स्कूप रिव्ह्यू | Scoop Netflix Web Series Review

वेबसिरीज : स्कूप  
कालावधी : 6 एपिसोडस (अंदाजे ५५ मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक:  हंसल मेहता 
लेखन  :  मृण्मयी लागू, मीरत त्रिवेदी 
पार्श्व संगीत: अचिंत ठक्कर
मुख्य कलाकार :  करिश्मा तन्ना, हरमन बवेजा, प्रसोनजित चॅटर्जी, मोहम्मद झीशान अय्युब, देव भोजनी, इनायत सूद, रसिका आगाशे, रवी महाशब्दे, तन्मय धनिया
कुठे पाहू शकता : नेटफ्लिक्स 

Scoop Netflix Web Series Review जिग्ना व्होरा यांच्या ‘बिहाइंड बार्स इन भायखळा- माय डेज इन प्रिजन’ (भायखळ्याच्या तुरुंगातील सळ्यांच्या पलीकडील माझे दिवस) या आत्मकथनात्मक पुस्तकावर ‘स्कूप’ वेबसिरीज बेतलेली आहे. असे असले तरी प्रत्येक एपिसोड्स च्या सुरुवातीला सांगितलं जातं कि, हे पुस्तकावर आधारित असले, तरीही यातील घटना, कथा काल्पनिक आहेत, आणि नाट्यमयतेसाठी यात काही बदल करण्यात आले आहे. 

हंसल मेहता यांची लॉक डाऊन काळात आलेली ‘स्कॅम -1992‘ ही हर्षद मेहताच्या जीवनावर असलेली वेब सिरीज लोकांमध्ये आणि समीक्षकांमध्येही खूपच नावाजली गेली. ह्या दोन सिरीज मधील सामान दुवा म्हणजे, त्यामध्ये देखील मुंबईत राहणारा गुज्जू हर्षद मेहता होता तर येथे मुंबईत राहणारी गुज्जू जागृती पाठक आहे, दोन्हीही वेब सिरीज सत्य घटनांवर आधारित आहेत. 

रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू हिने मिरत त्रिवेदी सोबत ‘स्कूप’ चे लेखन केले आहे, तसेच हंसल मेहता यांच्या सोबत ती याची निर्माणकर्ती सुद्धा आहे.

'स्कूप'  चा पत्रकारीय संदर्भात अर्थ आहे - इतर वृत्तपत्रांना मिळण्यापूर्वी एखाद्या वृत्तपत्राला मिळालेली व त्याने प्रसिद्ध केलेली बातमी. 

हा ‘स्कूप’  मिळविण्यासाठी पत्रकारांमध्ये लागलेली चढाओढ, त्यांचे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि अंडरवर्ल्ड मधील लोक यांच्यातील संबंध व त्याचा ‘स्कूप’  मिळविण्यासाठी केलेला वापर, अशा अनेक गुन्हेगारी पत्रकारितेशी निगडित असणाऱ्या गोष्टी आपणास इथे प्रभावीरीत्या पाहण्यास मिळतात. 

Scoop Netflix Web Series Review
करिष्मा तन्ना – स्कूप मधील एका दृश्यात

गोष्ट काय आहे । What is the story of Scoop

२०११ सालात घडणारी ही गोष्ट आहे जागृती पाठक हिची (करिष्मा तन्ना) . जी गुन्हेगारी पत्रकारितेला वाहिलेल्या ‘ईस्टर्न एज’ नामक पेपर मध्ये ‘डेप्युटी ब्युरो चीफ’ म्हणून काम करते आहे. सातत्याने पहिल्या पानावरची एक्सक्लुझिव्ह न्यूज किंवा ‘स्कूप’  मिळवून ती आज या पदाला पोचली आहे. त्यामुळे सतत ती नविन बातमीच्या च्या शोधात असते. सात वर्ष गुन्हेगारी पत्रकारितेमध्ये काढल्यामुळे अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि अंडरवर्ल्ड मधील काही लोक हे तिच्या ओळखीचे झाले आहेत. 

‘स्कूप’  मिळण्यासाठी ती वेळे प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेले गिफ्ट स्वीकारते, कुख्यात गुन्हेगाराकडून राखी बांधून घेते, बातमीची पूर्ण खात्री पटली नसतानाही पहिल्या पानावर छापायला ती उतावळी असते. नैतिकतेचा असे पेच निर्माण करणाऱ्या प्रसंगात ती ‘स्कूप’  मिळवण्यासाठी आवश्यक असणारी बाजू, मर्यादा राखून घेते. अश्यावेळेस तिचा बॉस असणारा एडिटर इन चीफ इम्रान सिद्दिकी (मोहम्मद झीशान अय्युब) तिला प्रोत्साहन देतो, पण त्याच वेळेस योग्य आणि नैतिक बातमीच छापली पाहिजे हे तिला समजावून सांगतो. पत्रकारितेमध्ये होत चाललेल्या बदलावर तो अचूक भाष्य करतो.

‘पूर्वीच्या काळी जर पत्रकारिता ही चांगली आहे असं म्हंटलं, तर ती विवादास्पद होणार असं म्हंटलं जायचं, आता याच्या उलट आहे जर पत्रकारिता विवादास्पद आहे तरच ती चांगली पत्रकारिता आहे असे म्हटले जाते.’

इम्रान सिद्दिकी (स्कूप)

आता कथेची पार्शवभूमी: आधी एकत्र असणारे छोटा राजन आणि दाऊद यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आणि मुंबईमध्ये गॅंगवॉर सुरू झालं. दोघेही परदेशात पळून गेले खरे, पण मुंबईवर अजूनही आपलीच सत्ता आहे, हे दाखविण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ सुरू झाली आणि परदेशातून ते मुंबईतील आपली सूत्रं हलवू लागले. यामध्ये काही मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना देखील त्यांनी हाताशी धरले. मुंबई पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील असणारे परस्पर संबन्ध, या सगळ्याचा भांडाफोड करण्याच्या मार्गावर असणाऱ्या ज्येष्ठ गुन्हेगारी पत्रकार जयदीप सेन (प्रसोनजित चॅटर्जी) यांची हत्या करण्यात आली आणि हत्तेची जबाबदारी छोटा राजन ने स्विकारली. परंतु मला ही हत्या करण्यासाठी जागृती पाठक ने उचकावले असे त्याने सांगितले.

केवळ त्या फोनच्या आधारे, पोलीस जागृतीला तिचा काही दोष नसताना जेलमध्ये टाकतात. ज्या गुन्हेगारांच्या बातम्या तिने केल्या, त्याच गुन्हेगारांसोबत, आता तिला राहावे लागते. जगण्यासाठीचा आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठीचा तिचा संघर्ष सुरू होतो.आयुष्यभर निर्माण केलेली प्रतिमा, करिअर एका दिवसात नष्ट होते आणि आयुष्याचे अस्तित्व सरकारी तुरुंगाने दिलेल्या चार आकडी नंबरा पुरते उरते. सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती सोबत जे घडलं त्याचीच काहीशी झलक ‘स्कूप’  मध्ये पाहायला मिळते.यातून जागृती कशी बाहेर येते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेब सिरीज पहावी लागेल.

जेव्हा जयदीप सिंगचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो त्यावेळेस काही चैनल वाले ते शूट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेस इम्रान त्यांना शूट करण्यापासून थांबवितो. त्यावेळेस त्यातील एक पत्रकार म्हणतो. 

'लिहाज करते रहेंगे ना सर, तो लोग चैनल चेंज कर देंगे, हमे भी अफसोस है लेकिन हम अपना काम ही कर रहे है।
scoop-netflix-web-series-review
इनायत सूद आणि मोहम्मद झीशान अय्युब – स्कूप मधील एका दृश्यात

वेब सिरीज कशी आहे? | How is Scoop web series?

पुरुषसत्ताक समजल्या जाणाऱ्या व्यवसायामध्ये कणखर आणि महत्त्वाकांक्षी स्त्रिया प्रमुख भूमिकेत आपण नुकताच रिलीज झालेल्या – दहाड (पोलिस), कटहल (पोलीस) आणि सास बहू और फ्लेमिं (ड्रग माफिया) यामध्ये पाहिल्या. इथे देखील घटस्फोटीत, एकट्या मुलाला वाढविणारी, महत्त्वाकांक्षी आणि कणखर महिला क्राईम रिपोर्टर जागृती पाठक दिसते. एका महत्त्वाकांशी स्त्रीला सामोऱ्या जावं लागणाऱ्या इर्शेला, पाठीमागे होणाऱ्या गॉसिप ला तिला देखील सामोरे जावे तर लागतेच, पण खोट्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये देखील जावे लागते. या सगळ्याला ती खंबीरपणे सामोरी जाते आणि तिचे कुटुंबही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहते.

दिग्दर्शक हंसल मेहता त्याच्या चित्रपटातील विश्व अतिशय प्रभावीपणे उभं करतो. येथे येणारं पत्रकारी, गुन्हेगारी, पोलिसी आणि जेलमधील सगळेच विश्व विश्वसनीय वाटतं. त्यामुळेच आपणही कथेत गुंतून राहतो. इथे तो तुम्हाला स्पून फीडिंग करत नाही अर्थात गोष्ट सोपी करून सांगत नाही. कथेच्या ओघात एकेक गोष्ट तुम्हाला उलघडत जाते. जसे की जागृती पाठकच लग्न कोणाशी झालं आहे? तिचा नवरा कुठे आहे? घरातील व्यक्ती कोण आहेत? या गोष्टी सर्वप्रथम स्पष्ट होत नाहीत, हळूहळू आपल्याला त्या उलघडत जातात. बऱ्याच वेळा ते योग्य वाटतं, परंतु काही वेळेस कथानकातील बारकावे न समजल्यामुळे प्रेक्षक म्हणून पाहताना गोंधळ उडतो. विशेषतः दाऊद आणि छोटा राजन यांच्याशी संबंधित अनेक नावे घेतली जातात, पण त्यांचा परस्पर संबंध लगेच न कळल्यामुळे बऱ्याच गोष्टी लवकर समजून येत नाही. 

अभिनय (Acting ): 

करिष्मा तन्ना ने प्रामाणिक आणि चांगले काम केलेले आहे, तरी तिचा अभिनय उठून येत नाही. याउलट छोट्या छोट्या भूमिकांमध्ये काम करणाऱ्या अनेकांचा अभिनय उठून येतो आणि लक्षात राहतो. राणे मॅडमचं काम करणारी जेलमधील पोलीस कॉन्स्टेबल रसिका आगाशे, जागृतीची उलट तपासणी करणारा पोलीस अधिकारी जगताप (रवी महाशब्दे), सुरुवातीला जागृती सोबत असणारी पत्रकार दीपा (इनायत सूद), जागृतीची कोर्ट मध्ये बाजू मांडणारा प्रसिद्ध वकील (जैमिनी पाठक) हे लोक छोट्या भूमिकेत देखील प्रभाव पाडून जातात.

या सर्वांमध्ये आश्चर्यचकित करतो, तो म्हणजे जेसीपी हर्षवर्धन श्रॉफ च्या भूमिकेतला हरमन बवेजा. ‘व्हाट्स युवर राशी’ किंवा ‘लव्ह स्टोरी 2050‘ यामधील अभिनयासाठी त्याला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं. पण ‘स्कूप’ मध्ये त्याचा पूर्ण कायापालट पाहायला मिळतो. अभिनय सोडून निर्मितीकडे वळलेल्या हरमनला अपघातानेच ही संधी मिळाली आणि त्याचं त्यांने सोनं केलेलं आहे.

Harman-Baweja-Scoop-and-Whats-your-Rashee
स्कूप आणि ‘व्हाट्स युअर राशी’ मध्ये हरमन बवेजा

Verdict (कौल ) : 

गुन्हेगारी पत्रकारितेचा विश्व कसं काम करत, एक महिला गुन्हेगारी पत्रकाराला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही ही सिरीज नेटफ्लिक्स वर नक्की पाहू शकता. या वर्षातील उत्तम वेब सिरीज पैकी ही एक आहे. 

Leave a Comment