ताझा खबर | Taza Khabar Review in Marathi

खबर वही पुरानी है. 

वेब सिरीज : ताझा खबर   
कालावधी :  ६ एपिसोडस (अंदाजे ३०  मिनिटे प्रत्येकी)
दिग्दर्शक: हिमांक गौर. 
लेखक : आभास दलाल, हुसेन दलाल
मुख्य कलाकार : भुवन बाम, श्रिया पिळगावकर, शिल्पा शुक्ला, जे डी चक्रवर्ती, देवेन भोजानी, प्रथमेश परब, मिथिलेश चतुर्वेदी, अतिशा नाईक, महेश मांजरेकर, विजय निकम.
कुठे पाहू शकता : डिज्नी प्लस हॉटस्टार । Taza Khabar Web Series OTT platform

भुवन बाम विषयी :

21 वर्षीय भुवन बाम ने, 2015 साली युट्यूबवर स्वतःचे छोटे-छोटे विनोदी स्किट टाकायला जेव्हा सुरुवात केली, त्या वेळेस कोणालाच भारतात युट्यूब आणि युट्यूबर्स  अल्पावधीतच एवढे मोठे सेलेब्रिटीज होतील असे वाटले नव्हते. 

स्किट मधील सर्वच पात्रं स्वतःच वेगवेगळी वेशभूषा करून साकारणे हा ट्रेंड त्याने लोकप्रिय केला.  बर्‍यापैकी प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार का? असे विचारले तेव्हां त्याने वर्तवलेले भविष्य म्हणजे, तो बॉलीवुड कडे न जाता, बॉलिवूड सेलिब्रिटीज युट्यूब कडे येतील हे काही वर्षातच खरे ठरले. माधुरी दीक्षित,आलिया भट आणि अनेक सेलिब्रिटीजनी त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल काढले. 

Bhuvan Bam
भुवन बाम वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिकेमध्ये

आज घडीला भुवन बाम च्या ‘बी बी के वाईन्स’ ह्या यूट्यूब चॅनेल चे २ कोटी 57 लाख यूट्यूब सबस्क्रायबर्स आहेत आणि अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीज आज त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी त्याच्या चॅनेल वर येत असतात. वर्षभरापूर्वीच त्‍याने यूट्यूबवर काढलेली ‘धिंडोरा’ नावाची वेब सिरीज बरीच लोकप्रिय ठरली. 

आशयाच्या सादरीकरणाबाबत सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणे हे भुवन चे वेगळेपण. कधी ते व्हिडिओच्या लांबी बाबत- २ मिनिटां च्या स्किट पासून  ते २० मिनिटा च्या वेबसिरीज पर्यंत. तर कधी एक पात्री स्किट तर कधी दोन पात्री, तर कधी-कधी पाच-सहा पात्रांची भूमिका स्वतःच करून लोकांमध्ये त्याने ती लोकप्रिय केली. ह्या वेळेस त्याने प्लॅटफॉर्म बदलला आहे.  त्याची नवीन वेब सिरीज ‘ताजा खबर’ ही डिज्नी प्लस हॉटस्टार वर रिलीज झाली आहे.

Taza Khabar Review in Marathi.

गोष्ट काय आहे ? । What is the story of Taza Khabar?

चाळीत राहणारा वसंत गावडे उर्फ वस्या (भुवन बाम) हा सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर शौचालयाची निगा राखण्याचे आणि शुल्क गोळा करण्याचे काम करत आहे. त्याची आई (अतिषा नाईक) इतरांकडे मोलकरणीचे काम करत आहे तर व्यसनाधीन वडील (विजय निकम) एका फॅक्टरीत काम करत आहे. 

वास्या चे वैश्या असणाऱ्या मधू (श्रिया पिळगावकर) वर प्रेम आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे तो तिच्यासाठी काहीच करू शकत नाहीए. गुंड आणि राजकारणी असलेल्या शेट्टी (जे डी चक्रवर्ती, सत्या चित्रपटातील सत्या) चे मधुकडे जाणे येणे आहे आणि वास्याचे तिथे सतत येणे त्याला खटकत आहे.

अशा पार्श्वभूमीवर, एके दिवशी संडासात पडलेल्या वयोवृद्ध स्त्रीला, कोणीही मदत करायला तयार नसताना, तिला बाहेर काढून तिची सुश्रुषा केल्यामुळे त्याला वरदान मिळते की, भविष्यात होणाऱ्या बातम्यांची सूचना काही काळ आधीच त्याला मोबाईलवर येईल आणि केवळ त्यालाच ती वाचता येईल.

या जादुई ताकतीचा वापर करून आपली आणि आपल्या जवळच्यांची – म्हणजेच बेकरी मालक (देवेन भोजानी), बेकरी मालकाची मुलगी (नित्या माथुर), मित्र पीटर (प्रथमेश परब) आणि मधु या सर्वांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे तो ठरवतो.

सुरुवातीला धडपडल्यानंतर, क्रिकेट बेटिंग च्या विश्वात ते शिरतात त्यामध्ये लाखो आणि करोडो रुपये ते कमवायला लागतात. यानंतर सिरीज अपेक्षित, माहिती असलेली आणि अनेक चित्रपटात – वेब सिरीज मध्ये पाहिलेली वळणं घेते.

आपण भविष्य बघू शकतो त्यामुळे आपण देवच झालो आहोत असे वस्याला वाटू लागते. त्याचा अहंकार दिवसेंदिवस वाढतच जातो. यामुळे आपल्या जवळच्या लोकांना तो कमी लेखू लागतो, त्यांचा अपमान करू लागतो आणि इथूनच त्याची अधोगती सुरू होते.

वेब सिरीज कशी आहे । How is Taza Khabar?

चित्रपटाची कथा नवीन नाही. गरिबाला अचानक मिळालेला धनलाभ त्याला कसे बिघडवत नेतो हे आपण अनेक चित्रपटात पाहिलं असेल. काही वर्षांपूर्वीच मराठीत आलेला, भाऊ कदम मुख्य भूमिकेत असलेला ‘नशीबवान’ चित्रपट ‘ताझा खबर’ पेक्षा अधिक चांगला होता. वास्तव चित्रपटाचाही काही प्रभाव ‘ताझा खबर’ वर जाणवतो. ‘ताझा खबर’ चे वेगळेपण एवढेच की इथे नायकाला तो भविष्यात बघण्याची जादूई ताकद देतो, त्यानंतर मात्र तो अपेक्षित वळणं घेत जातो आणि त्यात रंजक असं काही वाटत नाही. 

भुवन बामने त्याच्या नेहमीच्या युट्युब व्हिडिओ पेक्षा वेगळी भूमिका येथे साकारली आहे आणि अभिनयात झालेली त्याची प्रगती स्पष्टपणे दिसून येते. श्रिया पिळगावकर, अतिशा नाईक, विजय निकम आणि प्रथमेश परब या मराठी कलाकारांनी आपापली कामं चोख केली आहेत. 

भुवन बाम ताझा खबर मधील एका दृश्यात.

दिग्दर्शक हिमांक गौर आणि प्रोडक्शन डिझायनर तारिक उमार खान हे मुंबईतील चाळी मधील वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. प्रोडक्शन डिझाईन मध्ये घेतलेली मेहनत इथे दिसून येते, त्यामुळे चाळ कुठेही खोटी वाटत नाही. चित्रपटातील संवाद देखील तरुण पिढीला आकर्षित करतील असे आहेत. जसे की 

“हम कहा जा रहे है? ….औकात के बाहर.”

“जो लेट नही वह डेट नहीं”

अभिनय आणि तांत्रिक दृष्ट सिरीज चांगली असूनही कथेतील शिळेपणामुळे सिरीज सर्वसाधारणच ठरते. भुवन बामचा जो तरुण प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना ही सिरीज आवडू शकेल, बाकीच्यांना जर तीन तासांमध्ये एखादी सिरीज टाइम पास म्हणून बघायची असेल तर ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ वर ‘ताझा खबर’ ची निवड करू शकता.

Leave a Comment