जाने जान रिव्यू – जयदीप अहलावत च्या अभिनयाने सांभाळलेला चित्रपट । Jaane Jaan Movie Review in Marathi


चित्रपट
:  जाने जान 
कालावधी :  २ तास १९ मिनिटं
दिग्दर्शक:  सुजोय घोष
कथा पटकथा आणि संवाद :  सुजोय घोष, राज वसंत
छायाचित्रण: अविक मुखोपाध्याय
संकलक:  उर्वशी सक्सेना
पार्श्व संगीत: सचिन जिगर
मुख्य कलाकार :  करीना कपूर, जयदीप अहलावत, विजय वर्मा, सौरभ सचदेव.
कुठे पाहू शकता : नेटफ्लिक्स

Jaane Jaan Movie Review in Marathi २००५ साली प्रकाशित झालेली ‘केगो हिगाशिनो’ लिखित जापनीज कादंबरी ‘द डिवोशण ऑफ सस्पेक्ट एक्स‘ यावरती  ‘जाने जान’ चित्रपट आधारित आहे. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही त्यामुळे कादंबरी आणि चित्रपटाची तुलना इथे नसून, केवळ चित्रपट पाहून मला काय वाटले हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

करीना कपूर हीचं हे ओटीटी पदार्पण आणि तिच्या समोर एफटीआयआय मधून शिकलेले विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांसारखे कसलेले अभिनेते या चित्रपटामध्ये आहेत. आर के स्टुडिओ विरुद्ध प्रभात स्टुडिओ असाही गमतीने उल्लेख एका मुलाखतीत करण्यात आला. कहानी आणि बदला सारखे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या सुजोय घोषनेच ‘जाने जान’ चे दिग्दर्शन केले आहे. या सर्व गोष्टींमुळे ‘जाने जान’ बद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली होती. याचवर्षी नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरीज २’ मधील सुजोय घोष च्या कथेने खूपच निराशा केली होती त्यामुळे ‘जाने जान’ माफक अपेक्षा ठेवूनच बघायला सुरुवात केली पण एकूण परिणाम पाहता अपेक्षाभंगच झाला. 

गोष्ट काय आहे । What is the story of Jaane Jaan in Marathi?

माया डिसुझा (करीना कपूर) ही पश्चिम बंगाल मधील कलिंपोंग या शहरामध्ये आपली मुलगी तारा (नायशा खन्ना) हिच्यासोबत राहत आहे.  उदाहरनिर्वाहासाठी ती ‘टिफिन’ नावाचा कॅफे चालवत आहे. तिच्या शेजारीच राहत असलेला मॅथ्स टीचर नरेन व्यास (जयदीप अहलावत) याचे मायावर एकतर्फी प्रेम आहे आणि ते तो अजून पर्यंत तरी तिच्यापाशी व्यक्त करू शकलेला नाही. तिच्या कॅफेला मात्र तो न चुकता रोज भेट देत असतो.

Jaane Jaan Movie Review in Marathi
विवेक वर्मा – जाने जान मध्ये करण आनंद च्या भूमिके मध्ये (PC : Youtube Trailer)

अशातच कलिंपोंग ला भेट देणाऱ्या पोलीस सब इन्स्पेक्टर अजित म्हात्रे (सौरभ सचदेव) ची हत्या होते आणि त्याचा शोध घेण्याची जबाबदारी करण आनंद (विजय वर्मा) या इन्स्पेक्टर वरती सोपविण्यात येते. 

सुरुवातीच्या तीस मिनिटांमध्येच खून कोणी? का? कसा? कुठे केला? हे प्रेक्षकांना कळून येते त्यानंतरचा चित्रपट हा पोलीस आणि खुनी यांच्यामध्ये चालणारा उंदीर मांजराचा खेळ आहे, ते जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

‘जाने जान’ चित्रपट कसा आहे ? | How is the film Jaane jaan ?

बऱ्याच वेळा रहस्य कथांमध्ये खून कोणी केला? याचा शोध घेतला जातो आणि शेवटाकडे खून करणारी अनपेक्षित अशी व्यक्ती पोलिसांना अथवा गुप्तहेरांना सापडते ‘हू डण इट?’ (कोणी केलं हे?) हा त्याचा गुंतवून ठेवणारा मुख्य भाग असतो. 

करीना कपूर - जाने जान मधील एका दृश्यात
करीना कपूर – जाने जान मधील एका दृश्यात (PC : Youtube Trailer)

तर काही कथांमध्ये खून कोणी, कोणाचा, कशासाठी आणि का केला हे सगळं कळल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी नायक अथवा नायिकेने  केलेल्या क्लृप्त्या, प्रयत्न आणि पोलिसांना दिलेला गुंगारा अशी कथा मांडणी दिसून येते. इथे प्रामुख्याने दृश्यम चित्रपटांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, ‘जाने जान’ देखील याच प्रकारात मोडतो. या दोन्ही चित्रपटामधील साम्य पुढे येईलच. 

सुजोय घोष चाच कहानी चित्रपट म्हंटल्यावर जसं विद्या बालन आणि चित्रपटातील बंगाली वातावरण डोळ्यासमोर उभं राहतं तसेच ‘जाने जान’ पाहिल्यानंतर जयदीप अहलावत आणि वेस्ट बंगाल मधील कलिंपोंग हे शहर स्मरणात राहतात. येथील धुक्याने अच्छादलेलय अरुंद गल्ल्या, पहाडातील वैशिष्ट्यपूर्ण घरं आणि कॅफे एक गूढ वातावरण निर्मिती करण्यास मदत करतात आणि ते तितक्याच प्रभावीपणे छायाचित्रकार अविक् मुखोपाध्याय याने आपल्या कॅमेऱ्याने चित्रित केले आहे. 

जयदीप अहलावत ने या चित्रपटामध्ये कमाल काम केले आहे आणि त्याला विजय वर्माने तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे. मितभाषी, बुध्दिमान, एकाकी आणि मायाला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी धडपडणारा मॅथ्स टीचर नरेन व्यास – जयदीप अहलावत च्या अभिनयामुळे कायम लक्षात राहील. नरेन च्या तोंडी चित्रपटात अनेक वेळा वाक्य येते कि “मैं सब संभाल लुंगा “ त्याच्या अभिनयाने खरंच त्याने हा चित्रपट सांभाळून घेतला आहे असंच म्हणावं लागेल. 

जयदीप अहलावत - जाने जान मधील एका दृश्यात
जयदीप अहलावत – जाने जान मध्ये मॅथ्स टीचर नरेन व्यास च्या भूमिकेत (PC : Youtube Trailer)

करीना कपूर काही प्रसंगांमध्ये चांगली वाटते, विशेषतः एका व्यक्तीबरोबरचा झटापटीचा प्रसंग जो की तुम्ही ट्रेलर मध्ये देखील पाहिला असेल तो प्रभावी झाला आहे. इतर अनेक प्रसंगांमध्ये मात्र तिचा प्रभाव पडत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर एका प्रसंगामध्ये १४ वर्षांपूर्वी ज्याच्या त्रासाला कंटाळून तिने पळ काढलेला असतो ती व्यक्ती तिचा माग काढत तिला गाठतो तेव्हा ती तिथून पळ काढून घरी पोहोचते. परंतु पुढच्याच प्रसंगांमध्ये ती गाणी गुणगुणत स्वयंपाक करताना दाखविली आहे. नुकत्याच घडून गेलेल्या एवढ्या मोठ्या प्रसंगाचा जो भावनिक धक्का, चिंता किंवा भीती तिला वाटायला पाहिजे तितकी मात्र तिच्या अभिनयात दिसून येत नाही जे कि  अनेक प्रसंगांमध्ये अपेक्षित होतं.

दृश्यम आणि ‘जाने जान’ । Drushyam and Jane Jaan 

मूळ जापनीज कादंबरीचे हक्क एकता कपूर यांच्याकडे आहेत आणि त्यांनीच ‘जाने जान’ चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. मूळ कादंबरी आणि दृश्यम चित्रपटातील कथा यामध्ये बरेच साधर्म्य असल्याचे सांगून दृश्यम चित्रपटाचा हिंदी रीमेक थांबविण्यात यावा अशी जुनी बातमी देखील आपल्याला या लिंक वरती वाचावयास मिळेल. आता प्रश्न उरतो दोन्ही चित्रपटात खरंच साम्य आहे का? तर याचं उत्तर होय असंच म्हणावं लागेल. पात्रं जरी बदलली तरी ज्या कारणांसाठी दृश्यम ओळखला जातो त्याचा मूळ गाभा मात्र दोन्ही कडे सारखा आहे. परंतु शेवट मात्र दोन्हीचा वेगळा आहे. दृश्यम चा शेवट अधिक धक्कादायक आणि समाधान देणारा आहे तर ‘जाने जान’ मधील शेवट पाहिल्यानंतर एवढी लपाछपी का चालली होती मग? अशी म्हणण्याची वेळ येते.

दृश्यम भावनिक दृष्ट्या तुम्हांला जास्त जोडून घेतो आणि त्याच्या पटकथेमध्ये आणि दिग्दर्शनात एक सफाईदारपणा जाणवतो जो ‘जाने जान’ मध्ये जाणवत नाही. दृश्यम आणि ‘जाने जान’ यांच्यात तुलना केली असता निश्चितच दृश्यम हा जास्त उजवा ठरतो. 

चित्रपट पाहावा का? : 

जयदीप अहलावत च्या अभिनयासाठी तुम्ही निश्चितच हा चित्रपट पाहू शकता. पण जर तुम्ही दृश्यम पाहिला असेल तर चित्रपटाच्या मध्यापर्यंत तुम्हाला साधारण अंदाज येतो की काय घडलं असेल आणि कसं घडलं असेल पण शेवट मात्र तुम्हाला थोडासा चकित करू शकतो. तुम्हाला दृश्यम सारखे  चित्रपट आवडत असतील तर एकदा हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment