लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू – पहा केवळ कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित कथेसाठी | Lust Stories season 2 Review

चित्रपट:  लस्ट स्टोरीज सीजन २
कालावधी :  २ तास १२ मिनिटं
दिग्दर्शक:  कोंकणा सेन शर्मा, आर बाल्की, सुजोय घोष, अमित शर्मा
मुख्य कलाकार :  तिलोत्तमा शोम, अमृता सुभाष, श्रीकांत यादव, नीना गुप्ता, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, कुमुद मिश्रा, काजोल, अनुष्का कौशिक.
कुठे पाहू शकता : नेटफ्लिक्स

लस्ट म्हणजे वासना- तीव्र इच्छा, ती वेगवेगळ्या गोष्टींची असू शकते – खाण्याची, पिण्याची, संपत्तीची, पदाची किंवा प्रसिद्धीची. पण वासना म्हंटल की प्रामुख्याने आपल्यासमोर येते ती कामवासना आणि त्यासोबतच दबक्या आवाजात त्याबद्दल होणारी कुजबुज. याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून नेटफ्लिक्सने २०१८ साली ‘लस्ट स्टोरीज‘ या नावाने शॉर्ट फिल्मस अँथोलॉजी (लघुपट संग्रहिका) आपल्यासमोर आणली होती. ज्यामध्ये झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप आणि करण जोहर या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या आणि काम वासना हे सूत्र असणाऱ्या चार शॉर्ट फिल्मस या अँथोलॉजीच्या भाग होत्या. 

पाच वर्षांनी  नेटफ्लिक्सने पुन्हा एकदा चार नवीन दिग्दर्शकांना  (कोंकणा सेन शर्मा, आर बाल्की, सुजोय घोष आणि अमित शर्मा)  घेऊन ‘लस्ट स्टोरीज सीजन २’ आणला आहे. पाच वर्षांपूर्वी धाडसी वाटणारी ही अँथोलॉजी आज अनेक वेब सिरीज मध्ये जिथे सर्रास अशा गोष्टी दिसत असताना त्याचे वेगळेपण कितपत टिकवून ठेवते? जाणून घेऊया काय आणि कश्या आहेत या गोष्टी या रिव्यु मधुन.

गोष्टी काय आहेत? । What are the stories of lust stories season 2

ज्या क्रमाने या कथा दाखविण्यात येतात त्याच क्रमाने आपण थोडक्यात त्यांची गोष्ट आणि त्यानंतर ती कशी आहे हे जाणून घेऊ या. खाली कथेचे नाव आणि कंसात दिग्दर्शकाचे नाव दिले आहे.

मेड फॉर इच अदर (आर बाल्की)

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू नीना गुप्ता
नीना गुप्ता ‘लस्ट स्टोरीज सीजन २’ मध्ये दादीच्या भूमिकेत

चिनी कम, पॅडमॅन, पा यांसारखे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या आर बाल्की यांची ही पहिलीच शॉर्ट फिल्म. 

मृणाल ठाकूर आणि अंगद बेदी हे काही महिन्यांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि आता त्यांच्या लग्नाची बैठक त्यांच्या पालकांसोबत बसली आहे. बैठकीमध्ये दोघांकडील पालक, ते एकमेकांना कसे अनुरूप आहेत, आवडीनिवडी कशा जुळता आहेत असे बोलत असतानाच, मृणाल ठाकूरची दादी, अर्थात नीना गुप्ता, सगळ्यांसमोर बैठकीमध्ये प्रश्न विचारते 

“तुम लोगों ने सेक्स किया है? ….एक छोटी सी गाड़ी लेने से पहले टेस्ट ड्राइव करते हो ना? …तो शादी से पहले नो टेस्ट ड्राइव ?”

-नीना गुप्ता (लस्ट स्टोरीज सीजन २)

दादीच्या या स्फोटक प्रश्नामुळे घरात त्यानंतर काय काय गोष्टी घडतात हे दाखविणारी हि शॉर्ट फिल्म.

मिरर (कोंकणा सेन शर्मा)

Lust Stories season 2 Review. तिलोत्तमा शोम, अमृता सुभाष
तिलोत्तमा शोम आणि अमृता सुभाष ‘लस्ट स्टोरीज सीजन २’ मध्ये

कोंकणा हीला आपण एक चांगली अभिनेत्री म्हणून तर ओळखतोच पण ती एक चांगली दिग्दर्शिका ही आहे. तिने दिग्दर्शित केलेली फिल्म ‘डेथ इन अ गुंज‘ बरीच नावाजली गेली. तिची ही पहिलीच शॉर्ट फिल्म आणि दिग्दर्शकीय असा दुसरा प्रयत्न. 

कंपनीत काम करत असणारी इशिता ( तिलोत्तमा शोम)  डोकं दुखत असल्यामुळे एका दुपारी लवकरचं घरी येते, तेव्हां तिच्याच खोलीत, तिच्याच बेडवर, तिच्या घरी काम करत असणारी सीमा (अमृता सुभाष) एका पुरुषा सोबत सेक्स करताना तिला दिसते. अचानक असं काही दिसल्यामुळे आणि काय करावे हे न कळल्यामुळे इशिता पटकन स्वतःच्याच घरातून बाहेर येते. दुसऱ्या दिवशी गोंधळल्यामुळे ती सीमाला काहीच बोलू शकत नाही. त्यानंतर मात्र ते रोजच घडू लागते आणि इशिताही ते रोज स्वतःच्याच घरात लपून पाहू लागते.  इशिता आणि सीमा एकमेकींना पकडतात का? तो पुरुष कोण असतो? याचा शेवट काय होतो ? हे सगळं तुम्हाला शॉर्ट फिल्म पाहून कळेलचं.

सेक्स विथ एक्स( सुजोय घोष)

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया ‘लस्ट स्टोरीज सीजन २’ मध्ये

एका कंपनीचा सीईओ असणारा विजय वर्मा, गाडीला अपघात झाल्यामुळे एका गावात उतरतो आणि त्याच वेळेस त्याला त्याची दहा वर्षांपूर्वी गायब झालेली बायको (तमन्ना भाटिया) तिथे भेटते. अनेक रहस्य उघडली जातात, खून होतो, ट्विस्ट येतात आणि कथा शेवटाकडे येते, इथे एवढेच सांगता येईल. फिल्म कशी आहे हे पुढे येईलच.

तिलचट्टा (झुरळ) ( अमित शर्मा): 

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू कुमुद मिश्रा, काजोल
कुमुद मिश्रा आणि काजोल लस्ट स्टोरीज सीजन २ मध्ये

कुमुद मिश्रा आपल्या बायको (काजोल) आणि मुलासोबत एका हवेलीत राहत आहे. कधीकाळी अस्तित्वात असणारी श्रीमंती आता लयाला गेलेली असली, तरी श्रीमंतीचा माज आणि स्त्रियांचं लैंगिक शोषण करण्याची सवय मात्र अजून गेलेली नाही. आपल्या बायकोवर तर तो अत्याचार करतोच पण घरात काम करणाऱ्या स्त्रियांना देखील त्याने सोडलेलं नाही. त्याच्या मुलाला मात्र उच्च शिक्षण घ्यायचं आहे आणि या सर्वातून आपल्या आईला बाहेर काढून इंग्लंडला न्यायचं आहे. हे सर्व दाखवत असतानाच शेवटाकडे दोन मोठे ट्विस्ट येतात. काजोल आणि तिच्या मुलाची यातून सुटका होते का? काय आहेत ते ट्विस्ट? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हि शॉर्ट फिल्म पहावी लागेल.

चित्रपट कसा आहे ? | Lust Stories season 2 Review

या चारही लघुपटांमध्ये उजवी ठरते ती कोंकणा सेन शर्मा हिने दिग्दर्शित केलेली ‘मिरर’ नावाची शॉर्ट फिल्म. कथा सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, दिग्दर्शन आणि अभिनय या सगळ्याच बाबतीत ती इतर तीनही कथांपेक्षा कित्येक पटीने सरस झाली आहे. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहायला प्रत्येकालाच सुप्तपणे का होईना आवडतं. त्यामुळे असा आभास निर्माण करणारे बिग बॉस सारखे कार्यक्रम सीजन दर सीजन चालतात. पण ज्यावेळेस पाहिलं जाणाऱ्याचं खाजगी आयुष्य हे त्याचं लैंगिक आयुष्य असतं त्यावेळेस काय घडतं? पाहणारा, पाहून देणारा यांना अचानकपणे जेव्हां एकमेकांच्या सत्याला सामोरे जावं लागतं त्यावेळेस काय उलथापालत होते? हे या शॉर्ट फिल्म मध्ये पहायला मिळेल. 

अमृता सुभाषने उत्तम अभिनयाद्वारे हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘मान्सून वेडिंग‘, सर, ‘देल्ही क्राईम सीजन टू‘ यामधील आपल्या दर्जेदार अभिनयामुळे तिलोत्तमा शोमनेही स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. या दोघीही जेव्हा एकाच शॉर्ट फिल्म मध्ये एकत्र येतात तेव्हा अभिनयाचा दर्जा किती उंचावतो हे इथे दिसते. दोघींमधील भांडणाच्या एका प्रसंगांमध्ये – गोंधळलेपण, राग, द्वेष,तिरस्कार अशा अनेक छटा त्यांनी कमालीच्या ताकदीने दाखविल्या आहेत. अवघडलेपणा किंवा संकोच अभिनयात दाखवणे ही तशी कठीण गोष्ट आहे. पण या दोघींनीही शेवटच्या प्रसंगांमध्ये ज्या पद्धतीने तो दाखवला आहे तो पाहण्यासारखाच झाला आहे. हरहुन्नरी अभिनेता श्रीकांत यादव देखील छोट्या भूमिकेत छाप टाकून जातो.

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू
अमृता सुभाष, श्रीकांत यादव,तिलोत्तमा शोम
अमृता सुभाष, श्रीकांत यादव आणि तिलोत्तमा शोम ‘लस्ट स्टोरीज सीजन २’ मधील एका दृश्यात

दुसऱ्या क्रमांकावर येईल ‘बधाई हो‘ चित्रपटाचा दिग्दर्शक अमित शर्मा याने दिग्दर्शित केलेली तिलचट्टा (झुरळ) ही शॉर्ट फिल्म. कुमुद मिश्रा यांचा उत्तम अभिनय आणि शेवटाकडे येणारे एकापाठोपाठ एक असे दोन ट्विस्ट यामुळे ही शॉर्ट फिल्म लक्षात राहते. काजोलला इथे घेण्याचा अट्टाहास मात्र कळून येत नाही. त्या भूमिकेसाठी ती योग्य वाटत नाही.

तिसऱ्या क्रमांकावर येईल ‘कहाणी‘ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय घोष याने दिग्दर्शित केलेली शॉर्ट फिल्म. सुरुवातीपासूनच या शॉर्ट फिल्म मध्ये काहीतरी बिनसलं आहे असं वाटत राहतं. अभिनय चांगला नाही, सिनेमेटोग्राफी चांगली नाही, प्रोडक्शन डिझाईन वाईट त्यात अनेक ट्विस्ट येतं राहतात. शेवटाकडे जो ट्विस्ट येतो त्यामुळे आपल्याला सगळ्याचा उलघडा होतो खरा पण एकूणच शॉर्ट फिल्म जमली नाही असे वाटते. विजय वर्मा सारखा अभिनेता असून देखील अभिनयात कमतरता जाणवते. 

चौथ्या क्रमांकावर आणि सगळ्यात शेवटी आहे ती म्हणजे आर बाल्की दिग्दर्शित ‘मेड फॉर इच अदर’. आजीचा अट्टाहास आहे की लग्न होण्या आधी आपल्या नातीने होणाऱ्या नवऱ्यासोबत सेक्स करून पहावा, ज्याने तो आपल्याला अनुरूप आहे का नाही हे कळून येईल. विषय धाडसी आहे पण त्याची मांडणी उथळ झालेली आहे. इथे कथा सांगणे कमी आणि उपदेश देणे जास्त होते. त्यामुळे आजीचे उपदेशात्मक संवाद एका मर्यादे पलीकडे चिडचिड निर्माण करतात. त्यात सगळ्यांचाच अभिनय सर्वसाधारण झाला आहे. नीना गुप्ता एकाच सुरात सगळे संवाद बोलत राहते, मृणाल ठाकूर केवळ हसत राहते आणि अंगद बेदीला तर काहीच संवाद नाही. आर बाल्की सारखा अनुभवी दिग्दर्शक असूनही सगळ्यात वाईट ही शॉर्ट फिल्म झाली आहे.

चित्रपट पाहावा का? (Verdict ) : 

या अँथॉलॉजि मधील कोंकणा सेन शर्मा ची ‘मिरर’ ही शॉर्ट फिल्म तरी तुम्ही पाहायलाच हवी, बाकीच्या तीनही शॉर्ट फिल्म्स पाहिल्या नाही तरी चालतील. या वर्षातील उत्तम कलाकृतींची लिस्ट वर्षाअखेरीस जेव्हां निघेल त्यावेळेस ही शॉर्ट फिल्म नक्कीच वरच्या क्रमांकावर असेल यात शंका नाही.

Leave a Comment