‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस’ या ऋषिकेश गुप्ते यांच्या कथेवर आता चित्रपट.। Hazar vela sholay pahila manus story

Hazar vela sholay pahila manus story २०१३ साली अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात ऋषिकेश गुप्ते यांची एक वेगळीच कथा प्रसिद्ध झाली. कथेचं नाव होतं ‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस’. नावावरूनच कथा कोणाबद्दल आहे हे कळून येते. मग प्रश्न पडतो, कोण आहे हा माणूस? याने शोले हजार वेळा का पाहिला असेल? आणि पहिला जरी असेल तरी यात गोष्ट सांगण्यासारखं काय आहे? याची सगळी तर्कशुद्ध उत्तरे तुम्हांला कथेत मिळतात.

ही काल्पनिक कथा नावाप्रमाणेच हजार वेळा शोले पाहिलेल्या माणसाची आहे. तो स्वतःची ओळख देताना म्हणतो.

कथेत देखील त्याला ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ म्हणूनच संबोधण्यात येतं. तर हजार वेळा शोले पाहिलेल्या माणसाचे वडील- बापू, ७० च्या दशकात कोकणातील छोट्या गावात टुरिंग टॉकीज चालवायचे. त्यांच्याकडे खंडू आणि बारीकराव असे दोघे जण कामाला होते. ‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस, बापू, खंडू आणि बारीकराव या चौघांभोवतीच प्रामुख्याने कथा फिरते. मुंबई किंवा मोठ्या शहरातून गाजलेल्या चित्रपटांची रिळं, डिस्ट्रिब्युटर्स कडून विकत घेऊन गावात टुरिंग टॉकीज च्या माध्यमातून शोज लावायचे हा त्यांचा व्यवसाय होता. तोपर्यंत सुरळीत चालणारा हा व्यवसाय आणि हे लोक, ७५ साली शोले प्रदर्शित झाला त्यानंतर मात्र पूर्ण बदलून गेले. शोलेने त्यांना भरभराट ही दिली आणि देशोधडीलाही लावलं. असं काय घडलं त्यांच्या आयुष्यात? याच्या उत्तरासाठी तुम्हांला मूळ कथा वाचावी लागेल किंवा चित्रपटाची वाट पहावी लागेल.

कथा जेव्हां वाचली त्यावेळेसच वाटलं की अशी कथा मराठीत किंवा इतर कोणत्याही भाषेत माझ्या तरी वाचनात आली नव्हती. कथेतील पात्रं, त्यात निर्माण केलेली वातावरण निर्मिती, शोलेने झपाटलेली माणसं आणि शोलेने भारावलेलं वातावरण- सगळचं अचंबित आणि अस्वस्थ करणारं वाटलं. आजही कधी शोले जेव्हां टीव्ही वर लागतो, त्यावेळेस कथेतली हजारवेळा शोले पाहिलेला माणूस, खंडू, बारीकराव, बापू, टुरिंग टॉकीज असं सगळं परत एकदा आठवतं. 

याच कथेवर आधारित आता मराठी मध्ये चित्रपट येत आहे आणि तो स्वतः या कथेचे लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आहे.चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून घोषित केली नसली तरी तो लवकरच प्रदर्शित होईल अशी अशा आहे. चित्रपटाचे नाव देखील ‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस’ हेच ठेवण्यात आलेलं आहे. यात प्रमुख भूमिके मध्ये सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी, मिलिंद शिंदे, प्राजक्ता दातार आणि किशोर कदम असणार आहेत. लाकडी हिरव्या रंगाच्या फलकावर पिवळ्या अक्षरात शोले लिहिलेलं आणि त्याला झेंडूच्या फुलांचा हार घातलेलं पोस्टर नुकतच प्रदर्शित झालं. 

शोले पोस्टर
शोले पोस्टर

१५ ऑगस्ट १९७५  साली प्रदर्शित झालेल्या शोलेला पुढच्या वर्षी २०२५ साली पन्नास वर्षे पूर्ण होतील. पन्नास वर्षानंतरही शोलेतले विरु, जय, बसंती, ठाकूर, गब्बर हे तर लक्षात आहेतच पण कालिया, सांभा, मौसी, रहीम चाचा त्यांचा मुलगा अहमद, जेलर ही छोटी पात्रं देखील लक्षात आहेत. कुठल्याही चित्रपटाच्या आल्या नसतील त्या शोलेच्या डायलॉग च्या ऑडियो कॅसेट आल्या. त्यातील कितने आदमी थे? होली कब है?, इतना सन्नाटा क्युं है भाई?, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, हे संवाद आज पन्नास वर्षानंतरही पॉपुलर कल्चरचा भाग बनले आहेत. आजही शोलेचा इतका प्रभाव आहे तर शोले ७५ साली जेव्हां प्रदर्शित झाला त्यावेळेस काय परिस्थिती असेल, ह्याची झलक आपल्याला या कथेत पाहायला मिळते. या कथेत शोले जेव्हां पहिल्यांदा गावात मोकळ्या मैदानात पडद्यावर दाखविण्यात आला त्याचं वर्णन करताना लेखक लिहितो.

‘त्यानंतरचे साडेतीन तास गावात चिटपाखरूही हललं नाही. उभं गाव; अगदी कुत्री-मांजरं, पक्षी-पाखरं, किडे- कीटकांसह स्तिमित होऊन ‘शोले’ पाहत बसलं. तो दिवस, ती रात्र, किंबहुना ते साडेतीन तास उभ्या गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत कोरले गेले.
लोक तोंडाचा आ वासत, मोठाल्या डोळ्यांनी ‘शोले’ पाहत बसले.
एरवी गावात पडद्यावर सिनेमा असला की रिकाम्या घरांचा फायदा घेत कुणाच्या तरी घरी चोरी व्हायचीच. फार काही नाही तर कुणाचं कुदळ-फावडं, कुणाची कोंबडी, कुणाच्या घरासमोरचा विजेचा बल्ब काही तरी जायचंच. पण त्या दिवशी गावात एकही चोरी झाली नाही.
एरवी अंगातला वासनेचा ज्वर विझवायची संधी शोधणारे ही अशी उघड्या रात्रीची संधी हमखास साधून घेत. गावात रात्री पडद्यावर सिनेमा असला की दिवसभर बाया-बाप्यांत चिठ्ठ्याचपाट्या, हात-इशाऱ्यांची देवाणघेवाण चाले. मग रात्रीच्या त्या बेहोष उघड्या अंधारात नेहमीचे जोडीदार बदलून खेळले जाणारे शृंगाराचे डाव उधळल्या बैलागत रंगत. पण त्या रात्री यातलं काहीही घडलं नाही. 
शोले’ने जणू मूल मानवी प्रवृत्ती, प्रेरणाच नेस्तनाबूत करून टाकल्या.’

हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस कथेमधून
हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस गोष्ट
Hazar vela sholay pahila manus story
हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस गोष्ट अनुभव मासिकात २०१३ साली छापून आली होती.

ऋषिकेश गुप्ते भयकथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या कथेतील भय हे भूताखेतांमुळे किंवा अमानवीय शक्तीमुळे निर्माण झालेले नसते, ते प्रामुख्याने मानवी मनातून आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे निर्माण होणारे असते. त्यासाठी त्यांनी निर्माण केलेली कथारचना, पात्रं, वातावरण निर्मिती शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.

मराठी मध्ये अश्या वेगळ्या कथेवरचा चित्रपट येतो आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. शोले ला पुढच्याच वर्षी पन्नास वर्षे होत असल्याने हे औचित्य जुळून आले आहे. गुप्त्यांनी या आधी ‘दिल दिमाग बत्ती’ नावाचा मराठी चित्रपट बनविला आहे, तो काही माझ्या पाहण्यात आला नाही आणि तो कुठल्या ओटीटीवर देखील उपलब्ध नाही. यामुळे गुप्त्यांचा ‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस’ चित्रपट कसा असेल ह्याचा काही अंदाज लावता येत नाही. आशा करूया की अश्या उत्तम कथेला न्याय देणारा चित्रपटच आपल्याला पहायला मिळेल. चित्रपट जेव्हां कधी प्रदर्शित होईल तेव्हां आपल्या याच वेबसाईट वरती तुम्हांला चित्रपट कसा आहे हे वाचायला निश्चितच मिळेल.

Leave a Comment