उनाड – आहे मनोहर तरी … | Unaad Marathi Movie Review

चित्रपट:  उनाड
कालावधी :  १ तास ४४ मिनिटं
दिग्दर्शक:  आदित्य सरपोतदार
कथा पटकथा आणि संवाद : आदित्य सरपोतदार, सौरभ भावे, कल्याणी पंडित
छायाचित्रण: लॉरेन्स डिकुन्हा
संकलक:  फैसल महाडिक, इमान महाडिक
संगीत: गुलराज सिंग
मुख्य कलाकार :  आशुतोष गायकवाड, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, हेमल इंगळे, देविका दफ्तरदार, देवेंद्र प्रेम, अविनाश खेडेकर, प्रियांका तेंडुलकर, संदेश जाधव.
कुठे पाहू शकता : जिओ सिनेमा

Unaad Marathi Movie Review: दिग्दर्शक आदित्य सरपोतदार वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी ओळखला जातो. फास्टर फेणे, झोंबिवली, उलाढाल, नरबाची वाडी या चित्रपटांवरूनच विषयातील वैविध्य तुमच्या लक्षात येईल. ‘उनाड’ मध्ये देखील त्याने, आतापर्यंतच्या त्याच्या चित्रपटांमध्ये त्याने न हाताळलेला विषय हाताळला आहे, तर जाणून घेऊया कसा झाला आहे ‘उनाड’.

गोष्ट काय आहे । What is the story of Unaad 

कोकणात राहणारे कोळीवाड्यातील तीन मित्र -शुभम (आशुतोष गायकवाड), बंड्या (अभिषेक भरते), आणि जमील (चिन्मय जाधव) या तिघांची तारुण्यातून प्रगल्भ होण्याचा प्रवास सांगणारी ही गोष्ट आहे.

शुभम ची आई आजारपणात वारली, तिच्या आजारपणात वडील बोटीवर असल्यामुळे तिच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, असं त्याचं मत आहे. त्यामुळे वडिलांवर आणि ते करत असणाऱ्या मासेमारी व्यवसायावर त्याचा प्रचंड राग आहे. जमील च्या आईला त्यांची बंद पडलेली बेकरी विकून जमील ला त्याच्या अबूंकडे कुवेतला नोकरीसाठी पाठवायचं आहे.बंड्याची आई (देविका दप्तरदार) मासे विकून स्वतःचे घर चालविते आहे त्यात बंड्याने चांगले शिक्षण घेऊन तिला हातभार लावावा ही तिची अपेक्षा आहे.

तिघांचे एकएकटे असणारे पालक तिघांनाही कष्ट करून सांभाळत आहेत, मात्र तीनही मुलांचं अभ्यासाकडे लक्ष नाही. दारू पीत, सिगारेटी ओढत, उनाडक्या करत ते गावभर फिरत राहतात. 

Unaad Marathi Movie Review आशुतोष गायकवाड, चिन्मय जाधव आणि अभिषेक भरते 'उनाड' मधील एका दृश्यात
आशुतोष गायकवाड, चिन्मय जाधव आणि अभिषेक भरते – ‘उनाड’ मधील एका दृश्यात (PC: Youtube Trailer)

पुण्याहून कोकणात आपल्या कुटुंबासोबत शिफ्ट झालेल्या स्वरासोबत (हेमल इंगळे) शुभमची आधी ओळख आणि नंतर मैत्री होते. शुभम या मैत्रीचा वेगळा अर्थ समजून तिच्याशी जवळीक करायचा प्रयत्न करतो ज्यामुळे दोघांमध्ये भांडण होते. त्यात आधीपासूनच शुभम चे ज्याच्याशी वाद झाले आहेत असा पराग दोघांच्या भांडणात पडतो आणि चिडलेला शुभम पराग चा सूड घेण्यासाठी त्याची एक व्हिडिओ क्लिप चित्रित करतो आणि चुकून ती व्हायरल होते. याची परिणती शुभमला आपल्या राहत्या गावातून पळ काढावा लागतो. 

यानंतर तिघाही मित्रांच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात  ज्यामुळे तिघांनाही मोठेपणाची, प्रौढपणाची, जबाबदारीची जाणीव होते. ते बदल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. 

चित्रपट कसा आहे ? | Unaad Marathi Movie Review.

मुळात वेगळी बोलीभाषा, वेगळा प्रदेश, नवीन कलाकार घेणे आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे अर्धा चित्रपट हा एका बोटीवरती शूट करणे हे निश्चितंच धाडसाचं काम आहे, याबद्दल आदित्य सरपोतदार चे अभिनंदन. 

‘उनाड’ तांत्रिकदृष्ट्या उत्तम झाला आहे विशेषतः सिनेमॅटोग्राफी – लॉरेन्स डिकुन्हा चा कॅमेरा कोकणातील घरं, समुद्रकिनारे, बोटी, किल्ले फार सुंदर रित्या चित्रित करतो. कोकणातील वातावरणात, तिथल्या समुद्रकिनारी, तिथल्या बाजारामध्ये, लोंकांमध्ये तो क्षणात आपल्याला घेऊन जातो. चित्रपटाच्या निर्मिती मूल्यात कुठेही तडजोड जाणवत नाही.

संगीतकार गुलराज सिंग आणि गीतकार गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांची चित्रपटातील गाणी उत्तम झाली आहेत. येडा मंडोला..,हलद वाजू दे,भरती या दर्यात…,मोकळा श्वास घे तुझा… हि सर्वच गाणी छान झाली आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोहचायला हवीत. 

आशुतोष गायकवाड आणि हेमल इंगळे उनाड चित्रपटातील मधील एका दृश्यात
आशुतोष गायकवाड आणि हेमल इंगळे – ‘उनाड’ मधील एका दृश्यात (PC : Youtube Trailer)

हे सर्व असले तरी चित्रपट अपेक्षित परिणाम साधू शकत नाही, चित्रपटातील कमकुवत लेखन याला प्रामुख्याने कारणीभूत ठरते. चित्रपटाचा पहिला भाग पाहताना काही नावीन्य जाणवत नाही. ३ मित्र, त्यांचं उनाडक्या करणं, त्यातील मुख्य पात्राचं कॉलेज मधल्या मुलीवर प्रेम असणं आणि त्याची निष्पत्ती म्हणजे मध्यंतरानंतर कथेने पूर्ण वेगळं वळण घेणे- असं ढोबळ साम्य सैराट ची आठवण करून देते. 

काही कलाकृती तुम्हाला अनुभूती देतात तर काही अनुभव सांगतात- इथे अनुभव सांगितला जातो आहे असं वाटत राहतं. संवादातून अनेकवेळा प्रेक्षकांना माहिती पुरवली जाते आहे असे वाटते. अनेक उदाहरणं देता येतील. बंड्याची आई किंवा जमीलची आई जेव्हां शुभमशी बोलते हे संवाद नैसर्गिक न वाटता प्रेक्षकांना बंड्या आणि जमीलची माहिती देण्याकरता निर्माण केले आहेत असे वाटते. जमील चे आजोबा त्याच्याशी बोलतात किंवा स्वरा ची बहीण शुभमला शेवटी जेव्हां स्पष्टीकरण देते तेव्हां देखील हेच वाटते, अश्या वेळेस प्रेक्षक म्हणून बघताना प्रसंगात गुंतण्याऐवजी आपण त्यातून बाहेर पडतो. प्रेक्षकांना पात्रांविषयी माहिती देणे आवश्यक असते हे कबूल, पण ती अधिक कल्पकतेने दिली असती तर प्रेक्षक प्रसंगांमध्ये खिळून राहिले असते असे सारखे वाटत राहते.

चित्रपटातील पात्र हसतात रडतात, भांडण करतात, भावनिक कोलाहलातून जातात पण प्रेक्षक म्हणून आपण त्यांच्या भावनेशी जोडले जात नाही, त्यात एक कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे चित्रपट जसा भिडायला पाहिजे तसा भिडत नाही. चित्रपटातील मुख्य पात्रांची भूमिका करणारे कलाकार देखील नवखे असल्यामुळे ते प्रभाव पाडू शकत नाहीत; कदाचित अधिक चांगले अभिनेते पात्रांना योग्य न्याय देऊ शकले असते. जुने जाणते कलाकार – देविका दप्तरदार आणि संदेश जाधव मात्र आपल्या भूमिका चोख करतात. चित्रपटाच्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक प्रभावी झाला आहे. दुसरा भाग प्रामुख्याने बोटीमध्ये, समुद्रात घडतो त्यामुळे त्यात नाविन्य दिसून येते.  बोटीवर असणाऱ्या कोळी लोकांचा एक वेगळं आयुष्य आपल्याला यामध्ये पहायला मिळते.

आशुतोष गायकवाड उनाड चित्रपटातील एका दृश्यात
आशुतोष गायकवाड – ‘उनाड’ चित्रपटातील एका दृश्यात (PC : Youtube Trailer)

चित्रपट पाहावा का? (Verdict ) : 

चित्रपटात त्रुटी असल्या तरी सिनेमॅटोग्राफी, गाणी आणि बोटीवरील कोळी लोकांच्या आयुष्याच्या चित्रीकरणासाठी तरी तो पाहण्याजोगा झाला आहे आणि त्याच्या अपेक्षित प्रेक्षकांपर्यंत तो पोहचला पाहिजे. जिओ सिनेमा वरती तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. 

बऱ्याच जणांना हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि तो आपण मोफत जिओ सिनेमावर पाहू शकतो हे माहिती नाहीए. जिओ सिनेमा कडून एका मागो माग एक चित्रपट रिलीज करण्याच्या नादात चित्रपटाचे योग्य रीतीने प्रमोशन करण्यात येत नाहीए. विशेषतः ओटीटीवर रिलीज होणारे चित्रपट. आठवडाभर आधी चित्रपट रिलीज होणार आहे हे कळतं, एखाद दुसरा ट्रेलर किंवा टीजर टाकण्यात येतो आणि चित्रपट रिलीज करण्यात येतो. अपुऱ्या प्रसिध्दी अभावी ‘गोदावरीआणि ‘मी वसंतराव सारखे जिओ सिनेमा वरचे चांगले चित्रपट देखील लोकांपर्यंत पोहचण्यात कमी पडत आहेत. 

Leave a Comment