गुड लक जेरी – फिल्म रिव्यू मराठी 

फिल्म :  गुड लक जेरी
कालावधी :  १ तास ५८ मिनिटे
दिग्दर्शक : सिद्धार्थ सेन गुप्ता 
निर्माता : आनंद एल राय 
मुख्य कलाकार : जान्हवी कपूर, मिता वशिष्ठ, दीपक डोब्रियाल, सुशांत सिंग   
कुठे पाहू शकता : डिज्नी प्लस हॉटस्टार .  

टॉम अँड जेरी मधला जेरी आठवतो. वरवर घाबरट वाटणारा पण  टॉमची खोडी काढून पटकन बिळात जाऊन लपणारा उंदीर जेरी. फिल्म मध्ये जान्हवीचं पात्र जेरी म्हणते “जितना समझते हो, उतनी में हूँ नहीं”’ हे त्या ‘टॉम अँड जेरी’ मधल्या उंदराची आठवण करून देणारं वाक्य.  फिल्म मधली जेरी देखील संकटात सापडल्यानंतर एका मागून एक संकटात टाकणाऱ्यांवर कुरघोड्या करत राहते.  पण ते पाहणं कंटाळवाणं होत जातं.  

साऊथ कडच्या अनेक फिल्म्स च्या रिमेक करण्याची जणू लाटच अली आहे. कबीर सिंग , जर्सी, हिट आणि आता गुड लक जेरी.‘गुड लक जेरी’ हि फिल्म ‘कोलामावू कोकिला’ (२०१८) या तामिळ फिल्म ची रिमेक आहे. मूळ फिल्म पहिली नसल्यामुळे मूळ फिल्म ची येथे तुलना नसून केवळ एक नवीन फिल्म म्हणून कशी वाटली, हे विचार इथे आहेत. 

‘गुड लक जेरी’ फिल्मची गोष्ट थोडक्यात:

जया कुमारी उर्फ जेरी (जान्हवी कपूर) आपली आई सरबती कुमारी (मिता वशिष्ठ ) आणि बहीण छाया कुमारी उर्फ चेरी यांच्यासोबत बिहार मधून पंजाब मध्ये स्थायिक झालेली आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आई सरबती कुमारी घरगुती मोमोज चा व्यवसाय करत आहेत, तर जेरी मसाज पार्लर मध्ये काम करत आहे. 

अश्या आर्थिक पार्शवभूमीवर त्यांना कळते कि आपल्या आईला कॅन्सर आहे आणि केमोथेरपी ला २०-२५ लाख रुपये लागणार आहेत. एवढे पैसे कुठून आणायचे, अशा आर्थिक विवंचनेत असतानाच एका अपघातामुळे त्यांना ड्रग डिलींगचा व्यवहार करावा लागतो. ड्रग डिलींग मधून पैसा कमवून आपण या संकटातून बाहेर पडू असं ठरवून जेरी ड्रग डिलींग च्या व्यवसायात शिरते आणि नंतर काय घडते ते म्हणजे हि फिल्म आहे. 

जान्हवी कपूर

फिल्म ब्लॅक कॉमेडी च्या अंगाने जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे पडद्यावर पात्रांच्या सोबत वाईट घडत असतं पण प्रेक्षकांना मात्र ते बघून हसायला येणं अपेक्षित असतं. हिंदी मध्ये ‘देल्ही बेली’ तर हॉलीवूड मध्ये ‘लिटल मिस सन शाईन’ ब्लॅक कॉमेडीची चांगली उदाहरण आहेत. इथे मात्र एखाद-दुसऱ्या प्रसंगामध्ये केवळ दीपक डोब्रियाल मुळे हसायला येतं. 

जेरी ची महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वीची विचार प्रक्रिया ना पटकथेतून बाहेर येत ना जान्हवी कपूर च्या अभिनयात तिच्या स्वभावात  होणारे बदल दिसून येत. ती मसाज पार्लर मध्ये काम करण्याचा निर्णय का घेते किंवा ड्रग डीलिंग चा निर्णय घेण्यापूर्वी ची तिची  विचार प्रक्रिया प्रेक्षक म्हणून आपल्याला दिसूनच येत नाही . त्यामुळे तिने घेतलेले निर्णय हे अचानक घेतल्या सारखे वाटतात व प्रेक्षक म्हणून आपण जेरीशी जोडले जात नाही. 

शेवटाकडे तर कोण कोणावर कुरघोडी करतोय ह्याचा पूर्ण गोंधळ उडालेला दिसतो.   

काही जमलेल्या गोष्टी :

फिल्म ची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. आनंद एल राय यांच्या सिनेमात दिसणारी कलर पॅलेट इथेही लक्षात येते. दीपक डोब्रियाल प्रत्येक प्रसंगामध्ये भाव खाऊन जातो, त्याने अजून चांगले सिनेमे करायला पाहिजे. 

तुम्ही हि फिल्म डिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकता. 

Leave a Comment