चित्रपट कसा आहे ? How is godavari marathi movie?

गोदावरी पोस्टर

सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांची परंपरा जपणारा हा चित्रपट आहे. चित्रपटात सर्वांत उजवं काय असेल तर यातील प्रत्येकाचा जबरदस्त अभिनय. जितेंद्र जोशी ने साकारलेला निशिकांत त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतली सर्वांत उजवी भूमिका आहे. मानाचा असा ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफि)’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (सिल्वर पिकॉक) पुरस्कारही त्याला मिळाला आहे. निशिकांत च्या मनात असलेली खदखद, दुनियेबद्दलचा राग त्याने डोळ्यातून आणि चेहऱ्यावरील प्रत्येक स्नायूतून प्रभावी रित्या व्यक्त केला आहे. 

गौरी नलावडे ने साकारलेली गौतमी विशेष लक्षात राहते. तिचा नीना कुलकर्णी यांच्या सोबतचा फोन वर बोलण्याचा प्रसंग पाहण्यासारखा आहे. विक्रम गोखले ह्यांची हि शेवटची भूमिका असलेला चित्रपट आणि नेहमीप्रमाणेच ती भूमिका त्यांनी उत्तम साकारली आहे. 

गोदावरी नदी आणि जुनं नाशिक प्रभावीरीत्या कॅमेऱ्यात पकडण्याचं काम छायाचित्रकार शमीन कुलकर्णी याने केल आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेम पासून तो आपल्याला नाशिक आणि गोदावरीच्या काठी घेऊन जातो आणि चित्रपटभर आपल्याला निशिकांतच्या नजरेला दिसणारं नाशिक आणि गोदावरी तो दाखवतो. 

ए  व्ही प्रफुलचंद्र यांचं पार्श्वसंगीत आणि गाणी चित्रपटात आवश्यक असणाऱ्या वातावरण निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचलतात.  

निखिल महाजन ला इफि मध्ये गोदावरी साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. पुणे ५२ नंतरची त्याची हि सर्वांत चांगली फिल्म. उत्तम कलाकारांची, तंत्रज्ञांची केलेली निवड आणि त्याचं दिग्दर्शकीय कौशल्य यामुळे एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान गोदावरी पाहून मिळतं.  

Leave a Comment