आय लव यू हिंदी फिल्म रिव्यू |I love you Hindi Film Review

निखिल महाजन चं निराशादायक  हिंदी पदार्पण 

चित्रपट :  आय लव यू 
कालावधी :  १ तास ३० मिनिटं
दिग्दर्शक:  निखिल महाजन
कथा पटकथा आणि संवाद :  निखिल महाजन
मुख्य कलाकार :  रकुल प्रीत सिंग, पावेल गुलाटी, अक्षय ओबेरॉय.
कुठे पाहू शकता : जिओ सिनेमा

I love you Hindi Film Review गोदावरी आणि पुणे ५२ सारखे चित्रपट देणाऱ्या निखील महाजन ची ही पहिलीच हिंदी फिल्म. निखिलच्या चित्रपटांबद्दल ते कसे असतील हा अंदाज करणे थोडं कठीण काम आहे. काही वेळेस तो फारच कमाल चित्रपट काढतो, तर काही वेळेस त्याच्या बाजी किंवा बेतालसारख्या फिल्म/ वेब सिरीज पाहून निराशा होते. ‘आय लव यू’ चा ट्रेलर पाहून उत्सुकता तर निर्माण झाली होती पण चित्रपट पाहून मात्र निराशा झाली.

I love you Hindi Film Review. रकुल प्रीत सिंग
रकुल प्रीत सिंग सत्या च्या भूमिकेमध्ये

गोष्ट काय आहे । What is the story of I love you 

रात्रीच्या वेळेस बंद झालेली कॉर्पोरेट ऑफिसेस आतून तुम्ही कधी पाहिली आहेत का? काचेच्या उंच उंच भिंतींमध्ये बंदिस्त असलेल्या ह्या ऑफिसेस मध्ये, रात्री जेव्हां हजारो स्क्वेअर फुट चे फ्लोअरस् निर्मनुष्य होतात, तेव्हा भयानक शांतता पसरते. चालताना होणारा बुटांचा आवाज, टॉयलेटमध्ये फ्लश होण्याचा आवाज,कोणी चालत गेले तर अचानकपणे सेन्सरस मुळे उघडझाप करणाऱ्या लाईट्स हे सर्वच एखाद्या हॉरर किंवा थ्रिलर फिल्म साठी अनुरूप. 

मला आठवतंय मी काम करत असणाऱ्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये लिफ्ट उघडल्यानंतर, लिफ्ट मध्ये बॉबी देओल च्या सोल्जर चित्रपटातील ‘सोल्जर सोल्जर’ ह्या गाण्याचं संगीत रात्रंदिवस वाजायचं. दिवसा ते वर्दळीमुळे इतकं ऐकू यायचं नाही, पण रात्री हे साधं गाणं सुद्धा विचित्र वाटायचं. इथे हे सांगण्याचं कारण म्हणजे या चित्रपटाची कथा देखील रात्रीच्या वेळी अशाच बंदिस्त कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घडते आणि अनेक नव्वदच्या दशकातील गाणी चित्रपटात येतात.

सत्या प्रभाकर (रकुल प्रीत सिंग) ही एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ पदावर कामाला आहे. त्याच कंपनीत काम करत असणारा विशालने (अक्षय ओबेरॉय) सत्याला प्रपोज केले आहे आणि आता ते दोघेही सोबत आहेत. याच कंपनीत सिक्युरिटी विभागात कामाला असणारा राकेशचे (पावेल गुलाटी) सत्यावर एकतर्फी प्रेम आहे आणि सत्या आणि अक्षय एकत्र आल्यामुळे तो अस्वस्थ झाला आहे. एके दिवशी सत्याला तिच्याच ऑफिसमध्ये कोंडून बांधून ठेवले जाते आणि त्यानंतर सगळा थरार सुरु होतो. ते का होते? कोण करते? कशासाठी होते? हे इच्छुकांनी फिल्म पाहून जाणून घ्यावे किंवा चाणाक्ष वाचक त्याचा अंदाज सहज लावतील.

'आय लव यू' हा २००७ साली आलेल्या P2 या इंग्रजी चित्रपटचा रिमेक आहे. 
I love you Hindi Film Review रकुल प्रीत सिंग, पावेल गुलाटी
आय लव यू हिंदी फिल्ममध्ये -रकुल प्रीत सिंग आणि पावेल गुलाटी

चित्रपट कसा आहे ? | How is I love you film ?

चित्रपट अपेक्षित अशी वळणे घेत जातो, अनपेक्षित असे धक्के तो देत नाही, जे की सस्पेन्स थ्रिलर प्रकारच्या चित्रपटात खिळवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या ३५-४० मिनिटांमध्ये सत्याला का, कोणी, कशासाठी कोंडले आहे किंवा बांधून ठेवले आहे, याची उत्तरं आपल्याला मिळतात. त्यानंतरच्या सर्व चित्रपटात, सत्याने सुटका करून घेण्यासाठी केलेली धडपड आपल्याला दिसते, पण त्यासाठी आवश्यक असणारा थरार मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. चित्रपटातील काही प्रसंग चांगले झाले आहेत जसे की सत्या आणि राकेश यांची मैत्री होऊन ती फुलत जाण्याचा दृष्यक्रम छान दाखवला आहे. 

अभिनय (Acting ): 

सत्या मधील निरागसता, खेळकरपणा चित्रपटाच्या सुरुवातीला रकुल ने छान साकारली आहे, पण ज्या वेळेस सत्याचे पात्र भीती, राग आणि धाडस या मिश्र भावनांची मागणी करते, त्यावेळेस तिच्या अभिनयातील मर्यादा जाणवून येतात. चित्रपटात एक कॅराओके गाण्याचा प्रसंग आहे तो बघताना तर हे विशेष जाणवते. चित्रपटात अनेक नव्वदच्या दशकातील गाण्यांचा संदर्भ येतो. डर चित्रपटातील ‘तू मेरे सामने’ किंवा क्रिमिनल चित्रपटातील ‘तू मिले’. निखिल महाजन हा शाहरुख खानचा मोठा फॅन आहे, त्यामुळे डर मधील शाहरुख ने साकारलेला राहुल हा नक्कीच त्याचा संदर्भ असणार. पण शाहरुखने साकारलेल्या राहुलच्या डोळ्यातील वेडसरपणा, विक्षिप्तपणा, उत्कटता याची पावेलने साकारलेल्या राकेश मध्ये बरीच उणीव जाणवते. अक्षय ओबेरॉय च्या वाट्याला मात्र फारच कमी प्रसंग आले आहेत.

I love you Hindi Film Review
पावेल गुलाटी, रकुल प्रीत सिंग आणि अक्षय ओबेरॉय.

चित्रपट बघावा का (verdict ) : 

रकुल प्रीत सिंगचे तुम्ही चाहते असाल, तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. या चित्रपटापेक्षा मी तुम्हांला जिओ सिनेमावरच मोफत उपलब्ध असणारा, निखिल महाजनचाच, मराठी चित्रपट गोदावरी पाहायला सुचवेल, ज्याचा रिव्ह्यू याच वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गोदावरी मराठी चित्रपट रिव्यू

Leave a Comment