शांतीत क्रांती | Shantit Kranti Marathi Web Series Season One Review

वेबसीरीज  : शांतीत क्रांती
कालावधी :  ६ एपिसोडस (अंदाजे ३५ मिनिटे प्रत्येकी )
दिग्दर्शक:   सारंग साठे आणि पॉला मक्गलीन
कथा पटकथा आणि संवाद : अभय महाजन, अनुषा नंदकुमार, चेतन डांगे, सारंग साठे
छायाचित्रण: निखिल आरोलकर
संकलक:  अपूर्वा मोतीवाले सहाय्,आशिष म्हात्रे 
पार्श्व संगीत: सौरभ भालेराव
मुख्य कलाकार :  अभय महाजन, अलोक राजवाडे, ललित प्रभाकर,सखी गोखले, मृण्मयी गोडबोले 
कुठे पाहू शकता : सोनी लिव

Shantit Kranti Marathi Web Series Season One Review : २००१ साल. आम्ही तिघे मित्र. सकाळी सातचा क्लास करून; पुण्यातल्या अरुंद गल्ल्या मधून वाट काढत आमच्या नेहेमीच्या जागी आपापल्या सायकलींना बूडं टेकवून गप्पा मारायला थांबलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मित्राने विषय काढला पिक्चर पाहायला जायचं का? मस्त पिक्चर आहे, पिक्चर ची स्टोरी हि आपलीच स्टोरी आहे. 

या पिक्चरने तो पर्यंत बरीच हवा केली होती. दोन-तीन महिने उलटूनही थिएटर मध्ये तो चालला होता. गाणी सर्वत्र गाजत होती. ‘हम हैं नए अंदाज क्यों हो पुराना..’ असे म्हणत अनेक तरुणांच्या वरच्या ओठा ऐवजी खालच्या ओठाखाली मिशी दिसू लागली होती, गोव्याचं पर्यटन वाढलं होतं, सिद्धार्थ नावाची मुलं स्वतःला सिद संबोधू लागली होती आणि ‘दिल चाहता है‘ एक कल्ट मुव्ही बनला होता. 

राहुल टॉकीज ला आम्ही पोहचलो खरं, पण तिकीटा अभावी आणि माझ्या सल्ल्यानुसार आम्हांला नवीन आलेला शाहरुख चा ‘असोका’ चित्रपट पाहावा लागला, ज्यामुळे येताना मित्रांच्या ज्या शिव्या खाव्या लागल्या तो भाग वेगळा. ‘दिल चाहता है‘ काही आम्ही त्यावेळेस एकत्र पाहू शकलो नाही आणि इतक्या वर्षांनी आम्ही तिघे मित्रही आता एकमेकांच्या इतके संपर्कात नाही, कदाचित आमची दोस्ती सिद,आकाश आणि समीर इतकी गेहरी नसावी. 

आमच्या सारखे अनेक मित्र त्याकाळात होते ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने ‘दिल चाहता है’ चा प्रभाव पडला होता. अश्याच ‘दिल चाहता है‘ चित्रपटाने भारावलेल्या प्रसन्न, दिनार आणि श्रेयस ची गोष्ट म्हणजे शांतीत क्रांती ही मराठी वेब सीरीज आहे. भाडीप या युट्युब चॅनेल चे सर्वेसर्वा सारंग साठे आणि पॉला मक्गलीन यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. 

दिल चाहता है पोस्टर
दिल चाहता है – आकाश (आमिर खान ), समीर (सैफ अली खान ) आणि सिद अर्थात सिद्धार्त (अक्षय खन्ना)

गोष्ट काय आहे । What is the story of Shantit Kranti?

ही गोष्ट आहे प्रसन्न (ललित प्रभाकर) दिनार (अलोक राजवाडे) आणि श्रेयस (अभय महाजन) या तिघा मित्रांची. लहानपणी तिघांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पाहिला आणि तेव्हापासून ते आज तिशीत येई पर्यंत ते त्याने भारावलेले आहेत. गोव्याच्या अनेक ट्रिपा त्यांनी केल्यात. आपापसात सिद,आकाश आणि समीर कोण? यावरून त्यांचे सतत वाद चालू असतात. सीरीज मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘दिल चाहता है’ चे अनेक संदर्भ येतात. गोवा ट्रिप आखणे, ट्रेन सोबत कार ने रेस लावणे, त्यांच्या बालपणी त्यांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पहायला जाणे असे अनेक. 

सीरीज सुरु होते त्यावेळेस तिघंही जण त्यांच्या त्यांच्या आयुष्यातील एका महत्वाच्या वळणापाशी येऊन ठेपले आहेत. प्रसन्न ला कळले आहे कि त्याची गर्लफ्रेंड निशी (मृण्मयी गोडबोले) प्रेग्नंट आहे, श्रेयस च्या गर्लफ्रेंड रुपालीने (सखी गोखले ) त्यांची एंगेजमेंट मोडून त्याच्या सोबत ब्रेकअप केला आहे तर घरची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे दिनार ला घर विकावे लागत आहे. 

Shantit Kranti Season One Marathi Web Series Review
ललित प्रभाकर,अभय महाजन, अलोक राजवाडे- शांतीत क्रांती सीरीज मध्ये

अश्या वेळेस तिघंही गोव्याला जायचं ठरवतात; परंतु गोव्याला जायच्या ऐवजी तिघंही शांतीवन नामक ध्यान-धारणा केंद्रात येऊन पोहचतात. एकमेकांशी भांडत, एकमेकांना दूषणं देत स्वतःच्याच आतील आणि बाहेरील समस्यांचा स्विकार करण्याचा तिघांचा प्रवास म्हणजे या पुढची गोष्ट आहे. त्यांचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी तुम्हांला सीरीज पहावी लागेल. 

वेब सीरीज  कशी आहे? | How is web series Shantit Kranti season one?

पहिले २ एपिसोड्स धमाल विनोदी झाले आहेत, तिघा मित्रांमधील केमिस्ट्री देखील कमाल आहे. काही प्रसंग आणि विनोद तुम्हांला हसवतात तर काही अंतर्मुख करतात. तिसऱ्या भागापासून जिथं तिघांचाही शांतीवन मधील प्रवास सुरु होतो तिथून मात्र सीरीज ओढून – ताणून केली आहे असे वाटायला लागते. दिनार चं रात्री दारु पिऊन स्वामी होणं आणि लोकांनी त्याचे अनुयायी होणं हे अगदीच न पटणारं. सीरीज मधील शिंदे (सागर यादव) आणि छोटू (निनाद गोरे) ही पात्रं अतिशयोक्ती कडे झुकणारी वाटतात. शांतीवनामधील इतर सहभागी पात्रं पुरेशी पार्श्वभूमी स्पष्ट न केल्यामुळे कमकुवत वाटतात. 

तिघांचा अभिनय आणि काही विनोदी प्रसंग यामुळे सीरीज आपण शेवट पर्यंत पाहतो. त्यातही अलोक राजवाडे ने साकारलेला दिनार विशेष लक्षात राहतो. भाडीप च्या स्किट मध्ये तो साकारत असलेल्या भूमिकेचाच टोन तुम्हांला इथंही पहायला मिळतो, जो कि खटकत नाही उलट अनेक प्रसंगात तो हसवतो. 

टीव्हीफ च्या पिचर पासून महाराष्ट्राबाहेर देखील अनेकांना माहिती झालेला अभय महाजन किती चांगला अभिनेता आहे हे आपण पिचर सोबतच अक्षय इंडीकरच्या त्रिज्या चित्रपटात देखील पाहिलं असेल. इथंही त्याने गर्लफ्रेंड कडून दुखावलेला, गोंधळलेला आणि तरीही यातून मार्ग काढण्यासाठी धडपडणारा श्रेयस उत्तम साकारला आहे. 

मराठी मधील हिरो पर्सनॅलिटी असणारा ललित प्रभाकर इथे शांत, समजुतदार अश्या प्रसन्न च्या भूमिकेत येतो. तिघाही मित्रांपैकी प्रसन्न चा द्विधा मनस्थितीपासून ते स्वतःला स्वीकारण्याचा प्रवास अधिक ठळकपणे समोर येतो. 

अभय महाजन, अलोक राजवाडे, ललित प्रभाकर शांतीत क्रांती सीरीज मध्ये-  Shantit Kranti Marathi Web Series Season One Review
अलोक राजवाडे, ललित प्रभाकर,अभय महाजन- शांतीत क्रांती सीरीज मध्ये

आपण सिरीजच्या पुर्ण शीर्षकाकडे येऊयात ‘शांतीत क्रांती.. श्वास आत घ्या, बाहेर सोडा’. तिघाही पात्रांच्या आयुष्यात अनेक समस्या, प्रश्न आणि ताण निर्माण झालेले आहेत, अशा वेळेस तिघेही जेव्हा शांत बसून ध्यान करायला लागतात त्यावेळेस त्यांच्या खऱ्या समस्या त्यांना जाणवतात आणि त्या स्वीकारण्याची ताकद आणि बुद्धी त्यांना मिळू लागते. हि ध्यानाने झालेली शांतीत क्रांती हि प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवायचा विषय आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब यांच्या अखंडित चालणाऱ्या स्क्रोलिंग च्या या दुनियेत थोडा वेळ काढून, शांत बसून दीर्घ श्वास आत घेऊन बाहेर सोडण्याच्या प्रक्रिया करण्यास या सीरीज ने प्रेरणा दिली तर आपल्या आयुष्यात क्रांती नसेल कदाचित; पण छोटा का होईना सकारात्मक बदल घडवण्यासाठी तरी हि सीरीज कारणीभूत ठरावी हि आशा.  

सीरीज पहावी का?

नेहेमी पेक्षा वेगळा विषय, तिघांचा उत्तम अभिनय आणि उच्य निर्मितीमूल्य यामुळे सीरीज निश्चितच पाहण्यासारखी झाली आहे. तुम्ही ‘दिल चाहता है’ चे चाहते असाल तर तुम्ही ही सीरीज चुकवता कामा नये. काही भाग तुम्हांला कंटाळवाणे अथवा अनाठायी वाटू शकतात पण त्याकडे दुर्लक्ष्य करण्या इतपत निश्चितच सीरीज चांगली झाली आहे.  

Leave a Comment