पोन्नियिन सेल्वन 1 | (Ponniyin Selvan Film Review in Marathi)

फिल्म :  पोन्नियिन सेल्वन
कालावधी :  २ तास ४७ मिनिटे
भाषा : तमिळ (हिंदी डबिंग)
दिग्दर्शक : मणी रत्नम 
लेखक :  कल्की कृष्णमुर्ती 
पटकथा : मणी रत्नम, जयमोहन, कुमारावेल   
संगीत  : ए. आर. रेहमान 
छायांकन : रवी वर्मन 
संकलक  : ए. श्रीकर प्रसाद 
कला दिग्दर्शक : थोट्टा तरानी 
मुख्य कलाकार : ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, जयम रवी, कार्थी, त्रिशा कृष्णन, प्रकाश राज, सोभिता धुलिपला 
कुठे पाहू शकता : सध्या थिएटर मध्ये 

‘पोन्नियिन सेल्वन’ कादंबरी | Ponniyin Selvan Novel

‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट तमिळ भाषेतील १९५५ साली प्रकाशित आणि कल्की कृष्णमुर्ती लिखित, त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ५ भागांमध्ये प्रकाशित झालेली आणि जवळपास २००० पाने असलेली हि कादंबरी तमिळ साहित्यामधली सर्वांत गौरवलेली आणि सर्वात प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. १० व्या शतकातील चोला साम्राज्यातील काही सत्य, काही काल्पनिक, अश्या कथा आणि पात्रे घेऊन सत्ता प्राप्तीसाठी चाललेला राजकीय आणि कौटंबिक संघर्ष यात मांडण्यात आलेला आहे. आज ७० वर्षांनंतरही तमिळ भाषिकांमध्ये कादंबरीवरील आणि त्यातील पात्रांवरील प्रेम आहे तसेच आहे. 

‘पोन्नियिन सेल्वन’ नाव का पडले? | Meaning of Ponniyin Selvan

कर्नाटकात उगम होऊन तामिळनाडूतून समुद्राला मिळणारी कावेरी नदीलाच ‘पोन्नी’ असं देखील म्हंटल जातं. ‘पोन्नियिन सेल्वन’ म्हणजे ‘पोन्नी’ अर्थात ‘कावेरी’ नदीचा पुत्र. चोला साम्राज्याचा राजपुत्र अरुलमोझी वर्मन (जयम रवी) लहानपणी बोटीतून जात असताना अपघाताने पोन्नी नदीत पडतो आणि एक अनोळखी स्त्री त्याला वाचवते, वाचवल्यानंतर क्षणात ती स्त्री नाहीशी झाल्यामुळे पोन्नी नदीनेच राजपुत्राला वाचवले अशी आख्यायिका पसरते. त्यामुळेच राजपुत्र अरुलमोझी वर्मन (जयम रवी) याला ‘पोन्नियिन सेल्वन’ या टोपण नावाने ओळखले जाते. 

Ponniyin Selvan Film Review
त्रिशा कृष्णन ‘पोन्नियिन सेल्वन’ मध्ये

गोष्ट काय आहे ? | Story of Ponniyin Selvan

गोष्ट सुरु होते एक हजार वर्षांपूर्वी – दहाव्या शतकात. चोलांनी पांड्याचा पराभव करून चोल साम्राज्याची स्थापना केली आहे. चोल साम्राज्याचे राजे आहेत ‘सुंदर चोल’ (प्रकाश राज) – त्यांचे दोन पुत्र आणि एक कन्या आहे. मोठा पुत्र आदित्य करिकालन (विक्रम), लहान पुत्र अरुलमोझी वर्मन (जयम रवी) आणि कन्या  कुंडवई (त्रिशा कृष्णन). दोन्ही राजपुत्र चोल साम्राज्याच्या विस्तारासाठी कांची आणि श्रीलंका येथे युद्धावर आहेत. 

ही संधी साधून तंजूर (चोला साम्राज्याची राजधानी ) येथे सुंदर चोल यांना हटवून त्यांचा चुलत भाऊ मधुरांतकन (रहमान) यांना गादीवर बसण्यासाठी, राजाचे सल्लागार पर्वतेश्वर (सरथ कुमार) आणि त्यांची पत्नी नंदीनी (ऐश्वर्या राय बच्चन) हे इतर लोकांसोबत मिळून कट करत आहेत. पराभूत झालेले पांड्या देखील चोल वंशावळ नष्ट करण्यासाठी कारस्थान रचत आहेत. बाह्य तसेच अंतर्गत कट कारस्थानांमुळे चोल साम्राज्याला धोका निर्माण झाला आहे.  

ह्या सगळ्याची कुणकुण कांची मध्ये युद्धावर असणाऱ्या मोठा पुत्राला अर्थात आदित्य करिकालन ला लागते. त्याची सत्यता तपासण्यासाठी आणि बहिणीला आणि भावाला देखील याची सूचना देण्यासाठी तो त्याचा सहकारी वल्लवरियां वन्दियदेवनला (कार्थी) तंजूर ला पाठवतो. चित्रपटाचा बराचसा भाग वल्लवरियांचा तंजूर ला जाणे, तिथल्या कटाची बातमी घेऊन प्रथम छोट्या बहिणीकडे (कुंडवई) आणि तिथून छोट्या भावाकडे ‘पोन्नियिन सेल्वन’ कडे जाणे हे दाखवतो. या प्रवासा दरम्यान अनेक घटना घडतात, पात्रे भेटतात आणि यातून चित्रपट उलघडत जातो. चित्रपटाच्या शेवटाकडे ‘‘पोन्नियिन सेल्वन’ ला वाचवणार्या स्त्री चा चेहरा दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे दुसऱ्या भागाची उत्सुकता निर्माण करण्यात चित्रपट यशस्वी होतो. .  

Karthi in Ponniyan Selvan
Karthi in Ponniyan Selvan

चित्रपट कसा आहे ? | Ponniyin Selvan Film Review

हा चित्रपटाचा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग हा पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. दोन भागात येणाऱ्या चित्रपटाची समीक्षा करणे तसे अवघड काम आहे, कारण तुम्ही पूर्ण गोष्ट पाहिलेली नसते, पहिला भाग हा मध्यांतर म्हंटला तर  चित्रपट मध्यंतरापर्यंतच पाहून तुम्हांला तुमचे मत मांडायचे आहे. असं असले तरी, पहिला भाग पाहून, एका मराठी भाषिकाला, ज्याने तमिळ कादंबरी वाचलेली नाही आणि त्यातील पात्रही तो प्रथमच ऐकत आणि पाहत आहे, काय वाटलं हे सांगायचा इथे प्रयत्न आहे.  

चित्रपटाचे दिग्दर्शक मणी रत्नम यांना तुम्ही हा चित्रपट भारतभर प्रदर्शित करता आहात आणि तुम्ही दिल से, गुरु, युवा, रावण सारखे हिंदी चित्रपट देखील बनवले आहेत, तर हा चित्रपट हिंदीत बनवावा हा विचार नाही का आला? हा प्रश्न जेव्हां विचारण्यात आला. यावर त्यांनी ठाम पणे नकार देत हि कथा तमिळ संस्कृती मध्ये इतकी  रुजलेली आहे कि ती तमिळ भाषेतच बनली पाहिजे असे सांगितले. 

चित्रपट पाहिल्यानंतर हे जास्त प्रकर्षाने जाणवले, कारण काही गोष्टी प्रेक्षकांना माहितच आहेत असं गृहीत धरले  आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा कथा काय चालली आहे, बऱ्यचशा पात्रांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे लक्षातच येत नाही. काही अंदाज लावेपर्यंत कथा पुढे सरकलेली असते. 

त्रिशा कृष्णन ‘पोन्नियिन सेल्वन’ मध्ये
त्रिशा कृष्णन ‘पोन्नियिन सेल्वन’ मध्ये

ज्यावेळेस सर्व भाषिकांसाठी फिल्म भारतभर प्रदर्शित केली जाते त्यावेळेस कथानकाला समजून घेण्याइतपत माहिती चित्रपटाच्या सुरुवातीला अथवा आवश्यक तिथे प्रभावी रित्या देणे आवश्यक असते अन्यथा काय चालले आहे हे न कळल्यामुळे रसभंग होतो. जेव्हां मराठी साम्राज्यावर (बाजीराव मस्तानी) अथवा मुघल साम्राज्यावर (जोधा अकबर) आलेले चित्रपट लोकांना समजतात आणि भारतभर चालतात, त्यावेळेस चित्रपटाच्या कथेला समजण्यासाठी आवश्यक माहिती प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीतीने पोहचलेली असते. इथे तर चित्रपटाचा पहिलाच भाग आहे आणि त्यातही बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना माहित आहे असे गृहीत धरल्यामुळे कथेची अपूर्णता अधिकच जाणवते. 

२००० पानांची कादंबरी दोन भागांमध्ये बसवण्याच्या प्रयात्नामुळे कदाचित हे असे झाले असावे. त्यामुळेच चित्रपटा ऐवजी जर ही २-३ सीजन ची वेबसिरीज झाली असती तर पात्रांना आणि कथेला योग्य न्याय देता आला असता. कदाचित मग मणी रत्नम एका मुलाखतीत म्हणाले तसे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ हे इंग्लिश ‘पोन्नियिन सेल्वन’ ठरले असते…. 

चित्रपटातील सेट, सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत त्या काळाचं वातावरण निर्मितीत यशस्वी होतात. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलेले आहे. ऐश्वर्या राय प्रथमच नकारात्मक छटा असणारी भूमिका करत आहे आणि केवळ डोळ्यांच्या माध्यमातून तिने ती प्रभावीपणे साकारली आहे. चित्रपटात येणारी गाणी मात्र अनावश्यक वाटतात आणि ए आर रहमान चं संगीत असूनही लक्षात राहत नाही. ऐतिहासिक चित्रपटामध्ये महत्वाचे असणारे युद्धाचे प्रसंग देखील प्रभावी झाले नाहीयेत.  

Aishwarya Rai in Ponniyin Selvan
ऐश्वर्या राय – ‘पोन्नियिन सेल्वन’ मधील एका प्रसंगामध्ये

‘पोन्नियिन सेल्वन’ या कादंबरीशी परिचित असणाऱ्या लोंकाना हा चित्रपट आवडत असल्याचं समाज माध्यमांवर दिसून येत आहे. परंतु इतरांना मात्र तो थोडासा निराशा करणारा अनुभव ठरतो. कदाचित दुसरा भाग पाहिल्या  नंतर हे मत बदलू शकेल, त्यासाठी मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. 

Leave a Comment