गोंधळलेला जादूगर । Jadugar Film Review

चित्रपट : जादूगर 
कालावधी :  २ तास ४७ मिनिटे
दिग्दर्शक : समीर सक्सेना
मुख्य कलाकार : जितेंद्र कुमार, जावेद जाफरी आणि आयुषी शर्मा.  
कुठे पाहू शकता : नेटफ्लिक्स.  

सुमारे २ तास ४७ मिनिटे लांबीची ‘जादूगर’ फिल्म तासभर जर कमी केली असती तर सुसह्य झाली असती. TVF पासून वेगळे होऊन, स्वतःची वेगळी प्रोडक्शन कंपनी (Posham Pa Pictures) तयार करणारे बिस्वपती सरकार आणि समीर सक्सेना यांची हि पहिली फिल्म. TVF च्या पिचर्स, पर्मनंट रूममेट सारखे शोज लिहिणारे बिस्वपती सरकार यांनी ‘जादूगर’ लिहिली असल्यामुळे बऱ्याच अपेक्षा होत्या. 

जादूगर थोडक्यात गोष्ट :

मिनू (जितेंद्र कुमार) लहानपणी जादूगार छाबरा (मनोज जोशी ) यांचे जादूचे प्रयोग पाहतो, त्याचवेळेस मोठेपणी मी पण जादूगार होणार असे ठरवतो. मात्र मिनुच्या वडिलांची शेवटची इच्छा म्हणून, मिनूचा काका (जावेद जाफरी ) मिनूने फुटबॉल खेळावे आणि इंटरकॉलनी प्रतिष्ठेची मानली गेलेली दाभोलकर ट्रॉफी जिंकावी यासाठी प्रयत्न करत असतो. मिनुला फुटबॉल मध्ये ना कौशल्य असते ना रस. मिनुला केवळ जादूगर व्हायचं आहे आणि त्यातच तो रममाण असतो. 

याचदरम्यान मिनुच्या आयुष्यात दिशा (आयुषी शर्मा) येते जी डोळ्यांची डॉक्टर आहे. एकमेकांबद्दल जास्त काही माहिती नसतानाही, केवळ एका महिन्याच्या ओळखी मध्येच आपल्या पाठीमागे लागणाऱ्या मिनूशी दिशा लग्न  करायला तयार होते. आता मिनुला दिशाशी लग्न देखील करायचं आहे, जादूगार देखील व्हायचे आहे आणि दिशाशी लग्न करण्यासाठी, तिच्या वडिलांनी फुटबॉल खेळून फायनलला जाण्याची अट देखील पूर्ण करायची आहे. 

या सर्व गोष्टी दाखवताना फिल्म ला नक्की काय दाखवायचं आहे याचा गोंधळ उडालेला दिसतो. हि मिनुची जादूगर बनण्याची फिल्म आहे, फुटबॉल वरची फिल्म आहे का मिनू आणि दिशा ची प्रेम कथा आहे?  कथानकात नसलेल्या दिशेमुळे, ऐरवी चांगलं काम करणारा जितेंद्र कुमार सारखा अभिनेता देखील इथे गोंधळलेला दिसतो. 

जितेंद्र कुमार

जादूगरी, प्रेम आणि फुटबॉल : 

जादूगरी, प्रेम आणि फुटबॉल हे तीन वेगवेगळे विषय एकत्र करण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न इथे दिसतो. ‘खरं प्रेम असेल तरच खरी जादू करता येते’, ‘प्रेम हीच जादू आहे’ असे संवाद हि इथे येतात. ‘प्रेमासाठी माणूस अशक्य गोष्ट देखील करू शकतो’ म्हणून मिनूचं  फुटबॉलची मॅच जिंकायचा प्रयत्नही इथे येतो. 

फ़ुटबॉलमधली जादू दाखवण्यासाठी, फुटबॉल खेळताना पत्त्याच्या कॅट मधले पत्ते खेळाडूला फेकून मारणे, फुटबॉल च्या जागी दगड ठेऊन खेळाडूला जखमी करणे किंवा स्वतः जखमी होऊन खेळाडूवर मारण्याचे आरोप घेणे असला खोडसाळपणा येथे फुटबॉलमधली जादू म्हणून दाखवला आहे.

तीन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये जोडून ते चित्रपट म्हणून तीन तास खेचण्याचा निष्फळ प्रयत्न इथे दिसतो. जावेद जाफरी, मनोज जोशी आणि आरुषी शर्मा यांनी आपली कामं व्यवस्थित केलेली आहेत पण एकंदरीत लिखाणामध्येच फिल्म फसते.  

जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्मा

काही चांगल्या गोष्टी :

मिनुच्या कॉलनी मधील अनेक पात्रं फिल्म मध्ये येतात पण विशेष लक्षात राहतो मिनुच्या इन्शुरन्स विकणाऱ्या मित्राची भूमिका करणारा लल्ली. मिनुच्या पहिल्या गर्लफ्रेंड सोबतचा ब्रेकअप सिन काही काळासाठी करमणूक करतो. 

फिल्म मधील ‘जादुगरी फिर इष्क ने कि’ आणि ‘क्या खेलारे शाबाश’ हि गाणीही लक्षात राहतात. बाकी चित्रपट मात्र निराशा करतो.तुम्ही हि फिल्म नेटफ्लिक्स वर पाहू शकता.    

Leave a Comment