मेरी ख्रिसमस। Merry Christmas Movie Review in Marathi  

चित्रपट:  मेरी ख्रिसमस
कालावधी :  २ तास २४ मिनिटं
दिग्दर्शक: श्रीराम राघवन.   
कथा/पटकथा/संवाद  : फ्रेडरिक डार्ड, श्रीराम राघवन, अरिजीत बिस्वास, अनुकृती पांडे, पूजा लोढा सुरती.  
छायाचित्रण:   मधू निलकंदन. 
संकलक:  पूजा लोढा सुरती.
संगीत: प्रितम
मुख्य कलाकार : कॅटरिना कैफ, विजय सेतुपती, टीनू आनंद, विनय पाठक, संजय कपूर, लुक केनी. राधिका आपटे. 
कुठे पाहू शकता :  सध्या थिएटर मध्ये 

Merry Christmas Movie Review in Marathi एका रात्रीत घडणारे चित्रपट म्हंटले की आपल्या समोर ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ‘इस रात की सुबह नहीं’ असे हिंदी चित्रपट येतात. नुकताच येऊन गेलेला मराठी चित्रपट ‘वाळवी’ देखील या मध्येच मोडतो. या सर्व चित्रपटांची वैशिष्ट्य म्हणजे हे  चित्रपट सुरुवातीपासून शेवट पर्यंत आपल्याला कथेमध्ये खिळवुन ठेवतात. मुळातच १२-२४ तासातच नाट्य घडत असल्यामुळे क्षणक्षणाला उत्कंठा वाढत जाते. 

मेरी ख्रिसमस मध्ये देखील हा थरार अनुभवायला येतो पण तो चित्रपटाच्या उत्तरार्धात. शेवटाकडे येणारे हे थ्रील अनुभवण्यासाठी तुम्हांला सुरुवातीचा जवळपास एक तास तरी चित्रपटाच्या कथेसाथी द्यावा लागेल. त्यानंतर कथेमध्ये थरारपटासाठी आवश्यक असणारे नाट्य घडायला सुरुवात होते. काही जणांना सुरुवातीचा हा एक तास कंटाळवाणा वाटू शकतो पण नंतर येणाऱ्या कथेसाठी तो बिल्डअप आवश्यक आहे असे वाटते. श्रीराम राघवनचे आत्तापर्यंतचे चित्रपट जर तुम्ही पाहिलेत तर तो तुम्हांला चित्रपट सुरु झाल्या झाल्या त्याच्या कथेमध्ये खिळवुन ठेवतो. बदलापूर, अंधाधून, जॉनी गद्दार हे चित्रपट सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच तुम्हांला कथेमध्ये गुंतवून घेतात. तसे मेरी ख्रिसमस बाबत घडत नाही. दिग्दर्शकाने हा जाणीवपूर्वक घेतलेला धाडसी निर्णय म्हणावा लागेल. 

Merry Christmas Movie Review in Marathi
मेरी ख्रिसमस चित्रपटातील एका दृश्यात कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपती (PC : Youtube Trailer)

गोष्ट काय आहे । What is the story of the movie Merry Christmas in Marathi?

मेरी ख्रिसमस घडतो ८०-९० च्या दशकात ज्या वेळेस मुंबईला बॉम्बे म्हंटलं जातं असे.अल्बर्ट (विजय सेतुपती) हा ख्रिसमस च्या दिवशी बॉम्बे मध्ये आपल्या घरी आला आहे. काही वर्षापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तो आज प्रथमच घरी आला आहे. अश्या वेळेस ख्रिसमसच्या संध्याकाळी तो फिरायला घराबाहेर पडतो आणि एका रेस्टॉरंट मध्ये त्याची मारिया (कॅटरिना कैफ) आणि तिची छोटी मुलगी ॲनी (परी शर्मा) यांच्याशी ओळख होते. गप्पा मारता मारता तो मारियाच्या घरी जातो तेव्हां तिथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून येतो. आता यापुढे काहीही सांगणे हे स्पॉइलर होईल. अल्बर्ट आणि मारिया व तिच्या मुली मध्ये या काही तासांमध्ये जे नातं तयार होतं त्याला चित्रपटाचा जवळपास उत्तरार्ध जातो. हा वेळ घेणं का आवश्यक होतं हे चित्रपटाचा शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल.

मूळ फ्रेंच कादंबरी, फ्रेंच चित्रपट आणि मेरी ख्रिसमस

मेरी ख्रिसमस चित्रपट हा फ्रेडरिक डार्ड लिखित ‘बर्ड इन अ केज’ या १९६१ सालच्या फ्रेंच कादंबरीवरून घेण्यात आलेला आहे. पुढच्याच वर्षी म्हणजे १९६२ साली त्याच कादंबरीवर आधारित ‘पॅरिस पिक अप’ हा फ्रेंच चित्रपट देखील बनविण्यात आला. मी मूळ कादंबरी (इंग्रजी अनुवाद) वाचली आहे आणि त्यावर आधारित फ्रेंच चित्रपट देखील पाहिला आहे. मेरी ख्रिसमस कथेमध्ये थोडे-फार बदल करतो पण तो कादंबरीच्या मुख्य कथेशी प्रामाणिक राहतो. 

Bird In a Cage - Frederic Dard Book Cover
मूळ कादंबरीचा इंग्रजी अनुवाद – ‘बर्ड इन अ केज’ पुस्तक मुखपृष्ठ

मूळ कादंबरी मध्ये आणि फ्रेंच चित्रपटात ॲनी बोलू शकते, मेरी ख्रिसमस मध्ये मात्र तिला मुकी दाखविण्यात आलं असले तरी शेवटाकडे त्याचा छान वापर करुन घेण्यात आलेला आहे. कादंबरी मध्ये अल्बर्ट ची गर्लफ्रेंड ही दिसायला बरीचशी मारियासारखी असते त्यामुळे अल्बर्ट तिच्याकडे आकर्षित होतो असे वर्णन आहे. पण चित्रपटात मात्र तसे दाखविण्यात आलं नाही, अल्बर्टला मारिया विचारते देखील की वो दिखने में मेरे जैसी थी क्या? त्यावर तो नाही म्हणतो. चित्रपटात दाखविण्यात आलेली ओरिगामी आणि त्याचा कथेत केलेला कुशलतेने वापर मूळ कादंबरी आणि फ्रेंच चित्रपटात नाही. 

Paris Pick up French Movie Poster
कादंबरीवर आधारित फ्रेंच चित्रपट ले मॉन्ट चार्ज (पॅरिस पिक अप ) पोस्टर

मेरी ख्रिसमस चित्रपट कसा आहे ? | How is the film Merry Christmas?

अभिनय

विजय सेतुपती या चित्रपटात संयंत अभिनय करतो. त्यात जास्त अभिनय करण्याचा आवेश नसतो त्यामुळे त्याच्या अभिनयात एक सहजता आहे पण त्यामुळे काही लोकांना त्याचा अभिनय फिका वाटू शकतो किंवा ठळकपणे त्याचा अभिनय लक्षात राहील असं होणार नाही. विजय सेतुपतीच्या अभिनयाची ताकत समजून घेण्यासाठी सर्वांना मी त्याचा ९६ (यूट्यूब) आणि सुपर डिलक्स( नेटफ्लिक्स) हे चित्रपट सुचवेन. दोन्ही चित्रपट उत्तम तर आहेतच पण त्यातील विजय सेतुपतीचा अभिनय देखील कमाल झाला आहे. मेरी ख्रिसमस पाहताना ९६ मधील विजय सेतुपतीची प्रकर्षाने आठवण येते. 

कॅटरिना कैफची तिच्या चित्रपट कारकिर्दीतली सर्वांत उत्तम भूमिका असेल आणि ती तिने चांगली निभावून नेली आहे. विशेषतः क्लोज़ अप शॉट मधील तिचे हावभाव उत्तम झाले आहेत. तरी कोणी चांगली अभिनेत्री या भूमिकेला अधिक चांगला न्याय देऊ शकली असती असे वाटते. फ्रेंच चित्रपटातील लिया मसारी या अभिनेत्रीचं काम पाहिल्यानंतर तर ते अधिकच जाणवतं.

छोट्या भूमिकेमध्ये संजीव कपूर आणि अश्विनी काळसेकर मजा आणतात. दोघंही उत्तम अभिनेते आहेत आणि उत्तम अभिनेत्यांमुळे एखाद्या प्रसंगाची उंची कशी वाढू शकते हे बघायला मजा येते. 

Merry Christmas Movie Review in Marathi
संजय कपूर आणि अश्विनी काळसेकर मेरी ख्रिसमस मधील एका दृश्यात

दिग्दर्शन

वर उल्लेख केल्याप्रमाणे चित्रपटातील नाट्यमयता ही उत्तरार्धात ठेवणे आणि पूर्वार्ध संपूर्णपणे कथा उभारणी, पात्रांमधील नातं फुलवणे यासाठी ठेवणे हा खरंच एक धाडसी निर्णय होता. पण त्याचे फळ तुम्हांला उत्तरार्धात मिळते.  अनेक प्रसंग हे एका टेक मध्ये घेण्यात आले आहेत- जसं की मारिया आणि अल्बर्ट यांचा एकत्र डान्स करतानाचा प्रसंग, शेवटाकडील पोलीस स्टेशन मधील प्रसंग – पण ते कुठेही लक्ष वेधून घेण्यासाठी केले आहेत असे वाटत नाही, त्या त्या प्रसंगाचा प्रभाव वन टेक मुळे जास्त उठून आला आहे. चित्रपटातील जे रहस्य आहे, हे तो खून कसा केला? यावर आहे, तो कोणी केला असेल याचा अंदाज चित्रपट पाहताना आपल्याला येतो. तो कसा केला हे कळल्यानंतर काहींचा भ्रमनिरास होऊ शकतो पण त्यानंतर देखील चित्रपट तुम्हांला शेवटाकडे चकीत करतो. 

संगीत: 

प्रीतम ने संगीत दिलेली आणि वरून ग्रोव्हर लिखित ‘रात अकेली थी’ आणि ‘नजर तेरी तुफान’ ही गाणी विशेष लक्षात राहतात. पार्श्वसंगीता मध्ये विवाल्डी या पाश्चात्य संगीतकारांच्या संगीताचा वापर दृश्यामधील उत्कंठा वाढवून घेण्यासाठी उत्तम करण्यात आलेला आहे.

चित्रपट पाहावा का? : 

चित्रपट नक्की पहावा, वर उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीचा जवळपास एक तास तरी चित्रपटाला द्यावा. मी असे म्हणत नाही की तुम्हांला पहिल्या पूर्ण एक तासात कंटाळा येईल पण श्रीराम राघवन च्या चित्रपटात अपेक्षित असणारे नाट्य, थरार तुम्हांला सुरुवातीला तरी लगेच दिसणार नाही. त्यानंतर मात्र तो तुम्हांला खिळवून ठेवेल आणि एक चांगला थरारपट पहिल्याचा आनंद निश्चितच देईन.

Leave a Comment