हश हश – हिंदी वेबसिरीज  | Hush Hush Review

कलाकारांच्या अभिनयाने काहीशी तारलेली सिरीज 

फिल्म :  हश हश
भाषा : हिंदी 
एपिसोड्स:  ७ (प्रत्येकी अंदाजे ४० मिनिट्स)
दिग्दर्शक : तनुजा चंद्रा, कोपाल नैथानी, आशिष पांडे    
लेखक : तनुजा चंद्रा, शिखा शर्मा, आशिष मेहता 
संवाद : जुही चतुर्वेदी 
मुख्य कलाकार : जुही चावला, आयेशा झुल्का, सोहा अली खान, शहाना गोस्वामी, क्रितिका कामरा, करिश्मा तन्ना, काव्या त्रेहान, बेंजामिन गिलानी  
कुठे पाहू शकता : अमेझॉन प्राईम 

‘संघर्ष’ आणि ‘दुश्मन’ चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या तनुजा चंद्रा यांचं हे ओटीटी च्या क्षेत्रातलं पदार्पण. सक्षम स्त्री केंद्री कथा हे त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्टय राहत आलेलं आहे. ‘हश हश’ वेबसिरीज मध्ये तर सहा सक्षम अभिनेत्रींची टीमच आहे. त्यात समकालीन असणाऱ्या आयेशा झुल्का आणि जुही चावला या प्रथमच एकत्र काम करत आहेत. पण कथा आणि पटकथा तितकी प्रभावी नसल्यामुळे सिरीज म्हणावी तितकी प्रभाव पाडू शकत नाही.

गोष्ट काय आहे ? । Story of Hush Hush Web Series

‘हश हश’ म्हणजे गुप्त गोष्ट-गुप्तता राखणे. गुरुग्राम मधील आलिशान -उच्चभ्रू अश्या ‘ला ओपलंझा’ नामक सोसायटी मध्ये राहणाऱ्या चार मैत्रिणी – सायबा (सोहा अली खान)- पूर्वाश्रमीची पत्रकार,  इशिता (जुही चावला)-पब्लिक रिलेशनशिप मॅनेजर, झायरा (शहाना गोस्वामी)-फॅशन डिझायनर, डॉली (क्रितिका  कामरा)-कौटुंबिक कोलाहलात अडकलेली गृहीणी, या सगळ्या अपघातानेच एका गुन्ह्याचा भाग बनतात. ज्यामुळे आपल्यातील एका मैत्रिणीला त्यांना गमवावं लागतं. त्यानंतर त्यांच्या मागे लागणारा पोलिसांचा तसेच गुन्हेगारांचा ससेमिरा, गमावलेल्या मैत्रिणी बद्दल, तिच्या भूतकाळाबद्दल बाहेर येणाऱ्या गुप्त गोष्टी आणि त्यातून निर्माण होणारे मैत्रीतील-कुटुंबातील ताणतणाव म्हणजेच ‘हश-हश’ चे सात भाग. इंग्लिश वेब सिरीज ‘बिग लिटल लाईज’ चा काहीसा प्रभाव एकूणच कथानकावर जाणवत राहतो.  

वेबसिरीज कशी आहे ? How is Hush Hush Web series

कथा नवीन नाही. अपघाताने गुन्ह्यामध्ये ओढले गेलेले मित्र-मैत्रिणी आणि त्यानंतर त्यांना सामोरे जावं लागणाऱ्या अडीअडचणी अनेक चित्रपटामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. ‘हश-हश’ चे पहिले तीन भाग चांगल्या रीतीने उत्सुकता निर्माण करतात. पण अनेक महत्वाची पात्र असणारी कथा सांगितली जात असताना, प्रत्येक पात्राची उपकथा सांगण्याच्या नादात, मुख्य कथासूत्र बाजूला सारल्या गेल्या सारखे वाटते. गुन्ह्या बद्दलचं गूढ आणि त्यामागे असणारी व्यक्ती पाचव्या भागामध्येच चाणाक्ष प्रेक्षक लगेच ओळखू शकतील. त्यानंतर येणारे दोन भाग उगाच खेचल्या सारखे वाटतात आणि आणखी एक सीजन काढण्याच्या हेतूने अनेक गोष्टींचा शेवट न करता विनाकारण वाढवला आहे. 

Hush - Hush Web Series Scene
सोहा अली खान, शहाणा गोस्वामी आणि कृतिका कामरा- हश-हश मधील एका प्रसंगामध्ये

कृतिका कामरा, सोहा अली खान आणि शहाणा गोस्वामी अभिनयामध्ये बाजी मारतात. तिघींच्या अभिनयामुळे त्यांची मैत्री खरी जाणवते. जुही चावलाची ‘इशिता संघमित्रा’ म्हणून केलेली निवड चुकीची वाटते. भावनिक प्रसंग सोडता पब्लिक रिलेशन मॅनेजर म्हणून स्वभावात असणारा ठामपणा आणि कठोरता तिच्या अभिनयात दिसून येत नाही. करिष्मा तन्ना चा धरसोड हरयाणवी उच्चार ही  वेळोवेळी खटकतो.  बऱ्याच काळानंतर पडद्यावर दिसणारी आयेशा झुल्का, मीरा यादव च्या भूमिकेमध्ये प्रभाव पाडून जाते. कमी लांबीच्या भूमिका असली तरी मेहेर च्या भूमिके मध्ये काव्या त्रेहान विशेष लक्षात राहते. पिकू आणि विकी डोनर च्या लेखिका जुही चतुर्वेदी यांचे संवाद मात्र पात्रांनुसार लिहिले गेले असल्यामुळे योग्य वाटतात.

पटकथेमध्ये अनेक गोष्टी येत नाही. स्वभाव, पार्श्वभूमी आणि व्यवसाय अगदी भिन्न असणाऱ्या चौघी जणींची घट्ट मैत्री कशी झाली हे कुठेच दाखवण्यात आलेलं नाही. इशिताचं  (जुही चावला) पात्र गरिबीतून येऊन औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात इतकं प्रभावशाली कसं बनतं, हे देखील कुठे येत नाही. कदाचित दुसऱ्या सीजन साठी त्यांनी ते राखून ठेवलं असेल. पण कथेचा मूळ गाभा असणारी ही बाजू, पहिल्याच सीजन मध्ये फ्लॅशबॅक म्हणून का होईना येणं अपेक्षित आहे. ज्यावर प्रेक्षकांचं पुढे येणाऱ्या प्रसंगामध्ये – त्यातील पात्रांमधील गुंतणे अवलंबून आहे. त्यामुळे इशिता (जुही चावला) बद्दल तिच्या स्वभावाबद्दल, मैत्रीण म्हणून जेव्हां अनेक गोष्टी बोलल्या जातात, तेव्हां प्रेक्षक म्हणून आपण त्याच्याशी जोडले जाऊ शकत नाही. 

‘हश-हश’ चे प्रोमोशन करताना अमेझॉन प्राईम च्या टीम च्या वतीने युट्युब वरती एक स्किट बनवण्यात आलं. ज्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर च्या भूमिकेमध्ये ‘हश-हश’ मधील गीता (कश्मिरा तन्ना), ‘पाताललोक’ सिरीज मधील हाथिराम (जयदीप अहलावत) आणि ‘फॅमिली मॅन’ सिरीज मधील ‘जे के’ (शरीब हश्मी ) याना घेण्यात आले. प्राईम ला निश्चितचं ‘पाताललोक’  आणि ‘फॅमिली मॅन’ चा प्रेक्षक वर्ग इथे अपेक्षित होता.’दुर्देवाने ‘हश-हश’ ही सिरीज ‘पाताललोक’ आणि ‘फॅमिली मॅन’ ची उंची कुठेच गाठू शकत नसल्यामुळे ह्या अपेक्षित वर्गाची मोठी निराशा होते. 

Leave a Comment