स्कूल ऑफ लाईज । School of Lies Hotstar Review

संवेदनशील विषयाचं बांधीव आणि संयत सादरीकरण

वेबसिरीज : स्कूल ऑफ लाईज 
कालावधी : ८ एपिसोडस (अंदाजे तीस मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक: अविनाश अरुण
कथा पटकथा आणि संवाद :  निशांत अग्रवाल, शोएब नझीर, ईशानी बॅनर्जी 
छायाचित्रण:अविनाश अरुण 
संकलक: मोनिषा आर बलदवा
पार्श्व संगीत:गौरव चॅटर्जी, आशिष जकारिया 
मुख्य कलाकार :वरीण रूपानी,वीर पचिसिया,आर्यन सिंग अहलावत, अमीर बशीर, गितीका ओह्ल्यान, नितीन गोयल, पार्थिव शेट्टी, दिव्यांश द्विवेदी, निम्रत कौर, सोनाली कुलकर्णी,जितेंद्र जोशी, मिहीर गोडबोले. 
कुठे पाहू शकता : डिज्नी प्लस हॉटस्टार

School of Lies Hotstar Review ‘स्कूल ऑफ लाइज’ च्या सर्व भागांचे दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी अविनाश अरुण ने केली आहे.अमेझॉन प्राईम व्हिडिओ वरची ‘पाताल लोक‘ आणि मराठी चित्रपट किल्ला, ज्यांनी पाहिला असेल त्यांना स्कूल ऑफ लाईजमध्ये आपल्याला काय पहायला मिळेल याची थोडीफार कल्पना येईल. ‘किल्ला’ चित्रपट आणि ‘पाताल लोक’ यांची सिनेमेटोग्राफी आणि दिग्दर्शन (‘पाताल लोक‘ सहदिग्दर्शन ) दोन्हीही अविनाश अरुण ने केले आहे. अविनाश ज्या तरलतेने ‘किल्ला’ चित्रपटातील लहान मुलाचे भाव विश्व दाखवितो, तितक्याच क्रूरपणे ‘पाताल लोक’ मधील हिंसा देखील अंगावर येते. ‘पाताल लोक‘ आणि ‘किल्ला’ दोन्हीही उत्कृष्ट अश्याच कलाकृतीं आहेत, स्कूल ऑफ लाईज बद्दलही तेच म्हणता येईल.

School of Lies Hotstar Review वरीण रूपानी, आर्यन सिंग अहलावत
वरीण रूपानी आणि आर्यन सिंग अहलावत – अनुक्रमे विक्रम सिंग आणि TK च्या भूमिकेत

गोष्ट काय आहे । What is the story of School Of Lies

सातवीत शिकणारा १२ वर्षीय शक्ती साळगावकर (वीर पचिसीया) हा ‘राईज’ नामक एका बोर्डिंग स्कूल मधून बेपत्ता होतो. सुरुवातीला शक्तीचा खोडसाळपणा असेल असे वाटते, पण बरेच तास उलटल्यानंतरही तो जेव्हा सापडत नाही, त्यावेळेस त्याच्या पालकांना आणि पोलिसांना बोलविण्यात येते. हे सर्व होत असताना बोर्डिंग मधील अनेक रहस्य उलगडतात. मॅथ टीचर चे तरुण मुलांसोबत असणारे अनैतिक समलैंगिक संबंध, शाळकरी मुलांचे गांजा ओढणे, बोर्डिंग मधील चोरी, लहान मुलांची तस्करी- त्यांचे शोषण अशा अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येऊ लागतात.

प्रत्येक पात्र काहीतरी लपवत आहे, एक तर ते सत्य सांगत नाहीए किंवा खोटे बोलते आहे. या सर्वांमध्ये जो बेपत्ता आहे तो शक्ती खरंच पळून गेला आहे का? त्याला कोणी पळवून नेले आहे का? तो सापडतो का? या सर्वांच्या मागे कोण आहे? हे तुम्हाला सिरीज पाहूनच कळेल.

School of Lies Hotstar Review अमीर बशीर,निम्रत कौर आणि वरीण रूपानी
अमीर बशीर,निम्रत कौर आणि वरीण रूपानी – अनुक्रमे सॅम्युअल, नंदिनी आणि विक्रम च्या भूमिकेत

वेब सिरीज कशी आहे? | How is the School of Lies web series?

सिरीज एकरेषीय कथेची मांडणी करत नाही. कधी ती चालू वर्तमान काळ दाखविते, तर कधी फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाते. पण कथेची केलेली अशी मांडणी प्रेक्षकांना चकवते, जे की कथेमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे असे वाटते. सिरीजच्या शेवटाकडे प्रेक्षकांना नक्की काय घडलं आहे? आपण गृहीत धरून ठेवलेल्या गोष्टी कशा चुकीच्या होत्या, हे हळूहळू उलघडत जाते. 

यात दाखविली गेलेली हिंसा अंगावर येते. अंगठ्याला लागल्यापासून ते डोकं फुटण्यापर्यंतचे प्रसंग अतिशय खरे खुरे वाटतात आणि त्यामुळेच अस्वस्थ करतात. ‘किल्ला’ चित्रपटातील चिन्मय सारखीच वेगळ्या शाळेत, घरापासून लांब आल्यामुळे एकाकी आणि अस्वस्थ झालेली, अनेक मुले इथे पाहायला मिळतात. 

नवरा बायकोच्या नात्यातील तणाव- दुरावा, त्याचा त्यांच्या मुलांवर होणारा परिणाम, आपल्याला अनेक दृश्यातून आणि संवादातून इथे पाहायला मिळतो. पण सिरीज मधील एक साधे घटनादृश्य यातील भेदकता अधिक तीव्रतेने आपल्यासमोर आणते. सिरीज मध्ये एक दृश्य येते, ज्यामध्ये गावाकडील घरात जमिनीवर पडलेले ऑम्लेट एक कोंबडी खाताना दाखविली आहे. त्यावेळेस एक पात्र बोलते, “तुझे लगता है उसको पता है, वो अपने ही बच्चे को खा रही है.”. पालकांची आपापसातील आणि मुलांप्रती वागणूक कळत नकळतपणे आपल्याच मुलांवर काय परिणाम करते हे सूचित करणारं हे दृश्य.

तांत्रिक बाजू (Technical Aspects) :

अविनाश अरुण स्वतः सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे अनेक चित्र चौकटी कमालीच्या सुंदर झाल्या आहेत. चित्र चौकटीची सौंदर्यदृष्टी जपताना ती कुठेही कथेला मारक न ठरता पूरक होईल याचे भान त्याने ठेवलं आहे. 

School of Lies Hotstar Review अमीर बशीर, वरीण रूपानी,वीर पचिसिया,आर्यन सिंग अहलावत, निम्रत कौर
अमीर बशीर, वरीण रूपानी,वीर पचिसिया,आर्यन सिंग अहलावत, निम्रत कौर, अनुक्रमे सॅम्युअल, विक्रम, शक्ती, TK आणि नंदिनीच्या भूमिकेमध्ये

अभिनय (Acting ): 

लहान मुलांकडून अभिनय काढून घेण्याचं कसब अविनाश कडे आहे. ‘स्कूल ऑफ लाईज’ मधील पौगंडावस्थेतील मुलांकडून नैसर्गिक अभिनय त्याने काढून घेतला आहे. सीनियर्स मुले – विक्रम सिंग (वरीन रूपानी) ,TK (आर्यन सिंग अहलावत) आणि मुलांमध्ये एकमेव शिकणारी मुलगी प्रितिका रॉय (अद्रिजा सिन्हा) यांच्यासोबतच त्यांना जूनियर्स असणारे – शक्तीचा बंक मेट मुरली श्रीधर (पार्थिव शेट्टी), माळ्याच्या मुलाचं काम करणारा चंचल (दिव्यांश द्विवेदी), आणि ज्याच्या संवाद बोलण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला नक्कीच चेहऱ्यावर हसू येईल असा साहिल दिवेदी (मिहीर गोडबोले), या सर्वांनीच नैसर्गिक आणि सहज अभिनय केला आहे.

या छोट्या कलाकारांसोबतच जुन्या जाणत्या कलाकारांनीही त्याच तोडीची कामं केली आहेत. करियर कौन्सिलर असणाऱ्या नंदिताची, वडिलांच्या आजारपणामुळे आपण कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही यामुळे येणारी हताशा, सिरीज च्या शेवटाकडे अनेक धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर होणारी घालमेल, निम्रत कौरने प्रभावीपणे दाखविली आहे. 

आपल्या मुलाला आपण समजून घ्यायला कमी पडतो आहे, आपल्यापेक्षा एक करिअर कौन्सिलर त्याला जास्त जवळची वाटते आहे, यामुळे येणारी अगतिकता,दुःख सोनाली कुलकर्णीने कमालीच्या संयतपणे दाखवलं आहे.

या सर्वांबरोबरच अमीर बशीर, गितिका ओह्ल्यान, जितेंद्र जोशी यांनी आपापली कामे चोख केली आहेत.

Verdict (कौल ) : 

या वर्षी अनेक उत्तोमोत्तम वेबसिरीज आल्या आहेत. नुकत्याच आलेल्या ‘दहाड‘ आणि ‘स्कूप’ नंतर ही तिसरी उत्कृष्ट अशी वेबसिरीज. अतिशय संवेदनशील आणि स्फोटक असा विषय संयतपणे मांडण्यात वेब सिरीज यशस्वी झाली आहे असे वाटते. तुमच्या कडे चार तास असतील तर एका वीकएंड मध्ये ही ८ भागाची सिरीज तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार नक्की पाहू शकता. 

Leave a Comment