वाळवी | Vaalvi Marathi Movie Review

थरारक र’हास्य’पट

फिल्म :  वाळवी 
कालावधी :  १ तास ४६ मिनिटे
दिग्दर्शक: परेश मोकाशी. 
कथा पटकथा आणि संवाद :  परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी.
छायाचित्रण: सत्यजित शोभा श्रीराम.
संकलक: अभिजीत देशपांडे आणि सौरभ प्रभुदेसाई
पार्श्व संगीत: मंगेश धाकडे
मुख्य कलाकार :  स्वप्निल जोशी,अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे.
कुठे पाहू शकता : आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि व चि सौ कां यानंतर परेश मोकाशी याचा ‘वाळवी’ हा चौथा आणि सगळ्यात चांगला चित्रपट वाटला. चित्रपटाचे दिग्दर्शक असणाऱ्या परेश मोकाशी याने हा आम्ही र’हास्य’पट केला आहे असे म्हटले आहे. म्हणजेच रहस्य आणि हास्य यांची गुंफण असलेला.

रहस्य ज्या चित्रपटाचा गाभा आहे अश्या चित्रपटाची समीक्षा करणे तसे अवघड काम आहे. कारण कुठेही कथेचा महत्त्वाचा भाग सांगितला गेल्यास चित्रपट पाहताना प्रेक्षकांचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कुठेही चित्रपटातील रहस्यभेद न करता, चित्रपट कसा वाटला हे सांगण्याचा इथे प्रयत्न आहे.

मराठी मध्ये रहस्य, थरार आणि विनोद यांची गुंफण असलेले चित्रपट महेश कोठारे आणि सचिन यांनी नव्वदीच्या दशकात अनेक केले. झपाटलेला, थरथराट, धडाकेबाज, माझा पती करोडपती, नवरा माझा नवसाचा अशी काही नावं घेता येतील. ‘वाळवी’ या सर्वांपेक्षा पटकथा, दिग्दर्शन, सिनेमेटोग्राफी, साउंड डिझाईन एकूणच फिल्म मेकिंग मध्ये उजवा ठरतो.

Vaalvi Marathi Movie Review
‘वाळवी’ चित्रपट पोस्टर – सुबोध भावे, शिवानी सुर्वे, स्वप्निल जोशी आणि अनिता दाते.

गोष्ट काय आहे ? । What is the story of Vaalvi?

डेंटिस्ट असणारी देविका (शिवानी सुर्वे) आणि एका कंपनीत उच्चपदस्थ असणारा अनिकेत (स्वप्निल जोशी) यांचं एकमेकांवर प्रेम आहे. अनिकेतचं आधीच अवनी (अनिता दाते) बरोबर लग्न झालेलं आहे. अवनी हि संशोधक असून तिचं वाळवी वरती संशोधन चालू आहे. 

अवनीला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी, अनिकेत आणि देविका, खोटी आत्महत्या भासवून अवनीचा खून करायची योजना आखतात. ही ट्रेलर मध्ये कळून येणारी कथा आपल्याला मध्यंतरापर्यंत दिसते. यानंतर देविका आणि अनिकेत आपल्या योजनेत यशस्वी होतात का? यात सुबोध भावेची नक्की काय भूमिका आहे? ‘वाळवी’ नेमकं काय करते? हे पडद्यावरती पाहणंच उचित ठरेल.

ट्रेलर मध्ये सुबोध भावे तीन सेकंद जरी दिसत असला तरी चित्रपटामध्ये त्याची मोठी भूमिका आहे, एवढंच वाचकांना आणि सुबोध भावेच्या चाहत्यांना सांगेन.

Vaalvi Marathi Movie Review
‘वाळवी’ चित्रपट पोस्टर – अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे आणि स्वप्निल जोशी.

चित्रपट कसा आहे । Vaalvi Marathi Movie Review?

चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. पहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या धक्कादायक प्रसंगापर्यंत चित्रपट खिळवून ठेवतो. शेवटचा प्रसंग बघितल्यानंतर चित्रपटाला ‘वाळवी’ हे शीर्षक का दिले असावे याचा उलघडा होतो. प्रेक्षक म्हणून तुम्ही बांधलेले अंदाज दिग्दर्शक – पटकथाकार पदोपदी चुकवत नेतात आणि पावणे दोन तास कसे जातात ते कळत नाही. 

पटकथा अतिशय बांधीव केली आहे. कुठेही वायफळ प्रसंग अथवा संवाद नाही. छोटे-छोटे प्रसंग आणि संवाद अतिशय खूबीने पेरले आहेत, ज्याचा उलघडा चित्रपट पाहताना आपल्याला हळूहळू होत जातो.

मराठी चित्रपटांमध्ये साऊंड डिझाईन/ ध्वनी संरचना ला फार कमी वेळा महत्त्व दिले गेले आहे. चित्रपटाच्या प्रसंगातील वातावरण निर्मिती करण्यात साऊंड डिझाईन फार महत्त्वाचा वाटा उचलते. अलीकडेच पाहिलेला ‘त्रिज्या‘ हा मराठी चित्रपट साऊंड डिझाईन चे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. शिशिर चौसाळकर यांच ‘वाळवी’ मधील साऊंड डिझाईन हे उत्कृष्ट दर्जाचे झाले आहे. पालीच्या चुक-चुकण्याचा, वेफर्स खाण्याचा, बोटे मोडण्याचा, मोकळ्या घरात बोलण्याचा आवाज असे वेगवेगळे आवाज अतिशय बारकाईने आणि योग्य ठिकाणी टिपले गेले आहेत. साऊंड चा वापर केवळ वातावरण निर्मिती करताच न करता विनोद निर्मितीसाठी देखील अतिशय खुबीने केला गेला आहे.

मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत चित्रपटातील थरार अधिक गडद करण्यात योग्य हातभार लावते. हॅन्ड हेल्ड कॅमेरा चा वापर न करताही आवश्यक असणारा थरार प्रभावीरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात सिनेमॅटोग्राफर ‘सत्यजित शोभा श्रीराम’ यशस्वी झाला आहे.

Vaalvi Marathi Movie Review
‘वाळवी’ चित्रपट पोस्टर

प्रत्यक्षात पडद्यावर घडणारी घटना, ही विनोदी नसली किंवा दुःखी असली, तरी पात्रांच्या प्रतिक्रियेतून, दृश्यरचनेतून, संवादातून प्रेक्षकांना मात्र हसायला येणे अपेक्षित असते, हा ब्लॅक कॉमेडीचा गाभा. ब्लॅक कॉमेडी अथवा डार्क ह्युमर करणे ही तारेवरची कसरत आहे. ते जर योग्य साधले नाही तर चित्रपट फसू शकतो.

अलीकडील ‘कारखानिसांची वारी‘ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. ‘वाळवी’ ही डार्क ह्युमर ची तारेवरची कसरत सफाईने पेलतो आणि प्रेक्षकांना खूप हसवतो. 

नम्रता आवटे-संभेराव छोट्या भूमिकेत येऊनही छाप पाडून जाते. या गुणी अभिनेत्रीने अधिकाधिक सिनेमे करणे आवश्यक आहे.

‘वाळवी’ ज्या चार खांबावर उभा आहे असे चारही प्रमुख कलाकार स्वप्निल जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे यांनी कमाल काम केले आहे. 

चित्रपटातील पेट्रोल पंपावरील सुट्ट्या पैशाचा वाद आणि देविकाचा गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रसंग हे दोनच प्रसंग घडलेल्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर पटत नाही. बाकी चित्रपटात कुठेच कमतरता जाणवत नाही. 

फार कमी वेळा रहस्य, थरार आणि विनोद यांची गुंफण असलेले आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे चित्रपट प्रदर्शित होतात, त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्याची संधी चुकवू नये. 

तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये तुम्ही ‘वाळवी’ पाहू शकता.

Leave a Comment