स्टेशन एजंट- एक शहाणे दुःख | Station-agent-film-review-marathi

‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या कितीतरी आधीची पिटर डिंकलेजची एक अभिजात भूमिका

फिल्म :  स्टेशन एजंट
कालावधी :  १ तास ३० मिनिटे
दिग्दर्शक : टॉम मॅकार्थी
मुख्य कलाकार : पिटर डिंकलेज, पॅट्रिशिया क्लार्कसन, बॉबी कॅनवल, मिशेल विल्यम्स  

बुटक्या किंवा खुज्या व्यक्ती वरील चित्रपट म्हणजे आपल्याला आठवतो अप्पू राजा.चार फुट झालेल्या कमल हसनचा हृदय हेलावणारा अभिनय आणि त्याने घेतलेले कष्ट आपल्याला चित्रपटाच्या इतर त्रुटी बाजूला सारायला भाग पाडतात. खऱ्या जीवनातली खुज्या व्यक्तींना बऱ्याचदा हिंदी तसेच अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिकेत एकतर सस्त्या विनोद निर्मितीसाठी, सर्कशीमध्ये, किंवा अदभूत परिकथेतला एक भाग म्हणून तरी दाखवले जाते. म्हणूनच कोणी दिग्दर्शक अशाच एका खुज्या व्यक्तीला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन तुमच्या आमच्या मधीलच एक म्हणून दाखवतो त्यावेळेस उत्सुकता निर्माण होते. हा चित्रपट आहे ‘स्टेशन एजंट’. उत्सुकता म्हणून पाहायला सुरुवात केलेला हा चित्रपट कधी हसवत, कधी भावनिक करत तर कधी निशब्द शांततेतली मजा दाखवत निखळ आनंद देऊन जातो.

शाररिक उंची न वाढल्यामुळे खुजेपण आलेल्या एका मध्यमवयीन, अबोल, एकाकी ‘फिन’ ची हि कथा आहे. काऊंटर समोर कोणी उभा आहे हे न समजल्यामुळे दुर्लक्षित झालेला, सार्वजनिक ठिकाणी अचानक काहीतरी खालून चालत आले आहे असे वाटून लोकांच्या दचकण्याला, लोकांच्या विचित्र नजरांना आणि फिदीफिदी हसण्याला सामोरे जावे लागणाऱ्या फिनला हे नाईलाजाने सवयीच करून घ्यावं लागल आहे.

तुमच्या आमच्या सारखाच असणारा फिन केवळ उंची मुळे लोकांच्या आकर्षणाचा आणि चेष्टेचा विषय होतो. फिनच्याच शब्दात सांगायचं तर

कधी कधी मला गंमत वाटते कि मला लोक कसं पाहतात, कसं वागवतात – खर तर मी एक अगदी साधी आणि कंटाळवाणी व्यक्ती आहे

– फिन (स्टेशन एजंट )

त्यामुळेच वर्दळीपासून दूर काहीस एकाकी जागी जाण्याची संधी त्याला जेव्हां मिळते तेव्हा तो ती लगेच घेतो. अचानक झालेल्या मित्राच्या (बिझिनेस पार्टनरच्या) मृत्यूमुळे जास्त वर्दळ नसलेल्या न्यू जर्सी मधील स्टेशन डेपो त्याला वारसा हक्काने मिळतो  व तिथेच तो आपले बस्तान हलवतो.

पिटर डिंकलेज फिन च्या भूमिकेत

फिनने आपलं शाररीक खुजेपण स्वीकारलं असल तरी आपल्या लक्षात येतं की यामुळे त्याला अनेक अप्रिय गोष्टीना सामोरे जावं लागल आहे. त्यामुळेच ह्यापुढे लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्याकडून दुखावले जाण्याऐवजी त्यांच्यापासून शक्यतो लांब राहणच तो पसंद करतो. ही स्वीकारले जाण्याची आणि नंतर दुखावले जाण्याची भीती त्याला नको आहे. असे असतानाही ‘जो’ आणि ‘ओलिव्हिया’ ह्या पूर्णतः भिन्न व्यक्ती त्याच्या आयुष्यात प्रवेश करतात.

आपला एकुलता एक लहान मुलगा गमावल्यामुळे एकाकी झालेली व घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असणारी ‘ओलिव्हिया’ चित्रं काढून हे सर्व विसरण्याच्या प्रयत्नात आहे. तर बोलघेवडा ‘जो’ आपल्या वडिलांच्या आजारपणाशी झगडत फिनच्या ‘स्टेशन डेपो’ समोरच स्नॅक सेंटर चालवत असतो. सुरुवातीला त्यांना टाळणारा फिन त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या सोबत जाऊ लागतो व कालांतराने त्यांच्यात रमूही लागतो. तीन वेगवेगळया पार्श्वभूमी असणारे हे लोक एकमेकांचे मित्र बनतात. काहीश्या एकाकी झालेल्या या तिघांनाही एकमेकांचा आधार मिळतो.ह्यांच्या सोबतच जवळच्याच लायब्ररीतील एक लायब्ररीअन आणि ‘तू कोणत्या इत्तेत शिकतोस?’ असं निरागसपणे विचारणारी एक लहान मुलगीही फिनचे मित्र होतात. 

‘जो’, ‘फिन’ आणि ‘ओलिव्हिया’ बऱ्याचदा एकत्र वेळ घालवू लागतात. त्यांच्या एकत्र भेटण्याला नेहमीच शब्दांची गरज भासत नाही. एकमेकांची सोबत असणच त्यांना पुरेसं असत.न्यू जर्सी मधील ते गाव, तो राहत असलेला स्टेशन डेपो, तिथले रेल्वे ट्रॅक, निसर्ग सर्वच त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग होऊन जातात. ट्रेन्सविषयी असणारी आपली आवड देखील फिन इथे जोपासू लागतो.

फिन आणि ओलिव्हिया


या पात्रांच्या वैयक्तिक जीवनात येणाऱ्या सुख-दुःखाच्या घटना नात्यातील ताण त्यांना काही काळ दूर नेतात व तश्याच त्या जवळही आणतात. अश्याच एका तणावाच्या प्रसंगी फिन त्याच्या स्वभावाच्या विपरीत एका गर्दी असलेल्या बार मध्ये जातो. कितीही सवयीच्या करून घेतल्या तरी यावेळेस लोकांच्या नजरा त्याला असह्य होतात व तेथीलच एका काउंटवर चिडून तो उभा राहतो व स्वतःकडे हात करत म्हणतो “हिअर आय अम.. टेक अ लूक… टेक… अ लूक.”  आपल्या असह्य झालेल्या भावनांना व रागाला वाट करून देण्याचा फिनचा ह्या चित्रपटातील असा हा एकमेव प्रसंग.


खुजे लोकांना सामोरे जावे लागणाऱ्या अडीअडचणींना मेलोड्रॅमॅटिक पद्धतीने सादर न करता अतिशय साध्या तर कधी विनोदी पद्धतीने दिग्दर्शक टाँम मॅकार्थी आपल्या समोर सादर करतो. या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट परंतू चित्रपट माध्यमा वरची त्याची पकड जाणवल्या शिवाय राहत नाही. चित्रपटातील कलाकारांचा अप्रतिम आणि अकृत्रिम अभिनय, जीवनाची तरलता कॅमेरयात पकडण्याची दिग्दर्शकाची जाण व प्रामाणिक पटकथा एक अभिजात कलाकृती पहिल्याच समाधान आपल्याला देऊन जाते.


चित्रपटात सुरुवातीलाच वकील असणारे एक पात्र फिनला म्हणते कि …यू आर वन ऑफ दोज मेमोरेबल पर्सन” यातला अर्थ लक्षात घेऊन फिन समंजसपणे मान डोलवतो. आपल्या खुजेपणावर पर्याय नाही हे स्वीकारून आत्ममग्न झालेल्या व त्यामुळेच एकाकी झालेल्या फिनसोबतच –आयुष्यात काहीश्या एकाकी झालेले त्याचे नवीन मित्र ‘ओलिव्हिया’ आणि ‘जो’ जेव्हां आपल्या दुःखांचा स्वीकार करून काही काळाकरता का होईना एकमेकांच्या सोबतीसाठी, एकमेकांना समजून घेत एकत्र येतात तेव्हां; एलकुंचवारांच्याच शब्दांत सांगायचं तर या सर्वांचीच दुःख हि शहाणी झाली आहेत असं वाटत राहतं. 

Leave a Comment