हृदयस्पर्शी ‘कस्तुरी’ । Kastoori Movie Review in Marathi 

चित्रपट:  कस्तुरी 
कालावधी :  १ तास ४० मिनिटं
दिग्दर्शक: विनोद कांबळे
कथा/पटकथा/संवाद  : विनोद कांबळे, शिवाजी करडे, दिग्विजय थोरात.
छायाचित्रण:  मनोज काकडे. 
संकलक:  श्रीकांत चौधरी.
संगीत: जयभीम शिंदे.
मुख्य कलाकार :समर्थ सोनवणे, श्रावण उपाळकर,वैशाली केंडले. 
कुठे पाहू शकता :  बुक माय शो स्ट्रीम. 

Kastoori Movie Review in Marathi जेव्हां एखादी कलाकृती आपल्या आसपासच्या जगाबद्दल, माणसांबद्दल अधिक संवेदनशील बनवते, विचार करायला लावून, आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करते आणि आपल्याला अधिक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करत असेल, तेव्हा ती मला उत्कृष्ट कलाकृती वाटते. ‘कस्तुरी’ हा चित्रपट मला अशाच कलाकृतींपैकी एक वाटला. 

माझ्या किंवा हे वाचणाऱ्या बहुतांश लोंकांच्या अनुभवा पलीकडचे जग ‘कस्तुरी’ दाखवतो. आपले रोजचे आयुष्य सुरळीत, स्वछ, निर्मळ करण्यासाठी आपल्या मधीलच हे लोक कधी कचरा उचलतात, कधी सार्वजनिक शौचालय-गटारं साफ करतात, तर कधी बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावतात. अश्या सफाई कामगारांच्या आयुष्यात ‘कस्तुरी’ आपल्याला घेऊन जातो आणि कृतज्ञता, दुःख, वेदना, आशा- निराशा, प्रेरणा अश्या संमिश्र भावनांचा अनुभव देतो.  

२०२० सालातील उत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘कस्तुरी’ चित्रपटाला मिळाला असून दिग्दर्शक विनोद कांबळे यांची ही पहिलीच फिल्म आहे. बार्शी येथील सनी चव्हाण या खऱ्या व्यक्तिच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. 

Kastoori movie review in marathi
कस्तुरी चित्रपटाचे पोस्टर – गोपी (समर्थ सोनावणे) आणि आदिम (श्रावण उपाळकर)

चित्रपटाची कथा:

गोपी चव्हाण (समर्थ सोनावणे) या आठवीत शिकणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. गोपीची आई (वैशाली केंडले) सरकारी इस्पितळात साफ-सफाई ची कामं करती आहे. इस्पितळात झाडून-पुसून घेण्यापासून ते संडांसं साफ करण्यापर्यंत, साफ-सफाईची सगळी कामं तिला करावी लागतात. याच इस्पितळात गोपीचे वडील पोस्टमार्टम विभागात पडेल ते काम करतायेत. पोस्टमार्टम नंतरच्या साफ-सफाई पासून ते बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यापर्यंतची कामं त्यांना करावी लागतात. आई-वडिलांच्या या कामात गोपीला देखील वेळोवेळी मदत करावी लागतेय. चित्रपटाची सुरुवातच गोपी इस्पितळातील संडास साफ करतो आहे आणि त्यानंतर बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावतो आहे अश्या निर्भिड दृष्यांनी होते. ती दृष्य पाहताच आपल्याला चित्रपटाचा सूर लक्षात येतो. 

ही कामं केल्यामुळे शरीराचा-कपड्याचा येणारा अपरिहार्य वास गोपीला सतत छळतोय. त्यात वर्गातील काही मुलं तो जवळ आला की नाकाला रुमाल लावायला लागतात. या अप्रिय वासापासून सुटका करुन घेण्यासाठी तो अत्तर वापरणे, रोज गणवेश धुवायला टाकणे, सुगंधित साबण वापरणे असे नानाविध प्रकार करुन पाहतोय. त्याच वेळेस त्याला कस्तुरी च्या सुगंधाबद्दल कळते. कस्तुरीच्या प्राप्तीनंतर गोरक्षनाथांप्रमाणे आपल्याही शरीराचा कस्तुरी सारखा सुगंध येईल या बाभड्या आशेने गोपी आपला मित्र आदिम (श्रावण उपाळकर) सोबत कस्तुरी मिळवण्याच्या मागे लागतो. या पुढचा गोपीचा प्रवास जाणण्यासाठी तुम्ही आवर्जून हा चित्रपट पहावा.  

Kastoori movie review in marathi
कस्तुरी चित्रपटातील एका दृश्यात गोपी (समर्थ सोनावणे).

प्रशंसनीय: 

अभिनय: 

गोपी ची भूमिका करणारा समर्थ सोनवणे आणि आदिम ची भूमिका करणारा श्रावण उपाळकर हे दोघेही अभिनय करतात असे वाटतच नाही. त्यांचा वावर इतका सहज, नैसर्गिक आणि निरागस आहे की आपण कथेमध्ये पूर्ण हरवून जातो. गोपीच्या आईची भूमिका करणारी वैशाली केंडले हिचं काम देखील विशेष लक्षात राहतं ते अभिनयातील सहजते मुळेच. ही अभिनयाची सहजता चित्रपटातील प्रत्येक पात्रात जाणवते. 

दिग्दर्शन:

विनोद कांबळे यांची ही दिग्दर्शक म्हणून पहिलीच फिल्म. जेव्हां दिग्दर्शक नवख्या कलाकारांकडून इतका उत्तम अभिनय काढून घेतो, त्यावेळेसच त्याने अर्धी बाजी जिंकलेली असते. चित्रपटात अनेक दृश्य अशी आहेत जिथे आपल्याला पाहताना किळस येऊ शकते आणि तेच दिग्दर्शकलाही अपेक्षित असावं. अश्या ठिकाणी दिग्दर्शक त्या दृश्यांचा अतिरेक करत नाही, योग्य ठिकाणी आणि आवश्यक तेवढाच प्रभाव टाकण्या करता त्या दृश्यांचा वापर केला जातो. कुठेही कॅमेरा किंवा एडिटिंग स्वतःकडे लक्ष वेधून एन घेता कथेला पूरक राहतात, ज्यामुळे प्रेक्षक कथेत अधिक गुंतून राहतो.दिग्दर्शकीय पहिला प्रयत्न असूनही ही प्रगल्भता प्रभावित करते. 

Kastoori movie review in marathi
कस्तुरी चित्रपटातील एका दृश्यात – गोपी (समर्थ सोनावणे) आणि आदिम (श्रावण उपाळकर).

पार्श्वसंगीत:

जयभीम शिंदे यांनी दिलेलं पार्श्वसंगीत चित्रपटातील दृश्य अधिक उंचावण्याचं काम करतात. गोपीला  जेव्हां रेल्वे रूळा शेजारील झाडीत कस्तुरी मृग दिसल्यावर वाजणारं पार्श्वसंगीत असेल किंवा त्यांना कस्तुरी मिळाल्यानंतरच किंवा शेवटाकडे वाजणारं संगीत असू दे एकूणच चित्रपटांची उंची उंचावण्याचं काम पार्श्वसंगीताने केले आहे असे वाटते. 

निष्कर्ष:

तुम्हाला फँड्री आणि कोर्ट सारखे मराठी चित्रपट आवडले असतील तर हा चित्रपट तुम्ही अजिबात चुकवता कामा नये. तुम्हाला पाहण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे सारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शविला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला आहे. 

Leave a Comment