त्रिज्या – एक अनुभव (Trijya Marathi Film Review)

फिल्म :  त्रिज्या 
कालावधी :  १ तास 30 मिनिटे
दिग्दर्शक आणि एडिटर: अक्षय इंडीकर 
लेखक :अक्षय इंडीकर आणि क्षमा पडाळकर 
सिनेमॅटोग्राफी : अक्षय इंडीकर आणि स्वप्निल शेटे 
साउंड डिझाईन : मंदार कमलापूरकर 
मुख्य कलाकार : अभय महाजन, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, गजानन परांजपे, प्रशांत गीते, आर्या रोठे 
कुठे पाहू शकता : मुबी (www.mubi.com)  

खूप वर्षापूर्वी पुण्याच्या फिल्म अर्काइव्ह मध्ये कुठलीशी  युरोपियन फिल्म पहिली होती. त्यामध्ये सिग्नलला एका फुटाच्या अंतरावर दोन बसेस थांबतात. नुकताच पाऊस पडून गेलेला. बसच्या काचेवर दवबिंदू जमा झालेले.  बस मध्ये बसलेली व्यक्ती बसच्या काचेवरील दवबिंदू बघत असतानाच त्याचे लक्ष दुसऱ्या बस कडे जाते.  दुसऱ्या बसमध्ये एक वृद्ध महिला बसलेली. दोघांची नजरानजर होते. दोघे एकमेकांकडे काही क्षण केवळ बघत राहतात. ते पाहणे निरामय आहे, त्यात कोणताही भाव नाही. काही क्षण तसेच जातात. सिग्नल सुटतो आणि दोन्ही बस आपापल्या मार्गाने वेगळ्या होतात. नजरेने भेटलेल्या त्या दोन अनोळखी व्यक्ती, दूर होतात, पुन्हा कदाचित कधीही न भेटण्यासाठी.  

सिनेमा संपल्यानंतर हाच प्रसंग का लक्षात राहिला माहित नाही.  त्यानंतर जेव्हा कधी मी बसमध्ये खिडकीशेजारी बसतो, त्या वेळेस या प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कदाचित अशा प्रसंगांचे एकत्रीकरण करून केलेली गोष्ट म्हणजेच सिनेमा. क्षणभंगुर क्षणांना गतिमान प्रतिमेमध्ये पकडून पडद्यावरती दिलेले हे अमरत्व. कधीतरी या प्रतिमा आपण पडद्यावर पाहतो आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील क्षणांची आठवण येते. 

त्याला स्थळ काळाची बंधनं नाही. जर्मनी मधली एखादी आजी बघताना आपल्याला आपल्या गावाकडच्या आजीची आठवण येते किंवा एखादा प्रसंग आपल्याला आपल्या जीवनातील प्रसंगाची आठवण करून देतो. सिनेमाच्या लौकीक यशापयशाच्या चौकटी पलीकडे जाऊन थेट व्यक्तीच्या अनुभवाला भिडणारा सिनेमा… ‘त्रिज्या’ हा अनुभव देतो. 

Abhay Mahajan in Trijya
अभय महाजन त्रिज्या मधील एका प्रसंगात

‘त्रिज्या’ पाहताना हे लिहिणाऱ्या लेखकाला त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांची आणि व्यक्तींची आठवण झाली. पुण्यातील रस्त्यांवर निरुद्देश भटकण असो, मल्टी मार्केटिंग च्या अटेंड केलेल्या मीटिंग्स किंवा मुलगी पाहायला जायचे अनेक प्रसंग असो. विशी-तिशी च्या वयामध्ये बहुतेक तरुण-तरुणींना जावं लागणाऱ्या मानसिक कोलाहलाचं दर्शन ‘त्रिज्या’ अश्या अनेक प्रसंगातून घडवतो.   

दिग्दर्शक गोष्ट सांगतो सोलापुर मधील छोट्या गावातून पुण्यात आलेल्या अवधूत काळे नामक तरूणाची.  कवी असणारा अवधूत ‘दैनिक सह्याद्री’ नावाच्या एका दैनिकामध्ये काम करतो आहे. शहरी वातावरणामध्ये तो अस्वस्थ झाला आहे असं आपल्याला अनेक प्रसंगातून दिसतं राहतं.  

राशी-भविष्याचा कॉलम लिहायला, सहकाऱ्याला मदत करताना, तो भविष्य लिहायला सांगतो. 
“तुम्ही आहात हे कशावरून? तुमच्या असण्यावर शंका घ्या “
धरणामुळे विस्थापित झालेल्या एका कुटुंबातील बाई त्याला म्हणते. 
“मातीतनं मूळं उपटलेली झाडं, रुजतात का हो?”

-त्रिज्या

काही लोकं त्याला  विचारतात तुमचा प्रश्न काय आहे नेमका? काही पर्सनल प्रश्न आहे का? आपण मिळून सोडवू ” तर त्यावर तो म्हणतो “खरं सांगायचं तर, नक्की काय प्रश्‍न आहे हेच मला कळत नाही” 

आवडलेल्या मुलीशी बोलणं झाल नाही, प्रेम झालेल्या मुलीशी लग्न झालं नाही, दहा वर्ष तुटपुंज्या पगारावर काम करून पुण्यात स्वतःच घर झालं नाही. या वैफल्यातून शांतीच्या शोधात निघालेल्या अवधूतला आयुष्यच प्रयोजन काय असा प्रश्न पडला असावा. 

या कथेला साचेबद्ध असा सुरूवात – मध्य – शेवट नाही, यात कुठलेही द्वंद्व नाही, जे द्वंद्व आहे ते अवधूतच्या मनातले आहे आणि त्या द्वंद्वाचा अनुभव प्रतिमा आणि ध्वनी च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिग्दर्शक प्रभावीपणे करतो. गावातून शहरात आलेल्या तरुणांच्या मनोविश्वाचं दर्शन अनेक कथा, कादंबऱ्यांमधून  वाचताना जो अनुभव येतो तोच अनुभव ‘त्रिज्या’ देखील देऊन जातो.   

सिनेमाची कथा काहींना निराशावादी वाटू शकते, पण हा सिनेमा पाहताना किंवा संपल्यानंतरही कुठेही मनात निराश भावना राहत नाही. सिनेमाचा शेवटही निराशावादी नाही.  सिनेमॅटोग्राफी मधून दिसून येणारी सौंदर्यदृष्टी आणि अत्युत्कृष्ट असं साउंड डिझाईन आपल्याला त्या विश्वात क्षणात घेऊन जाते. 

अभय महाजन याने केलेला अभिनय हा सिनेमाचा कळस बिंदू ठरतो. अवधूत च्या मनाची होणारी घालमेल त्याने फार प्रभावीरीत्या दाखवली आहे. अभय महाजन शिवाय दुसरा कोणी या भूमिकेला न्याय देऊ शकला असता असे वाटत नाही.

सिनेमाचा दिग्दर्शक अक्षय इंडीकर एके ठिकाणी म्हणतो “तुम्हाला जे सांगायचे ते जेव्हा बोलून दाखवता येत नाही किंवा लिहून सांगता येत नाही, त्यावेळेस मी सिनेमा या माध्यमाचा वापर करतो.”  हे शब्दातीत जे सांगणे आहे त्याचा अनुभव हा सिनेमा पाहताना आल्याशिवाय राहत नाही.

Leave a Comment