Good Bad Girl Review | गुड बॅड गर्ल  – हिंदी वेबसिरीज 

ना गुड ना बॅड फक्त एव्हरेज.   | Good Bad Girl Review

फिल्म :  गुड बॅड गर्ल 
भाषा : हिंदी 
एपिसोड्स:  ९ (प्रत्येकी अंदाजे ३५ मिनिट्स)
शो रनर : विकास बहल,  चैताली परमार
दिग्दर्शक : अभिषेक  सेनगुप्ता
लेखक : तहीरा नाथ, निखिल अरोरा, कल्याणी पंडीत, आरती कपूर, चैताली परमार.
मुख्य कलाकार : समृद्धी दिवाण, गुल पणाग, वैभव राज गुप्ता, शीबा चड्डा, आराध्या अंजना, नम्रता शेठ, राजेंद्र सेठी, झेन खान. 
कुठे पाहू शकता : सोनी लिव 

पदोपदी खोटं बोलायची सवय असणाऱ्या एखाद्या तरी व्यक्तीला तुम्ही नक्कीच भेटला असाल. खोटं बोलताना पकडल्या गेल्या नंतर,अपमान,अवहेलना झाल्यानंतरही खोटे बोलण्याची सवय ती व्यक्ती चालूच ठेवते. बऱ्याच वेळा अशी व्यक्ती हास्याचा,उपहासाचा आणि रागाचाही विषय बनते. पण असा विचार केलाय का की ती व्यक्ती खोटं का बोलते? तिच्या आयुष्यात अश्या काय गोष्टी घडल्या असतील ज्यामुळे त्या व्यक्तीला खोटं बोलण्याची सवय लागली असावी?

‘गुड बॅड गर्ल’  वेब सिरीज अश्याच एका खोटं बोलायची सवय लागलेल्या आणि खोटं बोलून स्वतःची सुटका करून घेणाऱ्या मुलीची गोष्ट सांगते. तिला ती सवय का लागली असावी हे देखील आपल्यलाला अनेक घटना क्रमातून पाहायला मिळते. पण तोच तोच पणा आल्यामुळे वेब सिरीज रट्याळ होते आणि एक चांगला विषय वाया जातो. 

गोष्ट काय आहे ? । Story of Good Bad Girl Web Series

तर ही गोष्ट आहे माया अहुजा (समृद्धी दिवाण) नामक मुलीची. आठ-दहा वर्षाची शाळकरी बुलबुल ते लॉ कॉलेज मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आणि नंतर एका लॉ फर्म मध्ये वकील म्हणून काम करणारी ऍडव्होकेट माया, अश्या तीन भागांमध्ये सिरीज पुढे मागे होत राहते. एकाच वेळेस माया च्या आयुष्यातील तीन वेगवेगळे टप्पे समांतरपणे  दाखवण्यात आले आहेत.

Good Bad Girl Review
समृद्धी दिवाण

या तिन्ही भागांमध्ये लहानपणीचा भाग सगळ्यात चांगला झाला आहे. आराध्या अंजना ह्या चिमुरडीने गोड अभिनय केला आहे. शीबा चड्डा आणि राजेंद्र सेठी सारख्या कसलेल्या कलाकारांसमोर ती सहजतेने अभिनय करते. खरं-खोटं काय आहे अश्या न कळण्याच्या वयात, तिला खोटं बोलण्यासाठी, कधी कॅडबरीच्या रूपात, तर कधी शाबासकीच्या रूपात, कधी शेजारच्यांकडून, तर कधी घरच्यांकडून प्रलोभनं दिली जातात. त्यामुळेच नकळतपणे आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्यात काहीच गैर नाही असे संस्कार तिच्यावर होतात. ह्या संस्कारांमुळेच कदाचित जिथं खरं- खोटं बोलण्याचा जवळचा संबंध येतो, तिच्याच भाषेत  ‘सच को मरोड़ना आना चाहिए ’ असा वकीली व्यवसाय ती निवडते. 

Good Bad Girl Review
आराध्या अंजना

पुढे वकिली फर्म मध्ये काम करत असताना आपली नोकरी जाईल या भीतीने ती स्वतःला कॅन्सर आहे असे खोटंच तिच्या बॉसला (गुल पणाग) सांगते. आता हे खोटं लपवण्यासाठी तिला काय काय अडचणींना सामोरे जावे लागते हे दाखवण्यात सिरीज चे बरेचसे एपिसोड्स जातात. फर्म मध्ये तिच्या सोबत काम करणारा साहील (वैभव राज गुप्ता ) तिचं पितळ उघडं पाडण्यासाठी बरेच प्रयत्न करतो पण यशस्वी होत नाही. शेवटाकडे माया स्वतःच्याच खोटेपणाच्या जाळ्यात अडकत जाऊन पुरती फसते आणि दुसऱ्या सीजन ची हिंट देऊन पहिला सीजन संपतो. 

वेब सिरीज कशी आहे ? Good Bad Girl Review

कॅन्सरचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघडा करण्यासाठी साहील सहज मायाच्या हॉस्पिटल मध्ये थोडी चौकशी करून माहिती घेऊ शकला असता. कॅन्सर चा हा भाग विनाकारण खेचल्या सारखा वाटतो. कॅन्सर वर झालेले विनोद असंवेदनशील वाटतात. शेवटाकडे काहीश्या संवेदनशीलतणे कॅन्सर बाबत काही संवाद येतात पण खरंच कॅन्सर झालेला पेशंट आणि त्याचे कुटुंब हि सिरीज कितपत सहन करू शकतील यात शंका आहे. 

माया खोटं बोलते आणि पकडली जाते, ह्याची बऱ्याच वेळा पुनरावृत्ती होत राहते. त्यात नवीन काही राहत नाही आणि कंटाळा येत जातो. केवळ तिच्या लहानपणीचा भाग करमणूक करतो. सिरीज कंटाळवाणी वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे दोन सीनच्या मध्ये मोठ्या पार्शवसंगीतावर मायाचे चालण्याचे, नाचण्याचे  स्लो मोशनची सतत येणारी दृश्ये.  सुरुवातीला ती दृश्य ठीक वाटतात, पण सतत येऊ लागल्यामुळं कथा अधिकच हळू होत जाते. ९ भागाची सिरीज एडीट करून अडीच तासाची फिल्म केली असती तर अधिक चांगली झाली असती.

Good Bad Girl Review
वैभव राज गुप्ता, समृद्धी दिवाण आणि गुल पणाग

समृद्धी दिवाण एक चांगली अभिनेत्री आहे. तिने हिंदी ‘द ऑफिस’ मध्ये केलेली ‘पम्मी’ वाचकांनी नक्की पाहावी. पण या वेबसिरीज मध्ये मात्र मायाच्या भूमिके मध्ये ती जास्त प्रभाव पाडू शकत नाही. इंग्लिश वेब सिरीज ‘फ्लिबॅग’ चा काहीसा प्रभाव ‘गुड बॅड गर्ल’ वर जाणवतो, पण त्या उंचीवर मात्र ही सिरीज अजिबातच जाऊ शकत नाही. सनफ्लॉवर आणि क्वीन सारख्या वेब सिरीज आणि फिल्म देणाऱ्या विकास बहल ची ही निर्मिती असल्यामुळे काही अपेक्षा घेऊन जाल तर मात्र निराशा होईल. 

Leave a Comment