सास बहू और फ्लेमिंगो । Saas Bahu Aur Flamingo Review

कल्पना चांगली पण भट्टी नाही जमली. 

वेबसिरीज :  सास, बहू और फ्लेमिंगो 
कालावधी :  ८ एपिसोडस (अंदाजे चाळीस मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक: होमी अदजानी
कथा पटकथा आणि संवाद :  सौरव डे, नंदिनी गुप्ता, अमन मन्नण, करण व्यास
संकलक: श्रीकर प्रसाद 
पार्श्व संगीत: सचिन-जिगर
मुख्य कलाकार :  डिंपल कपाडिया, इशा तलवार, राधिका मदन, अंगीरा धार, मोनिका डोगरा, वरूण मित्रा, आशिष वर्मा, जिमीत त्रिवेदी, दीपक डोब्रियाल, विपिन शर्मा, नसरुद्दीन शहा, उदित अरोरा, प्रियाशा भारद्वज 
कुठे पाहू शकता : डिज्नी प्लस हॉटस्टार

सासु सुनांवर चालणाऱ्या मालिकांचा रतीब वर्षानुवर्षे मराठी तसेच हिंदी चॅनल्सवर प्रेक्षक पाहत आलेले आहेत. सासु सुनांमधील भांडणं, एकमेकांविरुद्धची कटकारस्थानं आणि त्यात मुलगा/नवऱ्याची होणारी अडचण किंवा एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर अशा ढोबळ कथासूत्रांभोवती या मालिका वर्षानुवर्षे चालत असत. अजूनही अशा काही मालिका टीव्हीवर चालू आहेत. 

ओटीटी आल्यापासून सासू आणि सुनांच्या या कथानकाला धक्का देणाऱ्या काही सिरीज आल्या. काहींनी ते प्रभावीरीत्या मांडलं (सास बहू और आचार pvt ltd – zee5) तर काही भरकटल्या. ‘सास बहू और फ्लेमिंगो’ हि दुसऱ्या प्रकारात मोडते. 

Saas Bahu Aur Flamingo Review, डिंपल कपाडिया,
Saas Bahu Aur Flamingo Review- डिंपल कपाडिया

गोष्ट काय आहे । What is the story of Saas, Bahu and Flamingo

‘सास, बहू और फ्लेमिंगो’  या वेबसिरीज मध्ये सासू (डिम्पल कपाडिया- राणीबा ) आणि सुना (इशा तलवार –बिजली, अंगिरा धार-काजल) एकत्र आल्या आहेत आणि ‘राणी कॉअपरेटिव्ह’  नावाच्या हस्तउद्योग आणि जडीबुटी बनवणाऱ्या कंपनीच्या बुरख्याखाली एक ड्रग कार्टेल चालवत आहेत. फ्लेमिंगो ह्या नावाचं त्यांचं सर्वांत प्रसिद्ध ड्रग आहे. हे ड्रग बनवायचं काम करत आहे, राणीबा ची मुलगी- शांता (राधिका मदन). 

हे सर्व घडतय वाळवंटी भागातील काल्पनिक अश्या ‘रणप्रदेश’ गावांत. हे गावं असलं तरी इथल्या हवेलीला सोलर पॅनेल नी वीज पुरवठा होतो आहे. २४ तास वायफाय आहे. स्मार्टवॉच, स्मार्टफोन तर आहेतच पण संपूर्ण हवेली हि स्मार्टहोम केली गेलेली आहे. 

राणीबा ची अमेरिकेत राहणारी दोन्ही मुलं हरीश (आशिष वर्मा ) आणि कपिल (वरून मित्रा ) दोघंही ह्यां सर्व उद्योगापासून अनभिज्ञ आहेत. दोघंही वर्षांतून एकदा भारतात येत असतात तसे ते ह्यावेळेस देखील आले आहेत. यथावकाश दोघांनाही या ड्रग्स कार्टल बद्दल माहिती कळते.  

Saas Bahu Aur Flamingo Review
सास बहू और फ्लेमिंगो
वरूण मित्रा, आशिष वर्मा
वरूण मित्रा आणि आशिष वर्मा

या सर्वातच राणीबाला पर्यायाने तिच्या कुटुंबाला तीन गोष्टींपासून धोका निर्माण झाला आहे. 

भेसळ युक्त ड्रग्स मुळे उपमुख्यमंत्र्याच्या मुलाचा मृत्यू होतो आणि अँटिनारकोटिक्स ड्रग्स ऑफिसर (जिमित त्रिवेदी) ड्रग्स चा शोध घेत ‘रानी कॉपरेटिव्ह’ पर्यंत पोहोचतो. 

ड्रग्स मधील तिचा पूर्वापारचा प्रतिस्पर्धी  मौंक (दीपक दोबरीयाल)आता राणीबाच्या जीवावर उठला आहे.

पूर्ववैमनस्यातून राजकीय नेता साहेबजी (नसरुद्दीन शहा) राणी बाचा काटा काढायला बघत आहे.

अशा तिन्ही आघाड्यांवर लढतानाच राणीबा घोषित करते की, जन्माष्टमी पर्यंत आपल्या 500 कोटींच्या ‘राणी कॉपरेटिव्ह’ चा वारसदार ठरवला जाईल. वारसदार होण्याच्या स्पर्धेत असतील राणीबा ची दोन्ही मुलं आणि मुलगी, दोन्ही सुना आणि एक मानलेला मुलगा धीमन (उदित अरोरा). या घोषणेनंतर वारसदाराच्या दावेदारांमध्ये संघर्ष सुरू होतो आणि अनेक गोष्टी उघडत जातात. शेवटाकडे अनेक ट्विस्ट आणत दुसऱ्या सीजनचा इशारा देत पहिला सीजन संपतो.

वेब सिरीज कशी आहे? | How is Saas, Bahu and Flamingo web series?

दिग्दर्शक होमी अदजानी याने इथे दोन गोष्टींना छेद दिला आहे. पुरुषसत्ताक समजल्या जाणाऱ्या ड्रग्स, माफिया, अंडरवर्ल्ड यासारख्या क्षेत्रात स्त्रियांना मुख्य स्थानी दाखविले आहे, जे की अपवादानेच (बँडिट क्वीन किंवा गॉडमदर सारखे अपवाद वगळता), पडद्यावर  दिसले आहे. आणि वरती म्हटल्याप्रमाणे पारंपारिक सासु-सुनेच्या प्रतिमेला छेद देत इथे त्या एकत्रितपणे ड्रग्स कार्टल चालवताना दाखविले आहे.

पण इथेच कथेचे नाविन्य संपते. कथा-पटकथा आपल्याला आपण पाहिलेल्या मिर्झापूर, सक्सेशन, गेम ऑफ थ्रोन, ब्रेकिंग बॅड यारख्य अनेक सिरीजची पदोपदी आठवण करून देते. पण हे आठवण करून देणेही वाईट नाही, जर पटकथेने आपल्याला खिळवून ठेवले असते, पण तसे होतानाही दिसत नाही. अनेक प्रसंग कंटाळवाणे  आणि अनावश्यक वाटतात. डुकराच्या शिकारीचा प्रसंग किंवा ऑफिसर टॉयलेटला गेल्यानंतर पाणी नसण्याचा प्रसंग असेच कंटाळवाणे, अनावश्यक आणि उगाच विनोद निर्मितीसाठी केल्यासारखे वाटतात.

Saas Bahu Aur Flamingo Review
सास बहू और फ्लेमिंगो
डिम्पल कपाडिया
सास बहू और फ्लेमिंगो मधील एक दृश्य

अनेक प्रसंग विस्कळीतपणे जोडल्यासारखे वाटतात. श्रीकर प्रसाद सारखा नामवंत एडिटर असूनही ही चूक का झाली असावी असा प्रश्न पडतो.

काही प्रसंगात उत्सुकता आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असून देखील ते तसे होताना दिसत नाही जसे की मुलांचा अमेरिकेहून पहिल्यांदा हवेलीत येण्याचा प्रसंग किंवा शेवटाकडे मोठा ट्विस्ट येतो तो प्रसंग. नीट मांडणी न केल्यामुळे प्रेक्षकांनाही आता पुढे काय होणार आहे याचा अंदाजा येतो आणि पुढे पाहण्याची मजा निघून जाते. राणीबाच्या दोन्ही मुलांमध्ये शेवटाकडे स्वभावात आणि वागणुकीत होणारा बदल स्वाभाविक आणि सहज वाटत नाही.

दीपक डोब्रीयाल सारखा चांगला अभिनेता ही इथे प्रभाव पाडू शकला नाही. तो जेव्हां केव्हां स्क्रीनवर येतो त्यावेळेस त्याची भीती वाटण्या ऐवजी तो दरवेळेस प्रवचन देतो आहे असे वाटते.

Saas Bahu Aur Flamingo Review
सास बहू और फ्लेमिंगो
दीपक डोब्रियाल
सास बहू और फ्लेमिंगो -दीपक डोब्रियाल

डिंपल कपाडिया यांनी राणी बा उर्फ सावित्री प्रभावीपणे साकारली आहे त्यांचा अभिनय आणि वेशभूषा पाहताना ‘रुदाली’ चित्रपटाची आठवण येते.

विशेष उल्लेख करावासा वाटतो प्रियाशा भारद्वज हीचा, जिने राणीबा च्या तरुणपणाची भूमिका साकारली आहे. पूर्ण वेब सिरीज मधील हा भाग अतिशय प्रभावी आणि धक्कादायक झाला आहे. 

कुणाला जर अगदीच पहायची असेल आणि मोकळे सात तास असतील तर डिज्नी प्लस हॉटस्टार वर ही सिरीज तुम्ही पाहू शकता. बाकी इतरही चांगल्या वेबसिरीज आहेतच की. 

Leave a Comment