जी करदा वेब सीरीज रिव्यू | Jee Karda Web Series Review

भडक, बिनधास्त आणि उथळ. 

वेबसिरीज :  जी करदा 
कालावधी :  ८ एपिसोडस (अंदाजे तीस मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक: अरुणिमा शर्मा  
कथा पटकथा आणि संवाद :  अब्बास दलाल, हुसेन दलाल, अरुणिमा शर्मा
पार्श्व संगीत: सचिन जिगर
मुख्य कलाकार :  तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सोहेल नायर, अन्या सिंग, हुसेन दलाल, संवेदना सुवालका, सिमोन सिंग, मल्हार ठकार, सयान बॅनर्जी
कुठे पाहू शकता : अमेझॉन प्राईम व्हिडिओ.

मॅडॉक फिल्मस या प्रोडक्शन कंपनीचीच ‘सास बहू और फ्लेमिंगो‘ या वेब सिरीज बद्दल काही दिवसांपूर्वीच लिहिले. त्या वेब सीरीजचा दिग्दर्शक होमी अदजानी याने ‘जी करदा’ चे देखील काही भाग दिग्दर्शित केले आहेत. सिरीज ची मुख्य दिग्दर्शिका अरुणिमा शर्मा हिची ही पहिलीच वेब सीरीज, याआधी तिने काही शॉर्ट फिल्म्स आणि अनेक ऍड फिल्म्स केल्या आहेत. तर वाचूया कशी आहे ‘जी करदा’ वेब सीरीज.

गोष्ट काय आहे । What is the story of Jee Karda

वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून येणारे सात मित्र-मैत्रिणी (चार मुलं आणि तीन मुली) ह्यांची हि गोष्ट आहे. वयाच्या पंधराव्या वर्षीचं, त्याचं शालेय जीवन आणि तिशीच्या उंबरठ्यावरचं त्याचं आजचं आयुष्य, अशी दोन समांतर कथानकं आपल्याला फ्लॅशबॅक आणि आत्ताचा काळ अशी पाहायला मिळतात. 

सिरीज मध्ये जरी सात पात्र असली तरी कथानक मुख्यत्वे फिरते ते आर्किटेक्ट असणाऱ्या लावण्या (तमन्ना भाटिया) भोवती. लावण्या आणि रिषभची (सोहेल नायर) बारा वर्षापासूनची मैत्री  आणि गेल्या चार वर्षापासून ते एकत्र राहत आहेत. एका पार्टीमध्ये दारूच्या नशेत सर्वांसमोर ऋषभ लावण्याला लग्नाची मागणी घालतो आणि तीही दारूच्या नशेत हो म्हणून टाकते. 

लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या परस्परांतील आणि कुटुंबातील मतभेदामुळे आणि वादामुळे, आपण लग्नाचा घेतलेला निर्णय खरंच योग्य आहे का? आपलं खरंच एकमेकांवर प्रेम आहे का? हा प्रश्न दोघांनाही पडलेला आहे. यातच त्यांचा मित्र असलेला आणि ज्याच्यावर शाळेत असताना लावण्याचं एकतर्फी प्रेम अर्थात क्रश होता, तो रॉकस्टार अर्जुन (आशिम गुलाटी) इथे येतो आणि लावण्याच्या संभ्रमात अजूनच भर पडते. 

याच सात मित्रांमधील शितलने (संवेदना सुवलका) मिठाईचं दुकान चालवणाऱ्या समीरशी (मल्हार ठकार) लग्न केलेलं आहे. एकत्र कुटुंबात टू बीएचके फ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्यांना, मुख्य हॉलमध्ये सोफ्यावर झोपावे लागत आहे. अश्याने त्यांना खाजगी असं आयुष्यच राहिलेल नाही. एकांतपणा मिळविण्यासाठी त्यांची सतत धडपड चालूए आणि तो न मिळाल्यामुळे दोघांमधील नात्यात तणाव निर्माण झाला आहे.

‘लोग बहुत है, और घर छोटे, मुंबई है, यहाँ ऐसे ही होता है |’


सिरीज मधील एकमेव चांगला वाटलेला संवाद, जो मुंबईमधील एकत्र कुटुंबात किंवा छोट्या जागेत राहणाऱ्या लोकांची अडचण योग्य शब्दात व्यक्त करतो.

आपल्या मित्रासोबत समलैंगिक संबंधात असणारा मेलरोय (सयान बॅनर्जी) त्याच्या बॉयफ्रेंडच्या हिंसक वागण्याने त्रस्त झालेला आहे.

शालेय शिक्षक असणारा शाहिद आपल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे वैतागलेला आहे. तर स्कूल कौन्सिलर असणारी प्रीत (अन्या सिंग) सतत नवीन प्रेमाच्या शोधात आहे.  

सात जणांची आजची ही आयुष्य हि पंधरा वर्षांपूर्वीच्या त्यांच्या शालेय जीवनाशी कशी जोडली गेलेली आहेत हे पूर्ण सिरीज भर पाहायला मिळते.

Jee Karda Web Series Review
जी करदा वेब सीरीज मधील शालेय जीवनातील एक दृश्य

वेब सिरीज कशी आहे? | How is Jee Karda Web series?

१५ आणि ३० – ही प्रत्येकाच्याच आयुष्याची महत्त्वाची अथवा निर्णायक ठरू शकणारी वयं, इथे दिग्दर्शक आणि लेखक आपल्या पात्रांची गोष्ट सांगण्यासाठी ही वयं निवडतात.पंधराव्या वर्षी आयुष्याबद्दल रंगविलेली स्वप्न ,आपले मित्र-मैत्रिणी त्यांच्याशी असणारं आपलं नातं तिशी येईपर्यंत कसं बदलत जातं, हे दाखविण्याचा दिग्दर्शक आणि लेखकाचा प्रयत्न असावा. 

‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटांचा लेखक हुसेन दलाल यानेच ‘जी करदा’  चे लेखन आणि संवाद लेखन, दिग्दर्शिका अरुणिमा आणि अब्बास दलाल यांच्या सोबत केले आहे. हुसेन दलाल ने ‘जी करदा’ चे डायलॉग लिहिण्या सोबतच शाहिद ची भूमिका देखील केली आहे. 

ज्यांनी कुणी ब्रह्मास्त्र पाहिला असेल त्यांना त्यातील उथळ संवादाची किती खिल्ली उडविण्यात आली याची कल्पना असेलच. त्यामुळे ‘जी करदा’ बघण्यापूर्वी जी भीती होती ती दुर्दैवाने खरी ठरली. अनेक सेक्स शी संबंधित पांचट जोक, शिव्यांचा सतत वापर आणि आपण काहीतरी ‘कुल’ लिहिले आहे हा आव, अनेक प्रसंगात पाहायला मिळतो. जो काही मर्यादे पलीकडे अनावश्यक वाटतो.  संवाद आणि प्रसंग सहज वाटण्याऐवजी दिखाऊ गिरी कडे झुकल्यासारखे वाटतात.

कथेमध्ये प्रसंगांना आवश्यक असणारा ठहराव दिसत नाही, जो की अनेक भावनिक गुंतागुंत असणाऱ्या पात्रांच्या कथानकाला आवश्यक आहे असे वाटते. भावनिक उलथापालथ झाल्यानंतर पात्र विचार करताना कुठेच दिसत नाही. त्यामुळे एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात कथा फक्त पुढे सरकत राहते आणि पटापट प्रसंग घडत राहतात. 

संपूर्ण सीरीज मध्ये एकांतवास शोधणाऱ्या शितल आणि समीर या जोडप्याचं एकमेव असं कथानक चांगल्या अभिनयामुळे पाहण्यासारखं झालं आहे. 

Jee Karda Web Series Review - तमन्ना भाटिया जी करदा वेब सीरीज
तमन्ना भाटिया जी करदा वेब सीरीज मध्ये लावण्या च्या भूमिकेत

तांत्रिक बाजू (Technical Aspects) :

बऱ्याच ठिकाणी हॅन्ड हेल्ड कॅमेराचा वापर केला आहे आणि तो का केला हे कळत नाही. ज्यामुळे प्रसंगावर लक्ष जाण्याऐवजी कॅमेऱ्याच्या हालचालीकडे लक्ष अधिक जाते जे की प्रसंगाला मारक ठरते. 

अभिनय (Acting ): 

लहान मुलांकडून उत्तम अभिनय काढून घेणे ही एक कला आहे आणि काही दिग्दर्शकांनाच ती साध्य झाली आहे. याचं एक उत्तम उदाहरण नुकताच पाहिलेल्या ‘स्कूल ऑफ लाइज‘ या वेब सीरीजचं देता येईल. स्कूल ऑफ लाईजचं उदाहरण देण्याचे कारण ‘जी करदा’ मध्ये देखील त्याच वयोगटातील मुलं शालेय जीवन दाखविताना घेण्यात आली आहे. पण दोन्ही वेब सीरीज मधील मुलांच्या अभिनयात प्रचंड फरक जाणवतो. 

ताज वेब सीरीज मधील सलीम नंतर आशिम गुलाटीने मॉडर्न रॉकस्टार अर्जुन गिल चं पात्र सहजतेने साकारलं आहे. तरी या सर्वांमध्ये प्रभावी वाटते ती शितलचं पात्र करणारी संवेदना सुवलका, आपल्या पतीसोबत आपल्याला एकांत मिळत नाहीये आणि आर्थिक स्वातंत्र्य असूनही दोघांसाठी निर्णय आपण घेऊ शकत नाही, यामुळे होणारी घुसमट तिने प्रभावीरीच्या दाखविली आहे.

Jee Karda Web Series Review-  जी करदा वेब सीरीज रिव्यू
जी करदा वेब सीरीज मध्ये हुसेन दलाल, सयान बॅनर्जी, अन्या सिंग, तमन्ना भाटिया, सोहेल नायर, आशिम गुलाटी आणि संवेदना सुवालका

सिरीज पहावी का?

सचिन जिगर यांनी संगीत दिलेली यातील काही गाणी चांगली झाली आहेत, पण गाण्यांसाठी थोडीच कुणी वेब सीरीज बघतो, ते तर तुम्ही युट्युब वर देखील पाहू शकता. लॉकडाऊन च्या काळात जेव्हा मर्यादित पर्याय लोकांकडे मनोरंजनासाठी उपलब्ध होते, त्यावेळेस कदाचित ही वेब सिरीज पाहिली गेली असती, पण ओटीटी चे भरपूर पर्याय उपलब्ध असण्याच्या आजच्या काळात तुम्ही ही वेब सिरीज नाही पाहिली तरी तुम्ही काही मिस कराल असे वाटत नाही. 

Leave a Comment