टिकू वेड्स शेरू मुव्ही रिव्यू – भावनाशून्य आणि रट्याळ | Tiku Weds Sheru Movie Review

चित्रपट:  टिकू वेड्स शेरू 
कालावधी :  १ तास ५५ मिनिटं
दिग्दर्शक:  साई कबीर  
कथा पटकथा आणि संवाद :  अमित तिवारी आनंद, साई कबीर  
छायाचित्रण: फर्नांडो गेस्की
संकलक:  बल्लू सलुजा 
पार्श्व संगीत: गौरव चॅटर्जी 
मुख्य कलाकार :  नवाजुद्दीन सिद्दीकी, अवनीत कौर, झाकीर हुसेन
कुठे पाहू शकता : अमेझॉन प्राईम व्हिडिओ 

Tiku Weds Sheru Movie Review ‘तनू वेड्स मनू’ याच्याशी नामसाधर्म्य आणि थोडंस कथासाधर्म्य राखणारा आहे -‘टिकू वेडस शेरु’ – जिथे पहिल्या दोन चित्रपटात कंगना रनौतने अभिनय केला होता तर इथे ती या चित्रपटाची निर्माती बनलेली आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी हाच चित्रपट ‘डिव्हाईन लवर्स‘ या नावाने इरफान आणि कंगना रनौत यांना मुख्य भूमिकेत घेऊन केला जाणार होता. पण काही कारणाने त्यावेळेस बनू न शकणारा हा चित्रपट आता नवोदित अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना घेऊन बनविण्यात आला आहे. सुरुवातीला थोडा बरा वाटणारा चित्रपट जसा जसा पुढे सरकतो तसा तसा तो अधिकाधिकच वाईट होत जातो.

Tiku Weds Sheru Movie Review Avneet Kaur
अवनीत कौर – टिकू वेड्स शेरू मध्ये

गोष्ट काय आहे :

ज्युनिअर आर्टिस्ट असणारा शेरू (नवाजुद्दीन सिद्दीकी ) मुंबईमध्ये चित्रपटांत एक्सट्रा ची कामं करतो आहे आणि त्याचबरोबर पैशासाठी नाईलाजाने राजकारणी आणि श्रीमंत लोकांना वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविण्याचं कामही त्याला करावं लागतं आहेत. 

भोपाळ मध्ये राहणारी बिनधास्त – बंडखोर  टिकू ला (अवनीत कौर) सुपरस्टार होयचं आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंड च्या सांगण्या वरून घरच्यांना न सांगता एक अंतर्वस्त्रांची जाहिरात देखील केलेली आहे. घरच्यांना मात्र तिच्या अशा स्वभावामुळे तिचे लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं आहे.

अशावेळेस तिला लग्नाकरता पाहण्यासाठी मुंबईवरून शेरु येतो आणि तिला पाहताच तिच्या प्रेमात पडतो. पहिल्या भेटीतच त्याला झिडकारून लावणारी टिकू, मुंबईला जायला मिळून, आपल्याला अभिनय करता येईल या शक्यतेने त्याच्याशी लग्न करायला तयार होते. या सगळ्यात शेरू मुंबईत नक्की काय करतो या बाबतीत मात्र तिला काही कल्पना नाही.

मुंबईत आल्यानंतर टिकू आणि शेरू ची स्वप्न पुर्ण होतात का? हे इच्छुक पुढे चित्रपट कसा आहे हे वाचून ठरवू शकतात.

चित्रपट कसा आहे ? 

गावाकडची बंडखोर मुलगी जीचा आधीपासून एक बॉयफ्रेंड आहे आणि केवळ घरच्यांच्या दबावामुळे जिला मुलं पहावी लागतात – अशावेळेस शहरातून आलेला मुलगा तिच्या गुण दोषांकडे दुर्लक्ष करून केवळ तिच्या दिसण्याने तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो. हे ‘तनू वेड्स मनू’ मध्ये असणारं ढोबळ कथानकं इथेही येते. पण ‘तनु वेडस् मनु’ जितकं आपलं मनोरंजन करतो तितकं हा अजिबातच करत नाही. यात सर्वात मोठी अडचण ठरते ते टिकू आणि शेरू या मध्ये अजिबातच दिसून न येणारी केमिस्ट्री आणि दोघांचाही अतिशयोक्ती कडे झुकणारा अभिनय ज्या वर पुढे येईलचं. 

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर दोघांच्याही वयामधील अंतरावर बरीच चर्चा-टीका झाली त्यावेळेस नवाझ ने किंग खान जर करू शकतो तर मी का नाही? असं वक्तव्य केलं.  वयात अंतर असणाऱ्या नायक-नायिकांनी पडद्यावरती रोमान्स करणे याच काहीच हरकत नसावी, पण ते त्यांच्या वयाच्या जवळपासची भूमिका असेल तर ती खटकत नाही. पण ज्या वेळेस वयस्कर नायकाला अथवा नायिकेला तरुण म्हणून दाखविले जाते त्यावेळेस खरी अडचण निर्माण होते. कट्पुटली चित्रपटामध्ये जसा अक्षय कुमार ३६ वर्षाच न वाटणं खटकलं होतं तसं इथे नवाझ च्या बाबतीतही होतं आणि त्यात न जमलेल्या अभिनय आणि केमिस्ट्री मुळे अधिकच भर पडते.

Tiku Weds Sheru Movie Review- Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी टिकू वेड्स शेरू मध्ये

गँग्स ऑफ वासेपूर मध्ये देखील नवाझचं दिसणं चित्रपटाच्या रोमान्सच्या दृश्यात बसत नव्हतं, त्यावेळेस अनुराग कश्यप चित्रपटाच्या संवादामध्ये त्याचा खुलासा देतो कि जास्त ड्रग्स आणि दारू पिऊन तो त्याच्या वयापेक्षा जास्त वयाचा दिसतोय. इथे मात्र तसं काही होत नाही.

चित्रपट एका प्रसंगातून दुसऱ्या भावनिक प्रसंगात पटकन उडी घेतो, एका प्रसंगात शेरू क्लाइंट कडे घेऊन जात असलेल्या एका कॉल गर्ल ला डिनरला येणार का विचारतो? ती हो म्हटल्यानंतर दुसऱ्याच प्रसंगात ती क्लायंट सोबत जायला तयार होते त्यावेळेस नवाज एकदम धक्का बसल्यासारखी प्रतिक्रिया देतो. 

गावाला पोहोचतो तर त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या वडिलांचा किंवा आजोबांच्या फोटो समोर लगेच त्याच्या डोळ्यात पाणी येते. म्हणजे एका भावनेतून दुसऱ्या भावनेत शिरायला जो कालावधी, प्रसंग वा पार्श्वभूमी आवश्यक असते ती दिग्दर्शक /लेखक कलाकाराला देतच नाही. 

टिकू ची बहिण सना ने देखील कथेच्या पुढील सोयीसाठी अचानकपणे तिच्या सोबतच मुंबईत राहायचे ठरवणे आणि त्यांच्या कुटुंबाची त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न दाखवणे देखील पटत नाही. 

अनेक संवाद तर उगाचच का टाकले असा प्रश्न पडतो. उदाहरण द्यायचे झाले तर शेरू एका प्रसंगात ‘सनी श्रॉफ’ या अभिनेत्याला टिकूच्या बहिणीला भेटवण्या संबंधित बोलतो.

“मैं तुम्हें 22 तारीख के बाद सनी श्रॉफ से मिलवाऊंगा, क्योंकि 22 के बाद वह कौन सी  ‘दिशा’ से आएगा ‘पटा’ नहीं।”

शेरू (टिकू वेडस शेरु) 🙂

जाणकारांनी ओळखलं असेलच हे कोणाबद्दल बोललं जातंय. बरं फिल्म इंडस्ट्री मधील विनोद करावेत पण त्यातील कल्पकता देखील इथे दिसून येत नाही. 

अभिनय: 

हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये नवाझ हा सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे हे वेगळं सांगायला नको. या ठिकाणी मात्र शेंडा-बुडखा नसलेल्या शेरूची त्याने साकारलेली भूमिका उथळ वाटते. अनेक ठिकाणी तो अचानक हसायला लागतो किंवा रडायला लागतो, विशेषतः समुद्रावर घडणारा एक प्रसंग तर हास्यास्पद झाला आहे. शेवटाकडे तर नवाझ ज्या अवतारात येतो ते पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही.  

Tiku Weds Sheru Movie Review Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी टिकू वेड्स शेरू मध्ये

डान्स रियालिटी शो किंवा अनेक जाहिरातीतून काम करणाऱ्या अवनीत कौरची ही पहिलीच मुख्य भूमिकेतील फिल्म आहे. लाईफ बॉयची १० वर्षा पूर्वीची ‘तेरा साबून स्लो है क्या?’ ही तिने केलेली ऍड तुम्हाला कदाचित आठवत असेल. तिने इथे प्रयत्न प्रामाणिक केला आहे परंतु मुळात लेखनात आणि दिग्दर्शनातच चित्रपट कमकुवत आहे. चित्रपटात येणाऱ्या अनेक सहकालाकारांनीही पाट्या टाकण्याचे काम केलं आहे, त्यामुळे मुळातच साधा वाटणारा चित्रपट अजूनच वाईट वाटू लागतो.

Avneet Kaur - Tera Sabun Slow hai kya?
अवनीत कौर – १० वर्षा पूर्वी ‘तेरा साबुन स्लो है क्या?’ लाईफ बॉय जाहिरातीत

चित्रपट पाहावा का? : 

भारतभरातून हजारो- लाखो लोक मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. काहींनाच इथे यश येतं तर अनेकांच्या पदरी निराशा पडते. प्रकाशझोतात दिसणाऱ्या या यशस्वी सेलिब्रिटींच्या चेहऱ्यांमागे लाखोंनी अयशस्वी चेहरे आहेत. अवहेलना,अपयश, निराशा आलेल्या या लोकांची कथा क्वचितच आपल्याला पडद्यावर पाहायला मिळते. ‘टिकू वेड्स शेरू’ मधून या लोकांची कथा पुढे आणण्याचा प्रयत्न असावा, पण तो पुरता फसलेला आहे त्यामुळे वाईट वाटतं. 

यापेक्षा मी तुम्हाला, अश्या कलाकारांच्याच आयुष्यावर आधारीत असलेली नवाजुद्दीन सिद्दिकीनेच काम केलेली आणि दिबाकर बॅनर्जी ने दिग्दर्शित केलेली ‘बॉम्बे स्टोरीज’ या चित्रपटातील वीस ते तीस मिनिटांची शॉर्ट फिल्म पाहायला सुचवेल, नेटफ्लिक्स वर ती तुम्ही पाहू शकता. 

Leave a Comment